आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७१ हजार कोटींनंतरही ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांनी संवाद साधला. शेतकरी आत्महत्यांसारख्या गहन प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही केला. या दौऱ्यापूर्वी त्यांनी नागपुरात ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधला. सध्याच्या दुष्काळाचे स्वरूप भीषण व चिंताजनक आहे, हे सांगताना गेल्या ६३ वर्षांत सिंचनावर ७० हजार कोटींच्या आसपास खर्च झाले. यातील सुमारे साडेसात हजार कोटी रुपये आस्थापना आणि पुनर्वसनावर खर्च झाले. मात्र, उर्वरित खर्चातून केवळ ६ टक्के सिंचन क्षमताच तयार झाल्याचे त्यांनी मान्य केले. आत्महत्यांच्या कारणांच्या शोधात आतापर्यंत नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतीमालाला योग्यभाव न मिळणे, तसेच सिंचनाचा अभाव ही कारणे प्रामुख्याने समोर आली आहेत. सुमारे ६३ हजार कोटी खर्चून आपण सिंचनाचा आलेख केवळ ६ टक्क्यांपर्यंत पोहाेचवू शकल्याचे भीषण वास्तव समोर आले. याच वेळी पवारांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी यूपीए सरकारने ७१ हजार कोटींचे कर्ज माफ केले, तरीही आत्महत्या रोखण्यात तत्कालीन सरकारला यश आले नाही, हेही मान्य केले. केंद्रीय कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवारांचा शेती, शेतकरी आणि त्यांच्या समस्येचा गहन अभ्यास आहे. पण या अरिष्टावर अजूनही मार्ग निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांच्या नावावर झालेल्या खर्चाचे आकडे डोळे दिपवणारे आहेत. त्याचा उपयोग आणि उपभोग कोणी घेतला हा आणखी गंभीर प्रश्न आहे. आजही पवारसाहेब आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत. आता त्यांना अधिक खोलात जाण्याची गरज भासत आहे. ७१ हजार कोटींच्या कर्जमाफीनंतरही न थांबलेल्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी त्यांचा पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते पुन्हा कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. चक्रव्यूहात अडकत चाललेल्या शेतकरी आत्महत्येच्या या प्रश्नाचे उत्तर कधी व कसे सापडणार, हाच खरा प्रश्न आहे.