आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वार्थाने सर्वोत्तम!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगल्या नटाची व्याख्या काय, असा प्रश्न भारतीय मानसिकतेत वाढलेल्या कुणालाही विचारला, तर देखणा, सिक्स पॅकवाला - थोडक्यात छाकटू दिसणारा, असे उत्तर मिळण्याची शक्यता जास्त. पण या तथाकथित व्याख्येत कुठेच न बसणारा, तरीही उत्तम नट हीच ओम पुरीची ओळख होती. महत्त्वाचे म्हणजे ओमची ही ओळख त्याने या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हापासून आजतागायत होती कारण त्याने नेहमीच उत्तमातले उत्तम काम केले. प्राणपणाने अभिनय केला. स्थानिक रंगभूमी, छोटा पडदा, बॉलीवूड, हॉलीवूड आणि जागतिक पटावरही ओम कार्यरत राहिला, याचे एकमेव कारण म्हणजे त्याच्यातील ‘अभिनेता’ त्याने सतत जिवंत, समकालीनतेशी नाते जोडणारा ठेवला. 

आपल्याकडे ‘नट’ या संकल्पनेविषयी आजही गोंधळ आहे. देखण्या चेहऱ्याचा, पिळदार शरीरयष्टीचा, तालीमबाज, भरपूर अॅक्शन करणारा, कपाळावर केसांच्या बटा रुळवणारा, अप टू डेट पोषाखात वावरणारा, सायकल, बैलगाडीपासून विमान-रणगाड्यापर्यंत काहीही चालवणारा, झाडाभोवती आणि नायिकेभोवती गाणी गात फिरणारा, तो नट…या पलीकडे बहुसंख्य दर्शकांची ‘नटा’ची कल्पना अजूनही पोहोचत नाही. ओम पुरीजवळ यापैकी काहीच नव्हते. देवीचे वण चेहऱ्यावर भरून राहिले होते. तो बहुसंख्यांच्या ‘नटा’च्या व्याख्येत बसणारा नव्हता आणि तरीही त्याने अत्यंत यशस्वी, डिमांडिंग अशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कारकीर्द ‘नट’ म्हणूनच घडवली, आर्ट फिल्म, समांतर चित्रपट, रंगभूमी, छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिका, इंग्रजी चित्रपट, अन्य देशांचे चित्रपट या साऱ्या कलाप्रांतात ओमने त्याला येणारे उत्तम काम करून स्वत:ची जागा निर्माण केली. 

माझ्या वैयक्तिक आठवणीतला ओम राष्ट्रीय नाट्य विद्यालय व फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधला आहे. थोड्याशा फरकाने आम्ही समकालीन होतो. तेव्हा एफटीआयआयमध्ये नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी, जया भादुरी वगैरे मंडळी होती. ओम त्यात सहभागी झाला. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण शिकण्याची ऊर्मी प्रखर असल्याने त्याने तत्कालीन एफटीआयआय गाजवले. १९७० ते ७३ या काळात ओम एनएसडीमध्ये होता. मात्र रूपेरी पडदाही त्याला खुणावत असावा कारण थोड्याच दिवसांत ओमने एफटीआयआयमध्ये प्रवेश मिळवला. त्याला प्रवेश देतानाही निवड समितीच्या सदस्यांनी ‘तो हीरो वाटत नाही. खलनायक किंवा विनोदी कलाकारही वाटत नाही. त्याचा चित्रपटसृष्टीत काय उपयोग,’ अशी शेरेबाजी केल्याचे ऐकिवात होते. पण संस्थेचे तेव्हाचे संचालक गिरीश कर्नाड यांनी ही मते झटकून ओमला प्रवेश दिला आणि त्यानंतरच्या काळात ओमने हीरो, विनोदी कलाकार आणि खलनायक म्हणूनही अनेक भूमिका गाजवल्या. ओमचे तेव्हाचे सहाध्यायी होते नसिरुद्दीन शहा, सुरेश ओबेरॉय, राकेश बेदी, दिलीप धवन, सतीश शहा, विधू विनोद चोप्रा, कुंदन शहा, केतन मेहता, डेव्हिड धवन, सईद मिर्झा, रेणू सलुजा…यातील प्रत्येकाने स्वत:ची ओळख निर्माण केली. 

एफटीआयआयमधील अभिनयाची ओमची बॅच १९७४ ते ७६ अशी होती. मुंबईला गेल्यावर ओमला लगेच चित्रपट मिळाला नाही, त्यासाठी १९८० मधील आक्रोशपर्यंत वाट पाहावी लागली. पण ती संधी मिळाल्यावर ओमने त्या भूमिकेत जे रंग भरले ते भूमिका ‘मूक’ असूनही खूप ‘बोलके’ होते. सत्यजित रे यांचा ‘सद्गती’ ओमला याच भूमिकेमुळे मिळाला. ‘अर्धसत्य’मुळे ओमला लोकप्रियता, राजमान्यताही मिळाली. राष्ट्रीय –आंतरराष्ट्रीय पुरस्काराने यावर कळस चढवला. छोट्या पडद्यावरील उत्तमोत्तम मालिकांचा महत्त्वाचा भाग होण्याचा योगही ओमला मिळाला. यात्रा, इंडियन रेल्वेज, भारत एक खोज, मिस्टर योगी, कक्काजी कहीन, स्पर्श, किरदार, तमस अशी अनेक नावे ओमच्या अभिनयाशी जोडली गेली आहेत. धारदार आवाज, परिणामकारक संवादफेकीद्वारे ओम जे ‘सांगतो’ ते तथाकथित देखण्या नटांना जमले नाही. त्याच्या अभिनयाला कुठल्याही मर्यादा नाहीत. तो अनंत वेलणकर म्हणून पटतो, घाशीराम म्हणून पटतो, लहान्या भिकू म्हणून पटतो व चाची ४२० मधलाही पटतो. स्वीकारलेल्या भूमिकेची जातकुळी ओळखणे, मिती शोधणे, विविध परिमाणे देणे, विविध शक्यता आजमावणे, बारीकसारीक तपशिलांचे भान ठेवणे यात ओम माहीर आहे. 

४० वर्षांत ३०० हून अधिक हिंदी चित्रपट, १७ आंतरराष्ट्रीय चित्रपट, १० भारतीय छोट्या पडद्यावरील मालिका पाच आंतरराष्ट्रीय टीव्ही मालिका आणि जाहिराती अशी भरगच्च कारकीर्द ओमने उभारली. निरीक्षण, बुद्धिमत्ता, प्रतिभा, भूमिकेत पुरेसे गुंतणे आणि पुरेसे अलिप्त असणे, दडलेले अर्थ शोधणे, व्यक्तिरेखेची नस पकडणे, सहकलाकारांचा विचार करणे, या गोष्टींचा विचार ओमने बारकाईने केलेला दिसतो. काही दिवसांपूर्वीच आम्ही भेटलो होतो. इतक्या अल्पावधीत माझ्या या मित्राविषयी असा मजकूर लिहायची वेळ येईल, याची कल्पनाही मी केली नव्हती. चित्रपटसृष्टीतील निवडक उत्तम नटांमध्ये गणना होणाऱ्या या गुणी मित्राला मी अभिवादन करतो. शब्दांकन – जयश्री बोकील
- समर नखाते (ज्येष्ठ चित्रपट तज्ज्ञ)
बातम्या आणखी आहेत...