आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दालमियांनी वसविली बाजारपेठ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळीमेळी - मर्यादित अर्थाने दालमिया कर्तबगार प्रशासक जरूर होते.
भारतीय क्रिकेटमध्ये दालमियांनी पैसा आणला, अफाट पैसा आणला. पण क्रिकेट विकासाची राजधानी बनवू शकले नाहीत. काही काळ सचिन, द्रविड, सेहवाग, कुंबळे व हरभजन यांच्या संघानं भारताला राष्ट्रकुलात सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले. पण त्या भरारीचे श्रेय दालमियांना देऊ पाहणं हास्यास्पद ठरेल!
ही गोष्ट चोवीस वर्षांपूर्वीची. ते क्षण, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ऐतिहासिक मालिकेआधीचे. केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचाही आर्थिक डोलारा, केवळ दोन दशकांत पाचशे-हजार पटींनी उंचावण्याची कामगिरी करणारे होते ते क्रांतिकारक क्षण!

आगामी मालिकेची आर्थिक आखणी करण्याच्या वाटाघाटी खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झाल्या होत्या. पहिल्यावहिल्या मालिकेचा आर्थिक तपशील ठरवताना, दक्षिण आफ्रिकेतर्फे डॉ. अली बाकर यांनी जगमोहन दालमिया- इंद्रजितसिंग बिंद्रा यांच्याकडे विचारणा केली ‘टेलिव्हिजन प्रक्षेपण हक्कातील किती टक्केवारी भारताला अपेक्षित आहे?’ या प्रश्नाने अवाक् झालेल्या जगमोहन दालमियांमधील बिझिनेसमनने प्रसंगावधान दाखवलं ‘तुम्हीच सांगा’ ते म्हणाले.

ते क्षण विलक्षण! कारण टीव्ही प्रक्षेपणातून, संबंधित चॅनेलकडून पैसे मिळतात, एवढंच नव्हे, तर मिळू शकतात हा अनुभव क्रिकेटसह साऱ्या खेळांना भारतात कधी आलेला नव्हता. त्यामुळे दालमिया-बिंद्रा यांसारख्या कसलेल्या व्यावसायिकांना हा धक्का विलक्षण सुखद होता. त्यानंतरच्या क्षणात बसलेल्या दुसऱ्या धक्क्यानं तर दालमिया-बिंद्रा यांना हर्षवायू झाला. डॉ. अली बाकर यांनी टीव्ही प्रक्षेपणाच्या हक्कांबद्दल देऊ केलेला आकडा त्यांच्या स्वप्नांबाहेरचा होता!

तिथून चक्रं वेगाने फिरू लागली. तो जमाना होता दूरदर्शनच्या एकाधिकारशाहीचा. क्रीडा स्पर्धा-शर्यती-सामने यांच्या प्रक्षेपणाच्या नावाखाली टेलिव्हिजन भरपूर फी आकारत असे. क्रिकेट मंडळाला जाणीव होती की, सामने टेलिव्हिजनच्या पडद्यावर दाखवले जातात आणि करोडो भारतीयांच्या नजरेत ठाण मांडून बसतात, म्हणून जाहिरातदार अव्वाच्या सव्वा पैसे मोजण्यास राजी होत. आता दालमिया-बिंद्रा यांना चलाख खेळी खेळण्याची दिशा, डॉ. बाकर यांच्या वाटाघाटीतून दिसली होती. आयएमजीसारख्या आंतरराष्ट्रीय मार्केटिंग संस्थेच्या ट्रान्स वर्ल्ड इंटरनॅशनलला (टीडब्ल्यूआय) त्यांनी प्रक्षेपणाचे हक्क चक्क विकले! जगभर रूढ असलेली पद्धत भारतात येत होती!

पण दूरदर्शन व तिचे चालक-मालक भारत सरकार आपली एकाधिकारशाही सहजासहजी थोडंच सोडणार होतं? दालमिया-बिंद्रा यांना दीर्घ काळ कोर्टातील लढाई लढवावी लागली. दरम्यानच्या काळात दूरदर्शन आणि ट्रान्स वर्ल्ड या दोन्ही संस्थांची टीव्ही प्रक्षेपण-पथके कसोटी केंद्रांवर थडकत होती. कॅमेरामन, समीक्षक यांची दोन पथके सामन्यासाठी जात राहिली. वायू-लहरींची (एअर व्हेवज्) ही लढाई दालमिया-बिंद्रा जिंकले. जुनाट कायदेकानू न्यायालयांनी कालबाह्य ठरवले. क्रिकेट संघटना मालामाल होण्यास हिरवा कंदील दाखवला.

जगमोहन दालमियांच्या महत्त्वाकांक्षेनं मग नवं आव्हान शोधून काढलं. दूरदर्शनपाठोपाठ इंग्लंड-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड (आणि त्यांना मुजरा करणारे वेस्ट इंडीज) यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान देण्याचा चंग त्यांनी बांधला. भारत-पाकिस्तान, श्रीलंका यांच्या भक्कम पायावर, सहसदस्य देशांसाठी मोट बांधली. त्यासाठी आगामी विश्वचषकातील काही टक्के रकमेचा वाटा दिला म्हणा वा ब्रिटिशांच्या सोयीस्कर भाषेतील लाच दिली म्हणा - पण १९९६च्या िवश्वचषकांचे अधिकार या मताधिक्याच्या आधारावर मिळवले. भारताला क्रिकेटची आर्थिक राजधानी बनवलं. बिंद्रा- दालमिया जोडीची ताकद, भारतीय मंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे (ज्यांना आपलं आडनाव ‘सिंदिया'असंच लावण्यात विकृत भूषण वाटत असे!) यांनी ओळखली होती. अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी पुण्याच्या ज्ञानेश्वर आगाशे यांना शब्द दिला होता आणि मराठी बाण्यानुसार पाळलाही. पण त्या वेळी मराठी मतदार फोडण्यात दालमिया अयशस्वी झाले. मनोहर जोशी यांच्या गटातील नरेन ताम्हाणे व बडोद्याचे जयवंत लेले यांची मते त्यांनी फिरवली. तीच निर्णायक ठरली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी, पुण्यातील थोरवे यांचे मत शरद पवारांविरुद्ध फोडण्याची किमया दालमियांनी करून दाखवली.
हेच राजकारण दालमिया आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत आले. एखादा इयन मेकिफ (ऑस्ट्रेलिया) वा मॅकार्थी (दक्षिण आफ्रिका) यांना जुन्या जमान्यात ठरवले गेले होते. ते दालमियांच्या जमान्यात खेळत असते, तर त्या प्रश्नास त्यांनी फारसे महत्त्व दिलं असतं, असं मला मुळीच वाटत नाही. पण शोएब अख्तर (पाकिस्तान) व मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) या उघडउघड चकर्सना निर्दोष ठरवण्यासाठी त्यांनी जिवाचा केवढा आटापिटा केला! याच शोएब अख्तरने द्रविड-तेंडुलकरसाठी खास ठेवणीतले, चकिंग शैलीतील दोन यॉर्कर्स, दालमियांच्याच कोलकात्यात वापरले. त्याची वाहवा केली गेली. कारण दालमियांचे प्राधान्य होते, भारत-पाक-श्रीलंका व्होटबँक जपण्यात!

आंतरराष्ट्रीय संघटनेतील मताधिक्याला प्राधान्य देणाऱ्या दालमियांनी कोलकात्यातील त्याच कसोटीत सचिनची विकेट पुन्हा काढली होती. नॉन- स्ट्रायकिंग एंडला सचिनने बॅट क्रीझकडे सरकावली, तेव्हा गोलंदाज शोएबने आपल्या दोन पायांत तिची नाकेबंदी केली होती. नियमांनुसार मग सचिन धावचीत ठरला. पण शोएबने पाकिस्तानचा तथाकथित खिलाडू कर्णधार वसीम अक्रम यांना त्यांनी अपील मागे घेण्याची विनंतीही केली नव्हती. अशा वेळी मुद्दाम सांगावंसं वाटतं की, दिवसाचा खेळ संपला अशा खात्रीतून क्रीझ सोडणाऱ्या टोनी ग्रेगनं कालीचरणला ‘धावचीत' केलं होतं. तेव्हा त्याला ते अपील, दुसऱ्या दिवशी सकाळी मागे घ्यायला लागलं होतं.

एका मर्यादित अर्थाने दालमिया कर्तबगार प्रशासक जरूर होते; पण केंद्र सरकारच्या मते वयाची सत्तरी ओलांडणाऱ्यांनी क्रीडा अधिकारपदी राहू नये, तरी दालमियांची हाव जबरदस्त! गतजमान्यात गाजलेल्या ‘शारदा' नाटकातील पंक्ती सांगतात : म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयोमान; लग्ना अजुनी लहान, अवघे पाऊणशे वयमान! पण या नाचक्कीची पर्वा दालमिया (व त्यांचे स्पर्धक शरद पवार) यांना कुठे होती? श्रीनिवासन यांनी त्यांची इज्जत घेणारी अट घातली. बिस्वरूप डे यांना कार्यकारी सहायक म्हणून नेमण्याचे शपथपत्र दालमियांनी द्यावं, अशी मागणी केली! गेले वर्षभर गलितगात्र झालेले डॉलरमिया, मंडळाच्या कामकाजात सहभागी नव्हते, तर होते केविलवाणे प्रेक्षक! पण ती इतिश्रीही त्यांच्या चारित्र्याशी विसंगत नव्हती.
लेखक ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आहेत.