आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानकरी प्रदीर्घ क्रीडायशाचे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रीडा विशेष- यश मिळवण्यासाठी वाढत्या वयाचे बंधन राहत नाही.
अपयशाचे तडाखे पचवून लिएंडर पेस, सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या तिन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या विजयामागे त्यांची मेहनत व सकारात्मक विचार यांचे पाठबळ आहे. त्या यशाचे गमक उलगडणारा हा लेख.
सर्वांगसुंदर क्रीडापटू कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लिएंडर पेस. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला. फक्त टेनिसच नव्हे, तर अन्य खेळातील भारतीयांना प्रोत्साहन देण्यात अग्रेसर राहणारा लिएंडर तब्बल तीन दशकांनंतरही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकतो, हा खरोखरच एक चमत्कार आहे. टेनिस या खेळात खेळाडू ऐन विशीत बहरात येतो आणि तिशीत निवृत्त होतो. मात्र, तमाम टेनिस विश्वाला मान्य असलेला हा प्रघात लिएंडरला मान्य नाही. त्याचे वय जसजसे वाढत गेले, तसतसा तो अधिक प्रगल्भ, तंदुरुस्त आणि विजयी होत गेला आणि वाढत्या वयाबरोबरच अधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकत गेला. त्याच्या या यशाचे रहस्य काय? मानसिक कणखरता की शारीरिक सक्षमता? १९९९मध्ये विम्बल्डन पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवल्यानंतर २०१०मध्ये पुन्हा एकदा मिश्र दुहेरी जिंकणाऱ्या लिएंडरने तब्बल तीन दशकांत विम्बल्डन विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. /जिंकणाऱ्या महान टेनिसपटूच्या पंक्तीत बसण्याचा मान लिएंडरला मिळाला.
भारताचे राष्ट्रगीत लिएंडरमध्ये जिंकण्यासाठीची जिद्द फुलवते. स्टेडियममध्ये फडकणारा आपला तिरंगा त्याला नेहमीच प्रोत्साहित करायचा. भारतीय संघ खेळतोय, असे पाहताक्षणी अापला टेनिस सामना नसल्यास तो आवर्जून भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देतो. १९९९च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान लिएंडर पेस भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून क्रिकेट मैदानावर हजर असायचा. कारण विम्बल्डन स्पर्धेसाठी त्याच हंगामात इंग्लंडला आला होता. लिएंडरची पावले विम्बल्डनबरोबरच क्रिकेट मैदानाकडेही वळायची. होव्ह येथील दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याच्या वेळी तर तो भारतीय क्रिकेट संघाच्या चिअर टीमचे नेतृत्व करत होता.
लिएंडरचे वडील डॉ. वेस पेस १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. आई जेनिफर राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू. गोव्याच्या या क्रीडापटू दांपत्याच्या घरात जन्मलेला लिएंडर वाढला मात्र कोलकात्यात. वडिलांनी लिएंडरच्या हातात हॉकी स्टिक नाही तर टेनिस रॅकेट दिली, त्या वेळी तो जेमतेम पाच वर्षांचा असेल. मात्र, तेव्हापासून त्याची कारकीर्द पूर्णत्वाला येईपर्यंत म्हणजे कालपरवापर्यंत डॉ. वेस पेस सावलीसारखे त्याच्यासोबत राहिले. डॉ. पेस हे मानसशास्त्राचेही अभ्यासक होते. त्यामुळे टेनिसबरोबरच लिएंडरला त्यांनी मानसशास्त्राचे बाळकडूही पाजले. आज वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरही तो ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकतो, त्या यशाचे हेच खरे रहस्य आहे.
लिएंडरने अमेरिकन आेपन मिश्र दुहेरी जिंकल्यानंतर ते कबूलही केले होते. मार्टिना हिंगीसबरोबर मिश्र दुहेरीत यंदा तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा त्याने जिंकल्या. त्या यशात हिंगीसचा मोठा वाटा आहे, असे लिएंडरने खुल्या दिलाने सांगितले. माझ्या खेळातील उणिवा ती तिच्या चपळ खेळाने भरून काढते, असे तो म्हणाला होता. लिएंडरचा खेळ वयानुसार शिथिल होणार, हे निश्चित आहे. पण आपल्या जोडीदाराच्या खेळाला अनुरूप खेळ करणे हे त्याचे खरे कसब आहे. त्यामुळे थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल १२० वेगवेगळ्या जोडीदारांसोबत खेळण्याची किमया त्याला साध्य होऊ शकली. एक- दोन नव्हे, तर ग्रँड स्लॅम मालिकेतील १४ स्पर्धांची विजेतीपदे तो जिंकू शकला. भारतीय डेव्हिस कप संघातून खेळताना ८८ विजय नोंदवू शकला. फ्रेंच, विम्बल्डन, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन आेपन या ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धा जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
आज वयाच्या ४१व्या वर्षीही तो तरुण खेळाडूंइतकाच फिट आहे. महिला टेनिसपटूंच्या मते लिएंडर हा सहखेळाडूची, विशेषत: महिला खेळाडूंची मानसिकता जाणून घेणारा सर्वोत्तम खेळाडू आहे. २००३ मध्ये जेव्हा मार्टिना नवरातिलोवाने लिएंडरच्या साथीने स्पर्धा जिंकली होती तेव्हा तिला हा प्रथम साक्षात्कार झाला होता. लिएंडर पेस आपल्या सोबतच्या टेनिसपटूंचे, त्यातही महिला टेनिसपटूंचे अंतरंग ओळखण्यात वाकबगार आहे, असे मार्टिना नवरातिलोवाला वाटते.
नेमकी हीच गोष्ट, भारताची महिला स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या यशाचे गमक आहे. सानिया एकेरीमध्ये खेळताना ग्रँड स्लॅम मालिकांच्या विजेतेपदापर्यंत कधीच पोहोचली नव्हती. मात्र, तिने लिएंडरसोबत भारताचे प्रतिनिधित्व करताना केलेला सराव व खेळ तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. दुहेरीच्या खेळातील जोडीदाराच्या खेळाची ओळख करून घेणे किती महत्त्वाचे आहे, याची खात्री महत्त्वाच्या बाजू सानियाला सांगितल्या. त्यामुळे यंदा विम्बल्डन स्पर्धेत हिंगीससोबत खेळताना तिला थेट विजेतेपदालाच गवसणी घालता आली. एकमेकांच्या खेळाला पूरक खेळ कसा करायचा, याचे रहस्य कळल्यानंतर विम्बल्डनपाठोपाठ यू.एस. ओपन स्पर्धा जिंकणेही सानियाला कठीण गेले नाही. एकेरी स्पर्धेत सानियाला ग्रँड स्लॅम स्पर्धांत यश मिळाले नव्हते. मात्र, हिंगीसची साथ लाभताच तिने मिश्र दुहेरीत दोन ग्रँड स्लॅम विजेतीपदे पटकावलीसुद्धा. हिंगीसचे एकेकाळी टेनिस कोर्टवर राज्य होते. अचानक उद‌्भवलेल्या पाठदुखीमुळे तिची कारकीर्दच संपली. जवळजवळ दशकभर मोठ्या टेनिस स्पर्धांपासून दूर राहिल्यानंतर अचानक तिला लिएंडर व सानिया यांच्या रूपाने पुनरागमन करण्यासाठीचा स्पार्क गवसला. लिएंडरने हिंगीसला विश्वास दिला. सानियानेही तोलामोलाची साथ दिली आणि पुन्हा टेनिस कोर्टवर अवतरलेल्या मार्टिना हिंगीसनेही ग्रँड स्लॅमवर पुन्हा हुकमत गाजवायला सुरुवात केली.

सानिया मिर्झा, मार्टिना हिंगीस आणि लिएंडर पेस यांचे यश नव्या पिढीला नवी शिकवण देणारे आहे. प्रत्येकाची कारकीर्द प्रचंड अडथळ्यांशिवाय पार पडलेली नाही. मार्टिना हिंगीसला दुखापतीचे आव्हान होते. टेनिस हा ठरावीक वर्गासाठी खेळला जाणारा खेळ, अशी भारतात अनेकांची अद्यापही समजूत आहे. सानियाला या मानसिकतेचाही सामना भारतात करावा लागला आहे. लग्नानंतर सानियावरील बंधने वाढली होती. सुदैवाने तिचा पती हा पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होता, म्हणून पुढील टेनिस बंद पडले नाही. लिएंडर तर प्रत्येक क्षण झगडत पुढे जात होता. गुणवत्ता, चिकाटी, संघर्ष करण्याची तयारी असली की वाढत्या वयानंतरही यश मिळते, हा संदेश या तिघांनी तरुण पिढीला दिला आहे.
vinayakdalvi41@gmail.com