आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल... बाँके बिहारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाष्य- पराभवापासून धडा घेऊन राहुल गांधींनी नीती बदलली आहे.

राहुलनी केदारनाथाची यात्रा करणे महत्त्वाचे होते.त्याहून महत्त्वाचे आहे ते त्यांनी मथुरेत कृष्णभक्ती करणे. कारण सोनिया गांधींच्या काळात हिंदू देवदेवता व परंपरांबद्दल तिरस्काराची
नसली तरी दुराव्याची भावना काँग्रेसमध्ये आहे, असे चित्र निर्माण झाले होते. ते खरेही होते.
राहुल गांधी सध्या त्वेषाने राजकारणात उतरले आहेत व त्यांना यशही मिळत आहे. भूसंपादन विधेयकावरून त्यांनी सरकारची अडचण केली व शेवटी मोदी सरकारला पराभव स्वीकारावा लागला. राहुल गांधी यांच्या नीतीचा सर्वात मोठा विजय म्हणजे मोदी सरकारवर ‘सूट-बूट की सरकार' हे विशेषण चिकटवण्यात ते यशस्वी झाले. हे विशेषण वस्तुस्थितीला धरून आहे की नाही हा मुद्दा नाही. ते लोकांच्या मनावर ठसले हे महत्त्वाचे. राहुल गांधींनी आपल्या नीतीत आता एक महत्त्वाचा बदल केला आहे. परदेशात सुटी घेऊन परतल्यावर राजकारणाची सुरुवात त्यांनी केदारनाथाच्या यात्रेने केली. राहुलनी अशी यात्रा करणे महत्त्वाचे होते. कारण सोनिया गांधींच्या काळात हिंदू देवदेवता व परंपरांबद्दल तिरस्काराची नसली तरी दुराव्याची भावना काँग्रेसमध्ये आहे, असे चित्र निर्माण झाले होते. ते खरेही होते.

मंगळवारी राहुल गांधी यांनी मथुरेमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे शिबिर घेतले. शिबिरापूर्वी राहुल गांधींनी ‘बाँके बिहारी’चे दर्शन घेतले. वृंदावनमधील हे कृष्णाचे देऊळ श्रद्धावानांमध्ये फार प्रसिद्ध आहे. सोमवारचा राधाष्टमीचा मुहूर्त राहुल यांनी साधला. त्या वेळी ‘बाँके बिहारी लाल की जय’ अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. मंदिरातील गदा हातात घेऊन राहुल गांधी यांनी छायाचित्रकारांना पोझही दिली. या घटनेत नवल काय असा प्रश्न पडेल. नवल हे आहे की, यूपीएच्या दुसऱ्या टप्प्यात सोनिया व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हिंदू धर्मापासून फारकत घेतली होती. डावी वैचारिक निष्ठा असलेल्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाच्या सल्ल्याने कारभार चालत होता. कोणत्याही धार्मिक कार्याशी काँग्रेसचा सुतराम संबंध येणार नाही, अशी दक्षता घेतली जात होती. श्रद्धावान हिंदूंबद्दल दुरावा होता. तो काही काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यातून तसेच कृतीतून प्रगट होत होता. जातीय दंगली रोखण्यासाठी आणलेले विधेयक हे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. त्या विधेयकानुसार देशात कोठेही जातीय दंगल झाली तर फक्त हिंदूंना आणि फक्त हिंदूंनाच शिक्षा करण्याची शिफारस करण्यात आली होती. कितीही हिंसाचार केला तरी अल्पसंख्याकांना शिक्षा न करण्याची तरतूद होती. या विधेयकामुळे काँग्रेसचे नेतेही अस्वस्थ होते, पण सोनिया गांधींसमोर बोलण्याची हिंमत नव्हती व सोनिया फक्त राष्ट्रीय सल्लागार मंडळाच्या सदस्यांचे ऐकत होत्या. ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द त्याच वेळी काँग्रेसकडून प्रचलित केला गेला.
यावर पक्षात प्रथम आवाज उठवला तो ए. के. अँटनी यांनी. भगवा शब्दाला भारतीय मानसिकतेत फार महत्त्व आहे. ते लक्षात घेऊन तो शब्द दहशतवादाशी जोडू नये, असे मत त्यांनी कार्यकारिणीत मांडले. यामुळे लोक दुखावतात, असे अँटनी यांचे म्हणणे होते. त्यांना समाजाची नाडी समजली होती. सोनियांना ते प्रथम पटले नाही, पण यामध्ये तथ्य असल्याचे हळूहळू लक्षात आले व भगवा दहशतवाद हा शब्द वापरणे बडे नेते टाळू लागले. पुढे काँग्रेसचा मोठा पराभव झाला. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी अँटनी यांचीच समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालात अँटनी यांनी याच गोष्टीचा अधिक ऊहापोह केला व अल्पसंख्याकांबद्दल असलेली अतिरिक्त कणव ही काँग्रेसच्या पराभवाचे एक मुख्य कारण असल्याचे स्पष्टपणे सांगितले. सेक्युलर या शब्दाचा अर्थ नीट समजून न घेतल्यामुळे ‘सेक्युलर म्हणजे हिंदूविरोधी’ असे समीकरण लोकांच्या मनात बसले व ते काँग्रेसच्या विरोधात गेले असे अँटनी यांचे म्हणणे होते. हे म्हणणे खरेच होते. काँग्रेसने अल्पसंख्याकांचा अनुनय केला असला तरी इंदिरा गांधी सत्तेवर असेपर्यंत काँग्रेसची प्रतिमा हिंदूविरोधी अशी नव्हती. इंदिरा गांधी स्वत: श्रद्धाशील होत्या. हिंदू परंपरेवर त्यांची निष्ठा होती हे त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक घटनांवरून दिसून येते. नेहरू इतके श्रद्धाशील नव्हते. सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण झाले तेव्हा तेथे राष्ट्रपतींनी जाऊ नये, असे नेहरूंनी म्हटले होते व त्यावरून राजेंद्रप्रसाद व त्यांच्यात पत्रातून खडाजंगी झाली होती. राजेंद्रप्रसाद बधले नाहीत व नेहरू नाराज झाले. नेहरू स्वत: पाश्चात्त्य विचारसरणीचे असले तरी काँग्रेसमधील बहुसंख्य नेते हे आचरणात हिंदू होते. काँग्रेसचा चेहरा हिंदू होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेव्हाही काम करत असला तरी हिंदूंवर राज्य काँग्रेसचे होते. अनेक ठिकाणी संघाचे स्वयंसेवक उघडपणे काँग्रेसचे काम करत.

राजीव गांधींच्या काळापासून मात्र चेहरा बदलला आणि पुढे अयोध्या आंदोलन चालवून संघ परिवाराने हा चेहरा स्वत:वर चढवला व काँग्रेसला हिंदूविरोधी ठरवले. स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेसची नाळ देशातील हिंदू जीवनपद्धतीशी जुळलेली होती. टिळक-गांधी व पुढे विनोबा यांची वैचारिक बैठक ही भगवद््गीतेवर आधारित होती. मनाने हे सर्व नेते धार्मिक व श्रद्धाशील होते, मात्र कर्मकांडी नव्हते. धार्मिक परंपरेत बदल घडवून आणण्यासाठी धडपडणारे होते. म्हणूनच त्यांचे नेतृत्व समाजातील बहुसंख्यांनी मान्य केले. धर्मावर फक्त आघात करत राहणारे कम्युनिस्ट व सावरकरांचे नेतृत्व हिंदूंमध्ये रुजले नाही. मात्र, सोनिया गांधींच्या नेतृत्वाच्या काळात काँग्रेसचा हा धार्मिक पाया सरकला. काँग्रेस हिंदूविरोधी झाली व त्याचा परिणाम पराभवात झाला.

अँटनी यांनी हे नेमकेपणे जाणले. त्यांचा सल्ला राहुल गांधी मानणार असतील तर देशासाठी ते चांगलेच आहे. कारण काँग्रेसचा चेहरा जेव्हा हिंदूविरोधी नव्हता तेव्हाही काँग्रेस साधू-महंतांच्या नादी लागलेली नव्हती. मनाने श्रद्धाशील, पण आचारविचारांत पुरोगामी असा मेळ त्यामध्ये असे. समाजातील श्रद्धास्थानांचा अपमान करण्याची वृत्ती नव्हती, तशी नादी लागण्याचीही नव्हती. टिळक-गांधींपासून प्रेरणा घेऊन विनोबांनी जी वाट धरली होती तीच काँग्रेसने पुढे चालवली असती तर संघ विचाराचे बीज फोफावले नसते. ओडिशातील मंदिरात प्रवेश नाकारला गेला म्हणून इंदिरा गांधींनी थयथयाट केला नव्हता व गोवध बंदीचा विनोबांचा हट्टही मानला होता. विवेकानंदांचे स्मारक बनवण्यासाठी त्या स्वत: प्रयत्नशील होत्या. यामुळे इंदिराजींपर्यंतची काँग्रेस ही समाजाशी एकजीव झाली होती. सोनिया गांधींच्या काळात ती दुरावत गेली. मंडल चळवळीमुळे उभे राहिलेले स्वतंत्र नेतृत्व व अन्य काही घटकही काँग्रेसचा पाया ढळण्यास कारणीभूत होते हे खरे असले तरी हिंदूविरोधी बनत गेलेला चेहरा हेही महत्त्वाचे कारण होते.

हा चेहरा बदलण्यास राहुल गांधी यांनी सुरुवात केली असावी. तिकडे मथुरेत बाँके बिहारीला साकडे घालीत असतानाच इकडे औरंगाबादेत तर काँग्रेसने सर्वच देवदेवतांना पुकारले आहे. या बदलत्या भूमिकेचे दूरगामी परिणाम होतील. राजकारणाचे अनेक संदर्भ व आयाम बदलण्याची क्षमता या बदलांमध्ये आहे व ते देशासाठी फलदायीही ठरू शकतात.

prashant.dixit@dbcorp.in