आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनची तिरकी चाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये पकडलेल्या दहशतवाद्याजवळून चिनी बनावटीचा शस्त्रसंभार हस्तगत; हिंदी महासागरात चिनी पाणबुड्या तैनात, गॉब्दर बंदर 50 वर्षांच्या भाडेपट्टीने पाकिस्तानने चीनला दिले. अक्साई-चीन-तिबेट-बाल्टीस्थानमार्गे चीनची रेल्वे धावणार, या सर्व बातम्यांचा मथितार्थ चीन पाकिस्तानला (मित्राला) मदत करतो आहे का भारताला पूर्वोत्तर सीमेवर घेराव घालतो आहे?

कारण 1952 पासून चीन दुर्लक्षित असलेल्या नेफा (अरुणाचल) भागात रस्ते बांधणीचे काम निर्धोकपणे पार पाडतो आहे. 1955 च्या प्रारंभी पक्के व लष्करी वाहनास ये-जा करण्यास योग्य असे चीनने 750 मैल लांबीचा रस्ता - ज्यातील 112 मैलाचा भाग हिंदुस्तानी भूप्रदेशातून बांधून काढला. तेव्हा तत्कालीन केंद्रीय सरकारने ‘निषेध खलिता’ पाठवला. तेव्हा त्याला उत्तर मिळाले ‘आम्ही जुनेच रस्ते पुनरुज्जीवित करत आहोत. त्या भागातील नकाशे चुकीचे आहेत. ते पुनर्मुद्रित होतील.’ पंचशील कराराची शाई वाळण्यापूर्वीच चाऊ आणि माऊ यांनी नेहरूंचा विश्वासघात करत भारताला कोंडीत गाठले. गुपचूप पाकिस्तानच्या लष्करी सत्तेबरोबर ‘सिनो-पाक बॉर्डर पॅक्ट’ करून अरुणाचल त्यांचा (चीनचा), हे वदवून घेतले, तर पूर्ण काश्मीर तुमचा (पाकचा), हे ठरवून टाकले. याचा अर्थ चीन बोलतो एक आणि करतोच दुसरे, वागतो तिसरे, असा आहे.

काही दिवसांपूर्वी घुसखोरीतून माघार घेत चीनने चिनी पंतप्रधानांच्या भेटीत विघ्न नको म्हणून नमते घेतले, पण ते पंतप्रधान पाकिस्तानमधून चीनमध्ये परतण्यापूर्वी परत ‘फिंगर आठ’ या भागात चीनने नुसती घुसखोरीच केली नसून तेथील सीमेलगतच्या भागात, म्हणजे भारतीय हद्दीत 5 किलोमीटरचा रस्ता बांधून काढण्याचे 14 कोअरच्या गस्तीमध्ये उघड झाले. हा ‘श्रीजाप’ नावाने ओळखला जाणारा भाग लडाखमध्ये आहे. Line of supply/logistic support च्या दृष्टीने असे रस्ते आणीबाणीच्या काळात फार उपयोगी ठरून महत्त्वाची कामगिरी बजावतात. गेल्या काही वर्षात चीनची घुसखोरी करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. पंतप्रधानांच्या भेटीच्या अगोदरच हे प्रकार वाढीस लागले होते. मात्र, चीनचे पंतप्रधान भारत दौर्‍यावर येताना पुन्हा माघारी गेल्याचे चित्र निर्माण करून भारताला दिलासा दिला खरा; परंतु भारताने यात समाधान व्यक्त करून चालणारे नाही. भारताने चीनवर अंधविश्वास टाकण्याचे दिवस आता संपले आहेत आणि सतत दक्ष राहिले पाहिजे. अन्यथा चीन मोठ्या प्रमाणावर आपला प्रदेश कधी बळकावेल ते कळणारदेखील नाही. महत्त्वाचे म्हणजे भारतानेही चीनचे सैन्य बलाढ्य असले तरी अजिबात त्यांना घाबरता कामा नये. आपणही चीनच्या या छुप्या लढाया परतवण्यासाठी आपल्या सैन्याला सतत दक्ष ठेवले पाहिजे.

ही घुसखोरी हळूहळू होत असून भारतीय हद्दीमधल्या दगडावर Army China असे लिहून चिनी सेना भारतीय गुराखी, सामान्य जनतेला मारून परतत असत; परंतु आता ‘सडक व रेल यातायात मजबूत’ करत तो भाग हळूहळू गिळंकृत करत आहे. पाकिस्तान, म्यानमार (बर्मा), बांगलादेश, श्रीलंका यांच्या समुद्री भागात बेटे, बंदरे वापरून चीन भारतीय उपखंडात आपली पाळेमुळे घट्ट करत आहे. चीन पूर्वोत्तर सीमाभागात सर्वतोपरी आपले पाय घट्ट करत आहे, तर भारतीय विकासाची गती ‘आस्ते कदम’ म्हणजे कूर्मगतीने चालू आहे. या भागात भारताने 2012 पर्यंत 12 हजार किलोमीटरपेक्षा जास्त 266 रस्ते बांधण्याचे ठरवले होते. यातील 80 टक्के योजना अद्याप बासनात गुंडाळलेल्या असून 188 योजना सुरूच झालेल्या नाहीत, तर 78 योजना अर्धवट, अपूर्ण आहेत. कारण सर्व राजकीय पक्ष ‘2014 ची निवडणूक’ या एकाच विषयाने झपाटलेले असतील. मग रस्त्यांची, विशेषत: सीमेलगत काश्मीरमधील सुर्कादू व बर्माशी जवळ असलेल्या कुनसिंग अशा दूरस्थ भागात चीन आधारभूत गरजा, युद्धजन्य काळातील गरजांवर भर देत दक्षिण आशियावर आधिपत्य गाजवू पाहत आहे. तिबेटमधील महामार्ग चौपदरी करण्यात आले असून 1962 मध्ये गिळंकृत केलेल्या अक्साई चीनवर चीनचा ‘खडा पहारा’ आहे. आजवरची चीनशी आपली मैत्री ही खर्‍या अर्थाने व्यावसायिक पातळीवरील राहिली आहे. एक विश्वासू शेजारी म्हणून आपण चीनच्या भरवशावर राहू शकत नाही. ही वस्तुस्थिती मान्य करून आपण भविष्यात वाटचाल करणे योग्य ठरेल.

भारताची दोन हजार मैलांपेक्षा थोडी कमी आंतरराष्ट्रीय सीमा मानावयास तयार नसलेला चीन एक परिपक्व युद्धनीती अवलंबून भूप्रदेश आणि जलक्षेत्रावर आपले फासे घट्ट करण्यात गुंतला आहे, तर भारत चीनच्या या तिरक्या चालीकडे डोळेझाक तर करत नाही ना? कारण वरील सर्व बातम्या माझ्या सैनिकी मनाला म्हणताहेत, इशारा देताहेत की, राजा जागा राहा, रात्र वैर्‍याची आहे.