आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुपर ३०’ ची विमाने कधी वेग घेणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हवाई दलातील ‘सुखोई-३० एमकेआय’ या बहुउद्देशीय लढाऊ विमानाला आधुनिकीकरणाद्वारे अधिक सक्षम बनविण्याच्या हेतूने भारत आणि रशिया यांच्यात चर्चा सुरू आहे. या ‘सुपर-३०’ प्रकल्पाद्वारे विकसित होणाऱ्या विमानामुळे भारतीय हवाई दलाची मारकक्षमता व प्रभाव वाढण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. पण पाच वर्षे होऊन गेली, प्रकल्पपूर्तीची अपेक्षित कालमर्यादा संपली, तरी या प्रकल्पाला अद्याप सुरुवातच होऊ शकलेली नाहीत. एकीकडे भारतीय हवाई दलाला लढाऊ विमानांची कमतरता भासत असतानाच ‘सुखोई’चे आधुनिकीकरणही लांबत चालले आहे.

भारताच्या सुरक्षेसमोरील आव्हाने लक्षात घेऊन ‘सुपर-३०’ प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. आधुनिकीकरणाच्यावेळी ‘सुखोई-३० एमकेआय’च्या आरेखनात बदल करून त्यात स्टेल्थ वैशिष्ट्यांचा समावेश केला जाणार आहे. परिणामी शत्रूच्या रडारला ‘सुपर-३०’ चकवा देण्यास सक्षम ठरेल. आधुनिक युद्धांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली आणि मूळच्या ‘सुखोई-३०’पेक्षा जास्त क्षमतेची जेटइंजिने ‘सुपर-३०’मध्ये बसविण्यात येणार आहे. ही इंजिने कमी इंधनाचा वापर करून अधिक रेटा उत्पन्न करू शकतील, ज्यामुळे विमानाला त्वरित गती घेणे शक्य होईल. सध्याच्या मिशन संगणकातही सुधारणा करण्यात येणार आहेत. नवे शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता या ‘सुपर-३०’मध्ये निर्माण करण्यात येणार आहे.

‘सुखोई-३० एमकेआय’ भारतीय हवाई दलात २००२ मध्ये सामील झाले होते. याच्यामुळे भारतीय हवाई दलाच्या सामरिक शक्तीत बरीच वाढ झाली आहे. मात्र सद्यपरिस्थितीत ‘सुखोई-३० एमकेआय’ विमानांचे मध्यावधी आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता भासत आहे. त्यासाठीच ‘सुपर-३०’ प्रकल्पाची संकल्पना मांडली गेली आहे. आधुनिकीकरणाच्यावेळी नव्या यंत्रणा, रडार, शस्त्रास्त्रे बसवून ‘सुखोई-३०’ला पाचव्या पिढीतील विमान बनविण्याचा विचार पुढे आला आणि त्यासंबंधीचा प्राथमिक करार भारत व रशिया यांनी २०१० मध्ये केला. त्यानुसार २०१२ मध्ये नव्या वैशिष्ट्यांसह घडविलेली पहिली दोन ‘सुपर-३०’ भारतीय हवाई दलाकडे सोपविले जाणे अपेक्षित होते. पण पुढील काळात त्याबाबत काहीच प्रगती होऊ शकली नाही. आता याबाबतची बोलणी पुन्हा एकदा सुरू होऊन दीड-एक वर्ष लोटले आहे. तरी त्यासंबंधीचा अंतिम करार अजून झालेला नाही. म्हणून भारतीय हवाई दलातील ८० ‘सुखोई-३० एमकेआय’चे २०२० पर्यंत तरी ‘सुपर-३०’मध्ये रुपांतर करण्याचे लक्ष्य पूर्ण होईल का हे सांगणे कठीण आहे. 

हिंदी महासागर व हिमालयापलीकडील क्षेत्रातील भारताच्या राष्ट्रहितांच्या संरक्षणाच्या दृष्टीने भारतीय हवाईदलाला आपल्या लढाऊ शक्तीत वाढ करणे आवश्यक वाटत आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांना दीर्घपल्ल्याच्या मोहिमांच्या वेळी वैमानिकांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली `इंटिग्रेटेड लाईफ सपोर्ट सिस्टीम’ या ‘सुपर-३०’मध्येही बसविण्यात येणार आहे. या प्रणालीच्या  मदतीने वैमानिकांना ऑक्सिजनचा अखंड पुरवठा होत राहील. परिणामी ही विमाने दीर्घ मोहिमांसाठी अधिक सक्षमपणे विनाअडथळा जाऊ शकतील. शत्रूला आपल्या संदेशवहनात हस्तक्षेप करता येऊ नये, तसेच त्याच्या प्रदेशातून उड्डाण करताना त्याच्या संदेशवहनामध्ये अडथळे आणता यावेत यासाठी ‘सुपर-३०’मध्ये जॅमर बसविले जाणार आहेत. यावर बसविला जाणारा फाझोट्रॉन-एई हा रडार विमान हवेत उडत असताना एकाचवेळी ३० लक्ष्यांचा शोध घेऊन त्यातील ६ लक्ष्यांवर एकाचवेळी हल्ला करण्यास सक्षम असणार आहे.

अशा प्रकारे अत्याधुनिकीकरण झालेले ‘सुपर-३०’ अंतिम करार झाल्यावर दोन वर्षांनी भारतीय हवाई दलात येण्याची शक्यता आहे.  मोठी शस्त्रास्त्रवहन क्षमता, चपळपणा असलेले ‘सुपर-३०’ पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाच्या वैशिष्ट्यांशी बरेच साधर्म्य असलेले विमान ठरेल. त्याचबरोबर यावर बसविण्यात येणारे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) ‘ब्रह्मोस’, सबसॉनिक ‘निर्भय’ आणि मानवी दृष्टीपलीकडील लक्ष्यभेद करू शकणारे स्वदेशी बनावटीचे ‘अस्त्र’ या क्षेपणास्त्रांमुळे ‘सुपर-३०’ची मारकक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एवढेच नाही तर, ‘अॅवॅक्स विमानांचा कर्दनकाळ’ म्हणून ओळखले जाणारे रशियन बनावटीचे ‘के-१००’ हे क्षेपणास्त्रही यावरून वाहून नेले जाणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांमुळे ‘सुपर-३०’चे आणि पर्यायाने भारतीय हवाई दलाची सामरिक शक्ती फार मोठी असणार आहे.

रशियाने विकसित केलेले ‘सुखोई-३५’ हे बहुउद्देशीय लढाऊ विमान पाचव्या पिढीच्या विमानाच्या अगदी जवळचे समजले जाते. हे विमान भारताला विकण्याची रशियाने काही वर्षांपूर्वी ऑफर दिली होती. मात्र ही नवी विमाने खरेदी करण्याऐवजी सध्याच्या ‘सुखोई-३० एमकेआयचे’च अत्याधुनिकीकरण करण्याला सरकारने प्राधान्य दिले. आधुनिकीकरणानंतर सध्याचे ‘सुखोई-३० एमकेआय’ हे ‘सुखोई-३५’च्या अगदी समतुल्य होणार आहे. दरम्यान, रशियाने चीनला ४० ‘सुखोई-३५’ विमाने विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने दक्षिण आशिया आणि हिंदी महासागर क्षेत्रावरील आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी साधारण ४ अब्ज डॉलरचा ‘सुपर-३०’ प्रकल्प लवकरात लवकर चर्चेच्या पुढे सरकणे आवश्यक आहे.
-पराग पुरोहित (संरक्षण अभ्यासक) 
बातम्या आणखी आहेत...