आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रासंगिक: नेतेगिरीेची बोच शेतकऱ्यांना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ऊस दरवाढीसाठीचे शेतकऱ्यांचे आंदोलन यंदा भरकटत गेले. राज्यातील गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवडे उलटून गेले. काही जिल्ह्यांतले आंदोलन आटोपते घेतले गेले, तर काही भागांत ते अजूनही चालू आहे. या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले, याचा हिशेब प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला घालावा लागणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातल्या आंदोलनाची दिशा चुकण्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या वाटाघाटीचे फलित आणि  त्यानंतरचे शेट्टी यांचे वक्तव्य यातून उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाचे गणित विस्कटण्यास सुरुवात झाली. कृषिमूल्य आयोगाने जाहीर केलेली उसाची किमान आधारभूत किंमत टनाला २५५० रुपये अधिक जादाचे २०० रुपये असा दर राजू शेट्टींनी मान्य केला. खरे तर त्यांच्या सगळ्या वाटाघाटी या कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दरापुरत्या मर्यादित होत्या. इथपर्यंत ठीक होते. नंतर त्यांनी जे वक्तव्य केले, त्याचा फटका उर्वरित महाराष्ट्रातील आंदोलनाला बसला. कोल्हापूरचाच फाॅर्म्युला राज्यात सर्वत्र अमलात यावा, अशी अपेक्षा त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता व्यक्त केली.  वाटाघाटीतला दर उसाला साखर उतारा जास्त असलेल्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायद्याचा आहे. पण कमी उतारा असलेल्या उर्वरित बहुतांश महाराष्ट्रातील ऊस बागायतदारांना तो नुकसानीचा आहे. कोल्हापूरचे आंदोलन शेट्टींनी मागे घेतले. पण अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याने त्यांनी आंदोलन चालूच ठेवले. येथूनच प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नेत्यांमधील प्रतिष्ठेची रस्सीखेच सुरू झाली आणि तेच शेतकऱ्यांना टोचू लागले. 


याबाबतीत सोलापूर जिल्ह्याचे उदाहरण अगदी मासलेवाईक आहे. शेतकऱ्याचं भलं व्हावं, यासाठी दोन‑तीन नाही, तर तब्बल सहा संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. प्रत्येक संघटनेच्या नेत्यांची मागणी वेगळी, कोण शेतकऱ्याला जास्त पैसे मिळवून देतो? यासाठी सगळेच नेते धडपडत आहेत. पण राजू शेट्टींचे वक्तव्य आणि नेत्यांमधली बेकी याचा फायदा सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे पदाधिकारी, मालक उठवत आहेत. शेट्टी यांनी मान्य केलेला ऊस दराचे सूत्र अन्य जिल्ह्यांतील कारखानदारांसाठी फायद्याचे आहे. त्यामुळे तोच शब्द पकडून शेतकरी संघटनांच्या नेत्यांना झुलवत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे दोन कारखाने वगळता बाकीचे सगळे कारखाने कमी-अधिक प्रमाणात सुरू आहेतच. त्यामुळे एकीकडे गळीतही सुरू आहे आणि दुसरीकडे कारखान्याकडे निघालेल्या उसाच्या गाड्या अडवण्याचे प्रयत्नही संघटनांचे कार्यकर्ते करत आहेत. या सगळ्या प्रकारामध्ये अडचणीची स्थिती झाली ती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची. मतदारसंघातले राजकारण आणि मतदार शेतकऱ्यांमधली प्रतिमा त्यांना सांभाळायची आहे. सहकार खाते असल्याने दराचं कोडं सोडवायचं होतं. त्यांचे स्वत:चे तीन खासगी कारखाने आहेत. पण बाकीचे कारखाने त्यांना जवळ करत नव्हते. ते कारखाने चालू आणि मंत्र्यांचेच दोन्ही बंद अशी स्थिती होती. अखेरीस दराची कोंडी फोडण्यासाठी देशमुखांनीच पुढाकार घेतला.  एफआरपी अधिक जादाचे ४०० रुपये देण्याची तयारी दाखवली. अन्य कारखान्यांचे दर जाहीर झाले नाहीत. 


आंदोलनामध्ये सहा संघटनांचे शेतकरी नेते, कारखानदारांशी बोलत होते. शिवाय आणखीन नवीन गट तयार होत आहेत. प्रत्येक गटाचा नेता कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याशी जोडलेला असतो. याचाच फायदा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार घेत आहेत. दर तर त्यांना जाहीर करावा लागेलच. आज जरी ते सहकारमंत्र्यांच्या सूत्राशी सहमत नसले तरी त्याच्या अलीकडे येणे त्यांनाही परवडणार नाही. आणखीन १५‑२० दिवसांनी ऊस कमी पडायला सुरुवात होईल. प्रत्येक कारखान्याचा चालक‑मालक जास्तीत जास्त गाळप करण्याच्या स्पर्धेमध्ये असतो. त्यामुळे आज जे कारखाने दर अमान्य करत आहेत तेच लोक शेजारच्या कारखान्यापेक्षा १०० रुपये अधिकचा दर शेतकऱ्यांना देऊ करतील. त्यामुळे दर जाहीर केला नसला तरी दराची अडचण चालू गळीत हंगामात नक्कीच येणार नाही. पण खरी अडचण आहे ती २०१८‑१९ च्या गळीत हंगामातील. पाऊस बरा झाल्यामुळे राज्यात उसाचे क्षेत्र साडेदहा लाख हेक्टरच्या वर जाते आहे.  अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या विविध संघटनांचे नेते मालकांशी भांडण्यापेक्षा एकमेकांशी स्पर्धा करत राहिले, मी पणामध्ये  अडकले तर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल हा पेच पुढच्या वर्षी उभा राहणार आहे. 

 ‑ संजीव पिंपरकर, निवासी संपादक, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...