आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन चमकला; भारताचा अपेक्षाभंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळ म्हणजे फक्त ‘क्रिकेट’ असा दृढ समज असलेल्या भारताकडे यंदा विसाव्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे यजमानपद होते. एरवी याची फार चर्चाही झाली नसती, परंतु सुरेश कलमाडी यांचे नाव गेल्या तीन दशकांपासून अ‍ॅथलेटिक्सशी जोडले असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात स्पर्धेचा गवगवा झाला. ‘राष्ट्रकुल’ घोटाळ्याच्या आरोपावरून तिहार तुरुंगात दहा महिने घालवून आल्यापासून कलमाडी कधी नव्हे इतके एकाकी आहेत. काँग्रेसनेही निलंबित केल्याने राजकीय, सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर आक्रसला आहे.


या पार्श्वभूमीवर पुण्यातील ‘आशियाई चॅम्पियनशिप’चा घाट जणू कलमाडींच्या पुनरुज्जीवनासाठीच घातला जात असल्याचे बोलले गेले. कलमाडी स्वत: आशियाई अ‍ॅथलेटिक महासंघाचे अध्यक्ष आणि पुण्याचे खासदार असल्याचा दाखला यासाठी दिला गेला. भारतीय अ‍ॅथलेटिक महासंघही कलमाडींच्याच पंखाखाली. कलमाडी यांच्याच इच्छेबरहुकूम ‘आशियाई चॅम्पिनयशिप’ पुण्यात होत आहे, कलमाडींना नव्याने प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे, आदी तर्क लढवले गेले. वस्तुस्थितीचा हा विपर्यास होता.


यापूर्वीची आशियाई चॅम्पियनशिप 2011 मध्ये जपानला झाली. त्याच वेळी 2013 मधील स्पर्धेचा यजमान भारत आणि स्पर्धेचे स्थळ चेन्नई निश्चित झाले. दरम्यानच्या काळात राजकारणाचे रंग बदलले होते. आशियाई चॅम्पियनशिपसाठी श्रीलंकेच्या खेळाडूंचे चेन्नईत होणारे आगमन तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासाठी गैरसोयीचे होते. त्यामुळे स्पर्धा ऐन तोंडावर असताना चेन्नईने स्पर्धेला स्पष्ट नकार दिला. जयललिताअम्मांच्या मनमानीमुळे केंद्राचा अवसानघात झाला. केंद्र सरकारने दिल्ली-झारखंडमध्ये स्पर्धेच्या संयुक्त आयोजनाची चाचपणी सुरू केली, परंतु राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळ्याचा धुरळा अजून बसला नसल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही केंद्राच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. मे महिना उजाडला तरी स्पर्धेचे स्थळ ठरत नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की होण्याची भीती निर्माण झाली. मग कॉँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली. ‘आशियाई चॅम्पियनशिप’चे यजमानपद महाराष्ट्रावर लादण्याचा निर्णय झाला. दिल्लीतून ‘धाडलेले’ मुख्यमंत्री असल्याने केंद्राने आयत्या वेळी टाकलेला बोजा महाराष्ट्राने कुरकुर न करता खांद्यावर घेतला. स्पर्धा आयोजनाचे अधिकृत विनंतीपत्र केंद्राच्या क्रीडा विभागाकडून 11 जूनला राज्य शासनाला मिळाले. म्हणजे स्पर्धा सुरू होण्याच्या जेमतेम 21 दिवस आधी.


अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची तयारी सोपी नसते. धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक आदी एकूण 21 क्रीडाप्रकार आशियाई चॅम्पियनशिपमध्ये खेळले जाणार होते. या क्रीडा प्रकारांचे तांत्रिक नियोजन आणि सर्वोच्च सराव सुविधा तीन आठवड्यांत उपलब्ध करून देणे हा स्पर्धेतील ख-या अर्थाने आव्हानाचा टप्पा होता. बाकी निवास-भोजन व्यवस्थेची अडचण पुण्यासारख्या ‘मेट्रो सिटी’त येण्याचे कारण नव्हते. ‘रात्र थोडी, सोंगे फार’ या स्थितीत राज्याचा क्रीडा विभाग, राज्य आणि पुणे जिल्हा आशियाई संघ यांनी जिवाचे रान केले. राज्यातील अडीचशे आजी-माजी अ‍ॅथलेटिक्स खेळाडू स्वयंसेवक म्हणून राबले. परिणामी स्पर्धा अडखळली नाही.


स्पर्धेतील 136 खेळाडूंनी त्यांची ‘करिअर बेस्ट’ कामगिरी नोंदवली, तर 120 खेळाडूंनी यंदाच्या मोसमातील त्यांची सर्वोच्च कामगिरी गाठली. स्पर्धेतील तांत्रिक अचूकतेची कल्पना देणारे हे निकाल होते. बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडानगरीत आशियातील 43 देशांमधले 540 खेळाडू सुवर्णपदकाचा वेध घेण्यासाठी पाच दिवस झुंजले. साडेतीनशे क्रीडा अधिकारी-प्रशिक्षक त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी दिमतीला होते. सहभागी खेळाडू-प्रशिक्षक आणि देशांची संख्या या दृष्टीने पुण्यातील आशियाई चॅम्पियनशिप आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी ठरली. स्पर्धेच्या आयोजनात महाराष्ट्र कुठेही कमी पडला नाही. शिवछत्रपती क्रीडानगरीच्या शिरपेचात सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा यशस्वी तुरा खोवला गेला. आशियाई चॅम्पियनशिपमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीतही मोठा खड्डा पडला नाही. स्पर्धेपूर्वी पुण्याच्या पत्रकारांनी क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांना यासंदर्भात विचारणा केली होती. त्यावर ‘‘घोटाळा करण्याइतके बजेटच नाही. स्पर्धेसाठी राज्य सरकारने 18 कोटींचीच तरतूद केलीय,’’ अशी प्रांजळ कबुलीच माननीय मंत्रिमहोदयांनी देऊन टाकली. त्यामुळे ‘क्रीडा स्पर्धा आणि आर्थिक घोटाळे’ हे अलीकडच्या काळात रूढ झालेले समीकरण आशियाई चॅम्पियनशिप खोटे ठरवेल, या आशेला जागा आहे.


आशियाई अ‍ॅथलेटिक महासंघाचे पदाधिकारी पुणेकरांच्या पाहुणचारामुळे भारावून गेले होते. आयोजनातील आदरातिथ्याची परंपरा भारतीय खेळाडूंनी ‘मैदानातही’ जपली. यजमान भारताचे 107 इतक्या विक्रमी संख्येने खेळाडू स्पर्धेत उतरले होते. घरचे मैदान, पाठीराखे यांचा कसलाही ‘परिणाम’ खेळाडूंनी ‘कामगिरी’वर होऊ दिला नाही. विकास गौडाने वैयक्तिक ‘करिअर बेस्ट’ कामगिरी साधत थाळीफेकीतील सुवर्णपदक जिंकले आणि स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महिला रिले संघाने 4 बाय 400 मीटर स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक पटकावले, एवढेच काय ते सोनेरी यश. बाकी ६ रौप्य व 9 कांस्यपदके अशी सतरा पदके भारताच्या खात्यात आली. उरलेली सव्वाशेहून अधिक पदके पाहुण्या देशांना उदारपणे लुटू देण्याचे सौजन्य भारताने दाखवले. चीनच्या वर्चस्वाला कोणीही आव्हान देऊ शकले नाही. चीनने 16 सुवर्ण, ६ रौप्य आणि 5 कांस्य अशा सत्तावीस पदकांचा घोस जिंकत अव्वल क्रमांक राखला.


लंडन ऑलिम्पिकमधील पदकवीर मुताझ बरशीम हा एकमेव खेळाडू पुण्यातील आशियाई स्पर्धेत सहभागी झाला होता. पाठीच्या दुखण्यामुळे त्यानेही माघार घेतली. गेल्या वेळच्या आशियाई स्पर्धेतील 11 पदकविजेते यंदाही स्पर्धेत होते. यातील सहा जणांनी पुन्हा पदके जिंकली. मात्र, जागतिक अ‍ॅथलेटिक्समधील विक्रमांशी बरोबरी करणारी कामगिरी पुण्यात कोणीच केली नाही. आशियाई चॅम्पियनशिपमध्येच यापूर्वी नोंदले गेलेले 8 विक्रम यंदाच्या खेळाडूंनी मागे टाकले. यात एकही भारतीय खेळाडू नाही. उलट डोपिंग टेस्टमध्ये नापास झाल्याने गोळाफेकीतील महिला खेळाडूला माघार घ्यावी लागली. अ‍ॅथलेटिक्समधील हिरा गवसला, असे म्हणण्याची संधी आशियाई चॅम्पियनशिपने भारताला दिली नाही. आशियाई अ‍ॅथलेटिक्समधील सत्ताबिंदू अरब राष्ट्रांकडे सरकला आहे. याची चुणूक कतारच्या हमाद यांनी लगेचच दाखवली. पुढील स्पर्धेच्या यजमानपदावर चीनचा नैसर्गिक दावा आहे, परंतु दोहानेही यात रस दाखवल्याने हमाद यांनी निर्णयच लोंबकळत ठेवलाय. अ‍ॅथलेटिक्सच्या मैदानात भारतीय खेळाडूंनी कधीच दादागिरी गाजवली नव्हती; परंतु कलमाडींच्या रूपाने आशियातील सर्वोच्च संघटना भारताच्या ताब्यात होती. कलमाडींच्या जाण्याचे दु:ख नसले तरी भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या घटलेल्या वजनाची चिंता करावी लागणार आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज, ‘ग्लॅमर’ आणि प्रायोजक मिळवून देणा-या नेतृत्वाचा शोध आता भारतीय अ‍ॅथलेटिक्सला असेल.