आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ प्रतिमेचा दिलदार प्रशासक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटशी समरस होऊन संघटनेच्या विविध भूमिका बजावणारे फारच कमी क्रिकेट प्रशिक्षक झाले. जयवंत लेले हे अशाच दुर्मिळ प्रशासकांपैकी एक होते. त्यांनी तब्बल चार दशके वेगवेगळ्या संघटना आणि पदांवर राहून क्रिकेटशी कायम जवळीक साधली. बडोदे क्रिकेट संघटनेवरून सुरू झालेला त्यांचा क्रिकेट व्यवस्थापन, प्रशासन व्यवस्थेमधील प्रवास बीसीसीआयच्या सचिवपदापर्यंत येऊन थांबला. मात्र, ते अखेरपर्यंत स्वस्थ बसले नव्हते. अगदी अखेरच्या क्षणी अमृतमहोत्सवी सत्कार स्वीकारल्यानंतरही त्यांच्यातली क्रिकेटला मदत करण्याची ऊर्मी संपली नव्हती. किरण मोरेंबरोबर भारतीय क्रिकेटच्या भवितव्याबद्दल बोलत बोलतच ते घरी आले. त्याच वेळी मृत्यूने त्यांना गाठले.


क्रिकेट प्रशासन व्यवस्थेतला हा माणूस सर्व क्रिकेटपटूंना कायम जवळचा वाटला. त्यापेक्षाही त्याची जवळीक सर्व प्रसिद्धी माध्यमांशी होती. क्रिकेटपटूंप्रमाणे ‘मीडिया’लाही जयवंत लेले हा आपला माणूस वाटायचा. कारण प्रसिद्धी माध्यमांना त्यांच्याकडून कायम बातम्या मिळत असायच्या. त्यामध्ये चलाखी नसायची, लबाडी नसायची, फसवणूक नसायची. ते नेहमी सत्य सांगायचे. बिनधास्त बोलायचे. बातमी व्यवस्थित सांगायचे. ते कोणत्याही पदावर असोत, वरिष्ठांना किंवा अन्य कुणालाही ते कधी घाबरले नाहीत. कारण ते भ्रष्ट नव्हते. भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर कुणी करू शकत नव्हता. त्यामुळेच त्यांना डाफरण्याची हिंमत कुणीही दाखविली नाही. बडोदा क्रिकेट संघटनेवर असताना भिन्न विचारसरणीच्या महाराज दत्ताजीराव गायकवाड यांच्याशीही त्यांचे जमायचे. क्रिकेट बोर्डावर कार्यरत असताना त्यांनी विविध भूमिकांमधून एन. ए. चिदंबरम, एन. चिन्नास्वामी, फत्तेसिंहराव गायकवाड आणि जगमोहन दालमिया यांच्यासारख्या रथी-महारथी अध्यक्षांबरोबर सहज काम केले. विजय हजारेंपासून आजच्या सचिन तेंडुलकरच्या पिढीपर्यंतच्या क्रिकेटपटूंशीही त्यांची तेवढीच जवळीक होती. भारतीय क्रिकेटमधील सट्टेबाजीचा सर्वप्रथम गौप्यस्फोट झाला. त्या वेळी बीसीसीआयच्या सचिवपदी जयवंत लेले होते. त्यांनी त्या कठीण कालखंडात प्रसिद्धीमाध्यमे, सरकारी यंत्रणा आणि भारतीय क्रिकेटरसिक यांना कल्पकतेने हाताळले. आजच्या प्रमाणे हतबल झालेले पदाधिकारी त्या काळात नव्हते. लेले यांनी भारतीय जनतेचा क्रिकेट या खेळाच्या पावित्र्यावरील विश्वास ढळू दिला नाही. त्या कठीण कालखंडातही आजच्या पदाधिका-यांप्रमाणे ते प्रसिद्धी माध्यमांपासून दूर पळाले नाहीत. उलट त्यांनी स्वत:हून प्रसिद्धिमाध्यमांना माहिती दिली. ज्या गोष्टी सांगता येणार नव्हत्या त्या सांगितल्या नाहीत. मात्र, कधी कधी काही बाबतीत अधिक स्पष्टवक्तेपणा दाखविला. भारतीय क्रिकेट संघाच्या 1999च्या ऑस्ट्रेलिया दौ-याच्या वेळी आपल्या संघाचे 0-3 असे पानिपत होणार, असे बिनधास्तपणे सांगणारा जगातील हा एकमेव क्रिकेट बोर्डाचा सचिव असावा. लेले यांचे भाकित नंतर खरे ठरले. प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी अशा घटनांनंतर व्यवस्थित माहिती दिली. त्यांच्या आधीचे पदाधिकारी आणि आजचे बीसीसीआयचे अधिकारी ज्या पद्धतीने प्रसिद्धी माध्यमांपासून पळ काढतात, ते पाहिल्यावर लेले यांच्या धाडसाचे अधिक कौतुक करावेसे वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे, लेले स्वत: साफ, स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी होते, भ्रष्टाचारात त्यांचे हात कधीच गुंतलेले नव्हते त्यामुळे इच्छा असूनही प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देणा-या लेलेंना रोखण्याची हिंमत कोणत्याही पदाधिका-याने दाखविली नाही. मदत करणे हा लेलेंचा स्थायीभाव होता. त्यामुळे प्रत्येक उदयोन्मुख क्रिकेटपटूंना लेले यांची उपस्थिती म्हणजे एक आधार वाटायची.


अंशुमन गायकवाडपासून संजय मांजरेकरपर्यंतच्या खेळाडूंना त्यांनी भारतीय संघाच्या मांडवाखाली आणले. कप्तान किंवा निवड समितीला काही गोष्टी अडचणीच्या वाटायच्या, तेथे लेलेंचा अनुभव आणि सल्ला मदतीला यायचा. संजय मांजरेकरला संघात आणण्यासाठी लेलेंनीच कप्तानाला कानमंत्र दिला होता. लेलेंनी मदतीच्या या गोष्टी मात्र कायम गुलदस्त्यात ठेवल्या. त्यांनी केलेल्या मदतीची कधी बढाई मारली नाही. त्यामुळे ज्यांना लेले जवळून ज्ञात नव्हते, त्यांना ते कधीच कळले नाहीत. किरण मोरे या बडोद्याच्या क्रिकेटपटूला त्यांनीच वरचे क्रिकेट चढण्याची शिडी दाखविली. मात्र, जेव्हा किरणने चुका केल्या तेव्हा त्याचे कानही त्यांनीच उपटले. तो राग न ठेवता किरण मोरेने त्यांच्याकडे या वेळीही मदतीसाठी धाव घेतली होती. लेलेंचे हेच मोठेपण आणि वेगळेपण होते. क्रिकेटपटू आणि पत्रकार यांना मदत करतानाही त्यांनी आपल्या पदाच्या जबाबदारीची चौकटही सांभाळली. लेले फार वरच्या दर्जाचे क्रिकेट खेळलेले नव्हते; परंतु तरीही त्यांना क्रिकेटपटूंचे दु:ख कळायचे. नवोदितांच्या किंवा संघाबाहेर फेकल्या गेलेल्या क्रिकेटपटूंच्या व्यथा कळायच्या. अशा गरजू क्रिकेटपटूंच्या खांद्यावर त्यांचा मदतीचा हात असायचा. त्यामुळेच लेलेंनी मदत न केलेले क्रिकेटपटूही त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे. ते क्रिकेटपटूंचे पदाधिकारी होते. क्रिकेटपटूंना जवळचे वाटणारे क्रिकेट बोर्डातील अधिकारी होते.