आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साफसफाईचे राजकारण ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताला भ्रष्टाचाराची कीड लागली असून या भ्रष्टाचाराचे खरे सूत्रधार संसदेत बसलेले लोकप्रतिनिधी आहेत, असा पवित्रा घेऊन दोन वर्षांपूर्वी अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण यांनी देशातील मध्यमवर्गात एकाएकी क्षोभ निर्माण केला होता. हा असंतोष इतका तीव्र आणि पराकोटीचा होता की, केंद्रातील यूपीए सरकार या दबावापुढे झुकून राजीनामा देऊ शकते, असे वातावरण निर्माण झाले होते. काही ज्येष्ठ पत्रकार, देशातील तमाम मीडिया हाउसेस, राज्यशास्त्राचे अभ्यासक, बिगर काँग्रेसवादाचे राजकारण करणा-यांना तर हे आंदोलन देशाचा दुसरा (की तिसरा?) स्वातंत्र्यलढा वाटू लागला होता. काहींना तर काँग्रेसची घटका भरत आली आहे, असे वाटू लागले होते. संसदेतील सर्व खासदारांना संसदीय लोकशाहीचे आता काही खरे नाही, याबाबत मनात पक्की खात्री झाली होती. परंतु भारतात लोकशाही नुसती नांदत नाही तर ती इथल्या मातीत खोलवर रुजली आहे, हे या आंदोलनाच्या निमित्तानेच पुन्हा दिसून आले. अण्णा आणि केजरीवाल टीमने निर्माण केलेला उन्माद काही दिवसांतच ओसरू लागला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जनतेनेच या आंदोलनाच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर नापसंती व्यक्त करण्यास सुरुवात केली. या आंदोलनाच्या निमित्ताने लोकनियुक्त सरकारविरोधात रचलेले गुप्त कट, छुपे अजेंडे जनतेला समजू लागले. भ्रष्टाचारमुक्त सरकार हे मतपेटीतून आले पाहिजे, असा सूर देशभर उमटू लागला. हा सूर म्हणजे संसदेवर, लोकप्रतिनिधींवर आंधळा विश्वास नव्हता, तर सर्वसामान्यांना संसदीय लोकशाही मूल्ये आणि देशाच्या सेक्युलरवादाच्या ढाच्याचे महत्त्व पटले होते. हा लोकदबाव टीम अण्णाला बॅकफूटवर घेऊन गेला आणि त्यांना आपल्या आंदोलनाचे राजकीय पक्षात रूपांतर करावे लागले. अण्णांच्या चळवळीत फूट पडली आणि अरविंद केजरीवाल प्रभृतींनी ‘आम आदमी पार्टी’ स्थापन करून निवडणुकीच्या माध्यमातून लढा करायचे ठरवले. बुधवारी निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला ‘झाडू’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. या झाडूच्या माध्यमातून आपण आता देशभर राजकारणातील साफसफाई हातात घेणार असल्याचे टीम केजरीवालने म्हटले आहे. या वर्षअखेरीस दिल्लीत विधानसभा निवडणुका होत असून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरोधात आम आदमी पार्टीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागा आहेत. या सर्व जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. आपल्या पक्षाचे उमेदवार सुसंस्कृत, स्वच्छ चारित्र्याचे, प्रामाणिक असतील, अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिली. झाडूच्या माध्यमातून भ्रष्टाचारी नेत्यांना सळो की पळो करून सोडणार असल्याचे केजरीवाल ठिकठिकाणी आपल्या प्रचारसभेत सांगत आहेत. आम आदमी पक्षाने दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातील पाणी समस्या, वीज समस्या, नागरी कामे यांना प्रामुख्याने लक्ष्य केले आहे. काही मतदारसंघांत या पक्षाने जनआंदोलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये राजकीय जागृतीही आणण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतील रिक्षा, टॅक्सी संघटना, मजूर संघटना, धान्य बाजारपेठ-कारखान्यातील कामगार, कष्टकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवून या पक्षाने आपली प्रचारमोहीम अधिक संघटित केली आहे. दिल्लीतील अनेक रिक्षांवर शीला दीक्षित-अरविंद केजरीवाल असा थेट प्रचारसामना दिसतो. एकंदरीत आम आदमी पार्टीच्या ‘दिल्ली में इस बार झाडू चलेगा,’ या लक्षवेधी घोषणेने दिल्लीतील निवडणुका रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. पण महत्त्वाची बाब अशी की, गेल्या काही दिवसांत काही वृत्तवाहिन्यांनी आगामी दिल्ली विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने सर्वेक्षण निकाल जाहीर केले होते. या सर्वेक्षणात आम आदमी पार्टीला काहीच स्थान नसल्याचे या वृत्तवाहिन्यांचे म्हणणे आहे. हे सर्वेक्षण निवडणुकांचे फड जेव्हा रंगू लागतील तेव्हा बदलू शकते. गेल्या वर्षी पक्ष स्थापनेवेळी आम आदमी पार्टीने देशातील जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ, अशी ग्वाही दिली होती. त्याचबरोबर आपला पक्ष सत्तेवर आल्यास एक पारदर्शी व प्रामाणिक सरकार देईल, असाही दावा केला होता. राजकारणात प्रामाणिकता आणि पारदर्शीपणा जपणे ही तारेवरची कसरत असते. स्वच्छ आणि प्रामाणिक कारभाराचा एक अर्थ असा होऊ शकतो की, प्रत्येक निर्णयामागची राजकीय गोळाबेरीज जनतेला सांगायला हवी व तिच्या मताने निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि राजकीय निर्णयासाठी या पक्षाला जनतेच्या दारात जावे लागणार आहे. थोडक्यात, प्रत्येक राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नांसंदर्भात या पक्षाला जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती अभियान घ्यावे लागणार आहे. (जनता भोळीभाबडी असते, असे या पक्षाचे म्हणणे आहे.) आम आदमी पार्टीचा हायकमांड संस्कृतीलाही विरोध आहे. म्हणजे पक्षामधील सर्व निर्णय सहमतीने घेतले जाणार आहेत. पक्षश्रेष्ठींच्या विरोधात बंड होण्याची परिस्थिती या पक्षात निर्माण होणार नाही. या पक्षाने अल्पसंख्याक, दलित, कष्टकरी वर्गांचे हितसंबंध राखले जातील, असेही आश्वासन दिले आहे. भारतीय राजकारणात जातीपातींना असलेले अनन्यसाधारण महत्त्व संपवून टाकण्याचा विडा या पक्षाने उचललेला आहे. त्यामुळे भविष्यात सामाजिक, आर्थिक प्रश्नांविषयी भूमिका घेताना या पक्षाला बरीच सावध पावले उचलावी लागतील. आम आदमी पार्टीचा एक विरोध देशातील भांडवलदार वर्गालाही आहे. देशाची सूत्रे भांडवलदार वर्गाकडे असून या लोकांनी देश विकायला काढला आहे, असे आरोप या पक्षाकडून सातत्याने होत असतात. हे आरोप लक्षात घेऊन देशाचे व्यापार धोरण कसे असेल, याची ब्लूप्रिंट या पक्षाला लवकरच काढावी लागेल. दोन वर्षांपूर्वी टीम अण्णांनी राजकारणाविषयीची तुच्छता जनमानसात, प्रामुख्याने मध्यमवर्गात रुजवली होती. तो तुच्छतावाद कमी करण्याचे मोठे राजकीय आव्हान या पक्षापुढे आहे. देशापुढे अनेक राजकीय-सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक आव्हाने आहेत. आता झाडू चिन्ह मिळाल्यापासून आम आदमी पार्टीचे एक नवे राजकारण या देशाला पाहायला मिळणार आहे.