आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chitra Mudgal Article About Hindi Poet Kedarnath

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वास्तववादी कवितेचा यथोचित गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यास सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार असे विविध सन्मान मिळवणारे ज्येष्ठ हिंदी कवी केदारनाथ सिंह यांना नुकताच अत्यंत मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने साहित्यिक चित्रा मुद्गल यांनी घेतलेला धांडोळा...

कविता हा अत्यंत अवघड आणि वळणावळणाने रचला जाणारा साहित्यप्रकार आहे. त्याद्वारे व्यक्त होणे तर कठीणच; पण कविता समजून घेणे त्याहून अवघड, असे ढोबळमानाने कविता हा प्रकार साहित्यात रुजल्यापासून अनेक जण विधान करत असतात. ओंजळभर पाण्यामध्ये समुद्राला सामावून घेण्याची ताकद कवितेमध्ये असते, ती कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थ साठवण्याच्या क्षमतेमुळे. याच क्षमतेच्या जोरावर काही कवी कवितेच्या अज्ञात प्रदेशाला सामाजिक भान देत लोकांमध्ये त्यांची कविता नुसती पोहोचवत नाहीत, तर ती भिनवतात, त्यांना ती कविता आपलीच वाटावी इतकी सहज ते कवितेची संवेदनशील रचना करतात आणि या अत्यंत नाजूक पण तितक्याच खंबीर असलेल्या साहित्यप्रकाराला समृद्ध करतात. या समृद्धीत एक विलक्षण वेगळे असे योगदान देणारे कवी म्हणजे ज्येष्ठ कवी केदारनाथ सिंह. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे हा त्यांच्या कवितेबरोबरच त्यांच्या समाजाभिमुख संवेदनशीलतेचा सन्मान आहे.

कवीला आपल्याकडे आत्मकेंद्री, कोशातून जगाकडे पाहणार्‍या वृत्तीचा कवी असे म्हणण्याची ठरावीक वर्गात एक परंपरा आहे. कविता आस्वादकाच्या पातळीवर वाचणार्‍यांमध्ये हे प्रमाण अधिक असते. कवितांची मंचीयता आणि त्यातून काही क्षण फुटणारे निखारे असाच काहीसा कवितेचा स्वभाव असतो, अशी आस्वादकाच्या भूमिकेतल्या वाचकाची धारणा असते. ही धारणा मोडीत काढण्याचे काम समकालीन कवी उत्तमरीत्या करत आहेत. त्यातील एक बुजुर्ग व्यक्तिमत्त्व म्हणून केदारनाथ यांचे अत्यंत आदराने नाव घ्यावे लागेल. त्यांच्या कवितेचा केवळ आस्वाद घेण्यापुरते आपण मर्यादित नाही. ती आपण रोजच्या जीवनात अनुभवत असतो. ही अनुभूती फार कमी कवींच्या कवितेत आढळते. कपोलकल्पितामध्ये रमणारी कविता आणि दृश्यात्मक प्रतिमांमधून वास्तव जीवनातील अनुभव रेखाटणारी कविता यात फार मोठा फरक आहे. साहित्यमूल्याच्या पातळीवर कल्पनाविहारात रमणार्‍या कवितेचे जे स्थान आहे ते वाचनपातळीवर वाचक रोजच्या वास्तव जीवनाशी न जोडता त्याच्या स्वप्निल विश्वाशी जोडतो. अनुभव रेखाटणारी कविता मात्र वाचकाच्या खर्‍या आयुष्याशी जोडली जाते. त्यामुळे सर्वार्थाने अनुभव व अनुभवाच्या पातळीवर अत्यंत सहज भाषेत अभिव्यक्ती करणार्‍या त्यांच्या कवितांनी केवळ हिंदी साहित्याला श्रीमंती दिली नाही, तर वाचकालादेखील आपल्या बुकशेल्फपासून हृदयापर्यंत, रोजच्या जगण्यात सामावून घ्यावीशी वाटेल अशी देण केदारनाथ यांनी दिली आहे.
‘पानी में घिरे हुए लोग
प्रार्थना नहीं करते
वे पुरे विश्वास से देखते हैं पानी को
और एक दिन
बिना किसी सूचना के
खच्चर बैल या भैंस के पीठ पर
घर-असबाब लादकर
चल देते हैं कहीं और’

‘पानी में घिरे हुए लोग’ या केदारनाथांच्या या कवितेतील ओळी सहजभावाभिव्यक्तीचे उत्तम उदाहरण आहेत. सर्व जीव जगण्याच्या ईर्षेने व मृत्यूच्या भयानेच कुठल्याही संकटातून स्वत:ला वाचवण्याचा मार्ग काढत असतात. वरील कवितेतून केदारनाथ यांनी हे वास्तव मांडले आहे. नदीला पूर येतो तेव्हा पाणी वाहून गेल्यानंतर माणसासह सगळेच झाडाच्या फांद्यांचा आधार घेतात. एका फांदीवर माणूस असतो, दुसर्‍यावर साप. दोघांना जीव वाचवायचा असतो. एरवी हाच साप माणूस आपल्याला मारेल या भीतीने दंश करत असतो. जगण्याच्या संघर्षाने ही वृत्ती सगळ्याच जीवांमध्ये निर्माण झालेली असते. त्यामुळे काहीही झाले, पुरामुळे भलेही वीतभर जमिनीचा तुकडा उरला, तरी सर्व सजीव त्यातही स्वत:ला जगवण्याची धडपड करतात, हे वैश्विक सत्य कवितेतून सांगताना त्यांनी जीवाजीवांमधील अंतर्विरोधही मोजक्या शब्दांमध्ये मांडण्याचे सामर्थ्य दाखवले आहे. त्यांनी ‘नक्शा’ या आपल्या कवितेत आपल्या मूळ गावाला शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ शोधताना आपण आपल्यापासूनच किती दूर आलो आहोत, भौतिक, मानसिक कितीतरी सीमा, मर्यादा आपण आपल्यावर लादल्या आहेत हे या कवितेतून व्यक्त करताना केदारनाथ यांनी जगभरातील माणसाचे बदलते चित्र मांडले आहे. त्यामुळे त्यांची कविता ही केवळ एका पानापुरती, एका क्षणापुरती, नजरेखालून घालण्यापुरती मर्यादित राहत नाही. कवीच्या स्वतंत्र, आत्मनिष्ठ आणि प्रगल्भ परिप्रेक्ष्यातून जग अनुभवण्याची व्यापकता केदारनाथ यांच्या कवितांमधून समजून घेता येते. त्यांचा ‘बाघ’ हा दीर्घकवितासंग्रहदेखील याच प्रगल्भतेचे एक उदाहरण.
‘कथाओं से भरे इस देश में
मैं भी एक कथा हूँ
एक कथा है बाघ भी
इसलिए कई बार
जब उसे छिपने को नहीं मिलती
कोई ठीक-ठाक जगह
तो वह धीरे से उठता है
और जाकर बैठता है
किसी कथा की ओट में’

‘बाघ’ या कवितासंग्रहातील ‘कथाओं से भरे इस देश में’ या कवितेतील या काही ओळी. शहरात रात्री वाघ येतो अशी बातमी सकाळी घराघरात पसरते, वाघाला रात्री कुणी पाहिलेलेही नसते या आशयाचा धागा घेऊन कवितासंग्रहात चार कविता केदारनाथ यांनी गुंफल्या आहेत. अफवा आणि त्यातून निर्माण होणार्‍या कथा याचबरोबर माणसाचे इतरांच्या जगण्यावर होणारे आक्रमण हा वरवर पाहता चटकन लक्षात येणारा या कवितांचा आशय. मात्र, त्यातून केदारनाथ यांनी मानवी समूहाची सामूहिक स्वभावाची चपखल अनुभूती वाचकाला दिली आहे. त्यातून त्यांनी सामान्य माणसाचे जीवन हे कवितेच्या किती निकट आहे याचीच वारंवार प्रचिती दिली आहे.

‘अकाल में सारस’ हा केदारनाथ यांचा माझा अत्यंत आवडता कवितासंग्रह. अनेक भारतीय भाषांमध्ये ही कविता अनुवादित झाली आहे. ‘धान उगेंगे की प्राण उगेंगे, आना भी बादल जरूर,’ यासारख्या ओळींमधून केदारनाथ यांनी जलतत्त्व मांडले आहे. खरे तर शेतातही प्राणच जन्माला येतो. माणूस काय, धान्य काय सगळ्यांसाठी पाणी हे जीवन आहे. ‘जल ही अन्न का रूप है, जल ही छाया है, जल ना हो तो ये धरती फट जायेगी’ हे मूळ वास्तव ‘अकाल में सारस’सारख्या कवितांमध्ये केदारनाथ यांनी रेखाटले आहे. त्यांच्या कविता असोत वा ‘मेरे समय के शब्द’सारखे ललितसंग्रह असोत, लयबद्ध शैलीमध्ये चौकटीबाहेरचे जग शब्दांमध्ये आविष्कृत करण्याची त्यांची प्रतिभा अपार आहे.
त्यांची हिंदीविषयीची म्हणजेच मातृभाषेविषयीची विचारधारादेखील समकालीन पिढीला विचार करायला लावणारी आहे. ‘मेरी भाषा के लोग’ या कवितेत ते म्हणतात,
‘पिछली रात मैने एक सपना देखा
की दुनिया के सारे लोग
एक बस में बैठे हैं
और हिंदी बोल रहें हैं’

एका आपल्या मातृभाषेवर नितांत प्रेम करणार्‍या आणि त्यातून निर्मिती करणार्‍या कवीची ही भाबडी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, पण केवळ इथपर्यंत न थांबता अगदी बोलता बोलता नकळत टपली मारून जावे व ती खाणार्‍या माणसाला ते क्षणभरानंतर कळावे अशा पद्धतीने ते भाषिक दौर्बल्य व मरगळ आलेल्या सद्य:स्थितीवर याच कवितेतून भाष्य करतात. केदारनाथ यांनी आपल्या साहित्याला विशिष्ट मर्यादेपर्यंत बांधून घेतलेले नाही. त्यांचा स्वत:चा साहित्याचा व्यासंग त्यांच्या साहित्यनिर्मितीतून दिसतो, ज्याला विद्वत्तेपेक्षाही सामान्य माणसाच्या विचारधारेचा, जगण्याचा अधिक संदर्भ आहे त्यांनी स्वत: माझ्या ‘आवाँ’ या कादंबरीचे नामकरण केले होते. त्यांच्याशी या कादंबरीला शीर्षक देण्यासंदर्भात माझा संवाद झाला होता. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, ‘माँ की कोख कुंभार का आवाँ’ या म्हणीचा संदर्भ बोलण्यात आला, त्या वेळी ‘आवाँ’ हेच नाव मी कादंबरीचे ठेवावे, असे केदारनाथ यांनी सुचवले होते. या शब्दाचा एकच अर्थ पंजाबी, मल्याळम व इतर काही भाषांमध्ये होतो. केदारनाथ यांच्या या सूचनेमुळे मला माझ्या कादंबरीचा भाषिक परीघ ओलांडून सगळ्यांशीच समान धागा जोडता आला. केदारनाथ यांच्या स्वरचित साहित्याचीही हीच तर खरी प्रतिभा आहे, जी भाषेच्या पलीकडे जाऊन, प्रादेशिकताही ओलांडत मानवीय पातळीवर समाजाशी जोडली जाते. या प्रतिभेचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव होणे हा केवळ हिंदी साहित्याचा नाही, तर एका मानवीय संवेदनशीलतेचा गौरव आहे.

शब्दांकन - प्रियांका डहाळे