आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिनेमा 100’ मधून भविष्याचा वेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल या संस्थेतर्फे ‘सिनेमा 100 : द नेक्स्ट वेव्ह’ हा दोन दिवसांचा उद्देशपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सुभाष घई, अंजुम राजाबली व सलीम खान यांनी पटकथा लेखनाविषयी आपले अनुभव सांगत मार्गदर्शन केले. दुपारी गौरी शिंदे, अनुराग बासू, अमोल गुप्ते व विक्रमादित्य मोटवाने या नामवंत दिग्दर्शकांबरोबर संवाद साधण्यात आला. चित्रपट का बनवावासा वाटतो पासून ते आर्थिक गणिते, नव्या लोकांना संधी कशी मिळू शकेल अशा सर्व प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. चित्रपट व चित्रपटसृष्टीच्या भविष्याविषयी मते व्यक्त केली.

विशाल भारद्वाज या निर्माता दिग्दर्शकाची मुलाखत झाली. त्यांनी आपला प्रवास कसा झाला ते सांगितले, पण एक गंभीर प्रकृतीचा व वेगळे चित्रपट देणारा दिग्दर्शक व संगीतकार अशी त्यांची ख्याती असल्याने त्यांचे विचार जाणून घेऊ. संगीतकार म्हणून मेहंदी हसन हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. तसेच आमिरखॉँसाहेब व बडे गुलामखॉँ यांचेही नाव ते आदराने घेतात. त्यांच्या मते चित्रपट भलेही वाईट असेल, पण संगीत मात्र नेहमीच चांगले राहिले आहे.

विशालच्या चित्रपटातून मुसलमानी वातावरण हुबेहूब असते व अनेकदा असते याबाबत ते म्हणाले, माझे बालपण मेरठमध्ये गेले. तिथे अनेक मित्र मुसलमान होते आणि तिथेच हिंदू- मुसलमान दंगेही होत, पण उर्दू भाषेचे प्रेम ही मेरठची देणगी. मकबूल चित्रपट केला तो यामुळेच. चित्रपटातील शिव्याबाबत ते म्हणतात आपल्याकडे दांभिकता आहे, त्यामुळे जसे लोक बोलतात तसे दाखवता येत नाही. तसे दाखवणारा बॅँडिड क्वीन हा एक माइल स्टोन चित्रपट होता, नंतर तसा आलाच नाही. तसेच स्वत:ला काही सांगायचे आहे म्हणून पात्रांच्या तोंडात ते संवाद कोंबू नका हे महत्त्वाचे तत्त्व त्यांनी सांगितले. ही चूक अनेकजण करत असतात! दुसरे तत्त्व म्हणजे चित्रपटात सगळी पात्रे मिळून एकच गोष्ट सांगत असली तरी ती अशा पद्धतीने सांगा की त्यात संघर्ष आहे, असे वाटले पाहिजे. त्यांच्या चित्रपटात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असते. कारण स्त्रियांना कमी एक्स्प्लोअर केलेले आहे आणि त्या जास्त इंटरेस्टिंग असतात, असे ते म्हणाले. ओमकारामधील सैफ अली खान असेल किंवा कमीनेमधील शाहिद कपूर, प्रत्येक अभिनेता विशाल यांच्याकडे काम करताना झळाळून उठतो, त्याची तारीफ होते. कारण, हे अभिनेते त्यांच्याकडे स्वत:ला पूर्ण सरेंडर करतात, एक एक महिना तयारी करतात. विशालना मेन स्ट्रीममध्येच राहायचे आहे, आर्ट फिल्मची वाट धरायची नाही आणि आता व्यावसायिक प्रेशर कमी आहे, असे ते म्हणतात.

राज कपूरचा मेरा नाम जोकर चालला नाही याची त्यांना खंत वाटते. त्यात पुरेपूर पॅशन होती. इंडल्जन्स होता, पण चित्रपट चांगला होता. तो चालला असता तर ट्रेंड बदलला असता असे त्यांना वाटते. दुसºया दिवशी सुरुवातीला चित्रपटांमधील गाणी आणि त्या गाण्यांचा दर्जा या विषयावर जावेद अख्तर यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यांचे विचार त्यांच्या शब्दात -‘जगातील इतर कोणत्याही भाषेतील चित्रपटांत गाणी नसतात, पण आपल्याकडे ती असतात याचे कारण लोकनाट्य, नाटक यात गाणी होती आणि तिच परंपरा आपण पुढे सुरू ठेवली. आता नवे दिग्दर्शक आलेले आहेत त्यांच्यावर पाश्चात्त्य तंत्राचा प्रभाव आहे, त्यामुळे गाणी त्यांना नको आहेत, पण सोडवत नाहीत अशा त्रिशंकू अवस्थेत काहीजण आहेत. त्यामुळे गाणी असतात, पण पाश्वर्भूमीला. भारतीय चित्रपटात गाणी असतात म्हणून त्याला एकदम टाकाऊ ठरवणे किंवा ते वास्तववादी नसतात म्हणणे योग्य नाही. मुळात कला म्हणजे तंतोतंत वास्तव नसतेच. तसेच आता अजूनही गाणी असतात याचे एक मुख्य कारण निखळ व्यावसायिक आहे. या गाण्यांपासून निर्मात्याला भरपूर उत्पन्न मिळते. त्यामुळेच आता रिंगटोनसाठी गाणी बनतात. गीतलेखनाच्या दर्जा घसरला आहे कारण एकूणच भाषेविषयी कोणाला आस्था राहिलेली नाही. गरीबवर्गातील मुले तेवढी मातृभाषेतून शिकतात आणि इतर सर्व इंग्लिश माध्यमातून. साहित्य निर्मिती केली ती मध्यमवर्गाने, पण आता त्याने ते नाते तोडून टाकले आहे’ चित्रपटांच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना भारतीय चित्रपट सध्या नेमक्या कोणत्या स्थितीत आहेत, जागतिक चित्रपटांच्या तुलनेत आपण नेमके कोठे आहोत, भविष्यात काय केले पाहिजे याची या वेळी झालेली चर्चा मोलाची होती.
(kuluday@rediffmail.com)