24 डिसेंबरच्या मध्यरात्री तारणहार येशूचा जन्म झाला. यालाच आपण ख्रिस्तजयंती किंवा ‘नाताळचा सण’ असे म्हणतो. नाताळ म्हणजे केवळ येशूचा जन्मदिन नाही, तर आमच्या तारणाची सुरुवात आहे. आमच्या तारणासाठी त्याने आपला प्राण अर्पण केला. येशूच्या रक्तानं तारणाचं दार उघडलं. आपण अनेक शतकानुशतके ख्रिस्तजयंती साजरी करत आहोत. पण प्रियजनांनो ह्या ‘ख्रिस्तजयंती’ साजरी करण्याच्या उद्देशाला आपण समजून घेतले आहे का? हा सण साजरा का करावा? हे सहजासहजी मनात येणारे प्रश्न आहेत.
भारत हा विविध जाती, भाषा, वेशभूषेने नटलेला देश आहे. येथे प्रत्येक व्यक्ती हा संस्कृतीची जोपासना करतो. याला ख्रिस्ती धर्मही अपवाद नाही. म्हणून ‘ख्रिस्त जयंती’ हा ख्रिस्ती धर्मात महत्त्वाचा सण मानला जातो. ह्या दिवसाची आपण वाट बघत असतो. ‘ख्रिस्तजयंती’ हा सण आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणून पाळला जातो. डिसेंबर जवळ आला की आम्ही आपल्या घरादाराची स्वच्छता करतो, रंगरंगोटी करतो. नवीन कपडे आणतो. खाण्यासाठी फराळाचे विविध प्रकार बनवतो व आपला आनंद व्यक्त करतो. पवित्र धार्मिक सण साजरा करतो. या सणामध्ये प्रामुख्याने चार गोष्टी बघण्यास मिळतात. 1) स्वच्छता 2) सुंदरता 3) शिस्त 4) शांतता .... आमच्या ख्रिस्तजन्माचा आनंद इतरांसाठी आदर्श बनू शकतो. देव आपल्या जीवनात अनेक आनंदाचे प्रसंग देतो. आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, मानसिक इ. ‘ख्रिस्तजयंती’ ख्रिस्त जन्माचा आनंद त्यापैकी एक आहे.
दाविदाच्या नगरात आमच्यासाठी उद्धारक जन्माला आहे. तो आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे, पापापासून पुण्याकडे, वाइटांपासून चांगुलपणाकडे, मृत्यूकडून जीवनाकडे त्याचबरोबर एकमेकांबरोबर स्नेहभाव-बंधुभाव, प्रेम-दया क्षमा शांती निर्माण करण्यासाठी तो या जगात आला. येशू या जगात आला व त्याने आम्हाला क्षमा शिकवली. प्रथम आमच्या पापाची क्षमा केली. आमच्या उद्धारकाने क्षमेविषयी केवळ शिक्षण दिले नाही तर क्षमेचे भव्यदिव्य दर्शन आम्हाला घडवले. देव क्षमा करणारा आहे त्याची प्रचिती पवित्र शास्त्रात ठिकठिकाणी येते. जे दयाळू ते धन्य, कारण त्याच्यावर दया होईल असे येशू म्हणत असे. जर आम्ही दुसर्यांना क्षमा केली तर देवपिता आम्हाला पण क्षमा करील व आमच्यावर त्याची दया होईल. ख्रिस्त संत पेत्राला म्हणतात... सातशे सत्तर वेळेस क्षमा कर! देव क्षमाशील आहे. क्षमा ही परमेश्वराने आमच्यासाठी दिलेली देणगी आहे. तो देवपुत्र असतानादेखील आमच्याबरोबर तो सदैव असतो.
प्रियजनांनो! आपण ख्रिस्तजयंती ही आनंदाचे प्रतीक, आनंदाचा सण म्हणून साजरी करतो. ख्रिस्तजयंती ही बाह्य सजावटीसाठी नाही असे मला वाटते. ती खरी आध्यात्मिक आहे. नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा क्षण, कष्टकरी लोकांचे ओझे हलके करण्याचा सण, रंजल्या-गांजल्यांना दिलासा देण्याचा सण. तसेच नाताळ म्हणजे पकडून नेलेल्यांची सुटका करणे, अंधांना दृष्टिलाभ होण्याचा सण. नाताळ म्हणजे पुनरुत्थानाचा प्रारंभ होय. जर आम्ही पापापासून पुण्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मरणातून जीवनाकडे, नरकातून स्वर्गाकडे वाटचाल करत आहोत, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालत आहोत, तरच आम्ही खर्या अर्थाने येशूला स्वीकार केले आहे. आमचे शरीर हे देवाचे मंदिर आहे. तर तो आमच्या जीवनाचा चालक-पालक आहे. ख्रिस्तजयंतीला गव्हाणीतले बालक म्हणून ख्रिस्ताला पाहायचे नाही, तर तो आमच्या अंत:करणात जन्मला आहे. हाच खरा नाताळ.
आमच्यातला ख्रिस्त आम्हाला जगाला दाखवता आला पाहिजे. आपण जगाचे मीठ व प्रकाश आहोत हे ख्रिस्तजयंतीच्या माध्यमातून सर्वांना सांगता आले पाहिजे. हीच खरी ख्रिस्तजयंती. बंधूंनो! येशूच्या आध्यात्मिक ज्ञानाने ज्योतीने ज्योत पेटवू, दिव्याने दिवा पेटवू संपूर्ण वातावरण ख्रिस्तमय करू! या नाताळात आपण येश ख्रिस्ताच्या मागे जाऊन आपल्या आयुष्याचे
सोने करूया!