आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्पसिद्धीसाठी हवे निश्चयाचे बळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१६ साल संपले. नववर्षाचे स्वागत करतानाच जुन्या वर्षाचा अाढावा घेण्याची पद्धत असते. गेल्या वर्षी बऱ्याच धक्कादायक गाेष्टी घडल्या. काही अापल्याला हव्या हाेत्या तशा घडल्या अाणि काही अगदी नकाे असलेल्या. मग येत्या वर्षी तरी नकाे असलेले कमी व्हावे अाणि हवे असेल ते जास्त प्रमाणात घडावे यासाठी एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवण्याची पद्धत अाहे. जितक्या जास्त लाेकांच्या शुभेच्छा अापल्याला मिळतील तितके नवे वर्ष चांगले जाण्याची संधी जास्त. अाता तर माेबाइल, इंटरनेट, साेशल मीडियावरून असंख्य लाेकांच्या संपर्कात राहण्याची साेय उपलब्ध झालेली अाहे. त्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाण फारच माेठ्या प्रमाणावर हाेत राहील. 

शुभेच्छांनी सारे जग अाच्छादून टाकले जात असताना प्रत्यक्षातली परिस्थिती काय अाहे? संपूर्ण विश्वच विनाशाच्या गर्तेकडे अाेढले जात अाहे. सुरक्षेचा प्रश्न हा इतके गंभीर रूप घेऊन क्वचितच मानवजातीला भेडसावणारा ठरला असेल. समाजाचे भले व्हावे यासाठी मनापासून झटत असलेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस राेडावतच चाललेली दिसते. सतत पर्दाफाश हाेत राहूनसुद्धा त्याच व्यक्ती पुन्हा पुन्हा सत्तेवर येत राहतात. चांगले काय व वाईट काय हे अाेळखण्याची शक्तीच अापण हरवून बसलाे अाहाेत असे जाणवायला लागले अाहे.
 
आपले भले व्हावे, वाईट होऊ नये यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात ही गोष्ट आपण विसरून गेलेलो आहोत. ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडल्या त्यामध्ये आपलाही वाटा होता हे मान्य करणे अवघड जाते. माझेच नेहमी बरोबर असते, तुम्हीच चुकत असता असेच सर्वांना सांगत राहण्याचा अट्टहास आपल्याला विनाशाच्या गर्तेकडे नेत असतो. आयुष्य शंभर वर्षांचे गृहीत धरले तरी एक वर्ष हा फार मोठा कालखंड आहे. आपण ३६ वर्षांच्या आतले असलो तर आपली ऊर्जा आणि सारी शक्ती वाढवून तिचा साठा आणि चांगला उपयोग करण्याची संधी आपण घालवून बसलेलो असतो. आपले वय ३५  ते ४०  च्या पुढे असेल तर या वर्षभरात आपल्या शक्तींचा चांगलाच ऱ्हास झालेला असतो. तो भरून काढण्यासाठी येत्या वर्षात जास्त कष्ट घेण्याची गरज असते. निदान गेल्या वर्षात आपण ज्या चुका केल्या आणि ज्या प्रलोभनांना बळी पडलो त्यांच्या बाबतीत तरी सावध होणे आवश्यक आहे.

केलेल्या चुका परत परत करीत राहणे आणि त्याच प्रलोभनांना  बळी पडत राहणे म्हणजे ज्या फांदीवर आपण बसलो आहोत तीच फांदी कापून टाकण्याचा उद्योग आहे. नव्या वर्षात आपले आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करण्याचे संकल्प केले जातात, पण ते सिद्धीला नेण्यासाठी अंगात निश्चयाचे बळ लागते. ते  कोठून आणायचे? आपले शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वाणी, इंद्रिये ही सर्व  साधने असलेल्या शक्ती आणि ऊर्जा वापरून टाकत असतात. आपण कितीही धनवान असलो तरी नुसतीच उधळपट्टी करीत राहिलो तर सारी संपत्ती केव्हा आटून जाईल याचा पत्ताही लागत नाही. तसेच आपल्या आरोग्याचे, कौशल्याचे आणि ज्ञानाचे होऊन जाते.  आपला भूतकाळ चांगला असला तर चांगला भविष्यकाळ घडवणे अपेक्षित आहे आणि भूतकाळ वाईट असला तर ही जबाबदारी आणखीनच वाढलेली असते.
  
संकल्प करताना खूप उत्साहात केले जातात. आपली तप करण्याची शक्ती आपल्या निश्चयावर अवलंबून असते. निश्चयच कमी पडल्यामुळे नको ते हातून घडते आणि जे घडायला हवे ते घडत नाही. तप जसे घडत जाईल तसे निश्चयाचे बळही वाढत जाते. क्रिया योग सुरुवातीला फार आवश्यक आहे.  त्याची सुरुवातच तपाने होते. गीतेमध्ये तपाचे आणि निश्चयाचे बळ वाढवण्याचा सोपा उपाय सांगितलेला आहे. ताे म्हणजे साऱ्या गोष्टी  मोजूनच करायच्या. आहार, विहार, विश्रांती या साऱ्याच गोष्टी काल किती केल्या, आज किती करणार आणि उद्याचा बेत काय आहे हे मोजून रोजनिशीत लिहीत गेले तरी फरक पडायला लागतो. भरपूर काळ बिघाड होण्यात जाऊ दिलेला असेल तर सुधारणा एकदम कशी होईल?  भूतकाळातले दु:ख नाहीसे होत नाही, वर्तमानात वाट्याला आलेले दु:ख हे भाेगूनच संपवावे लागते. पण भविष्यकाळातील येणार असलेले दु:ख हे तपाने आणि पाैरुष प्रयत्नाने पूर्णपणे नाहीसे हाेऊ शकते. 

येत्या वर्षासाठी अापण संकल्प करणार असलाे तर पहिला भाग हा या तपाचा असायला हवा. त्यासाठी ऋषी-मुनींसारखे अरण्यात जाऊन राहायची गरज नाही. नुसते माेजणे सुरू केले की काम भागते. एवढे केले की याेग हा दु:खनाशाला सुरुवात करताे. लाॅटरी लागली तर पैशाने झटपट श्रीमंत हाेता येईल, पण अाराेग्याला अाणि सुधारणेला अशा लाॅटरीचा काहीही उपयाेग हाेत नाही. त्यासाठी तप, निश्चयच हवा. एखादा वाघ मागे लागल्यासारखे का बरे जगताे अापण? थाेडे स्वस्थ बसता अाले की जाणवते ते हे की, हा वाघ संपूर्णपणे अापल्या कल्पनेतला अाहे. त्याच्यामुळे अापली झाेप धड हाेत नाही, कशावरच एकाग्र हाेणे साधत नाही अाणि अापल्या कामाचा दर्जा सतत खालावत राहताे. अायुष्याची एक लय असते ती या काल्पनिक वाघामुळे पार बिघडून जाते. कशाची घाई झाली अाहे अापल्याला? नक्षत्रांचे देणे घेऊनच अापण जन्माला अालेलाे असताे. ते द्यायचे राहूनच जाते. एवढेच नव्हे तर ते वाढतच जाते. केव्हा फेडणार ते अापण? 

अापल्या स्वार्थाचे अाणि दुर्गुणांचे घट्ट साटेलाेटे असते. स्वार्थ वाढला की दुर्गुण वाढतात अाणि दुर्गुण वाढले की अापण जास्त स्वार्थी बनताे. हे दुष्टचक्र इतरांचा विचार करायला लागलाे की थांबते अाणि अानंद वाढीला लागताे. तर या नव्या वर्षात माेजण्याचे तप सुरू करून निश्चयाने सुधारणा घडवून अाणू अाणि अापल्याबराेबरच इतरांचेही दु:ख नाहीसे करायचा प्रयत्न करू. असे झाले की नवे वर्ष अानंदाचे अाणि सुखसमृद्धीचे ठरेल!
- भीष्मराज बाम, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ
बातम्या आणखी आहेत...