आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवरील भ्रष्टाचारामुळे अमेरिकेला धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉन निक्सन, आंतरिक सुरक्षा रिपोर्टर
२०१२ मध्ये जोहून डेव्हिड ली हा केंद्रीय गृह संरक्षण विभागाच्या लॉस एंजलिस शाखेत तैनात होता. कोरियाशी व्यापारासंबंधीची एक जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. त्याच्यावर मानवी तस्करीचा आरोप झाला आहे. कोर्टातील अहवालानुसार पुढील सत्य समोर आले. ली याने व्यापाऱ्याच्या तपासाऐवजी त्याच्या व त्याच्या अन्य नातेवाइकांकडून ९ लाख रुपयांची लाच आणि भेटवस्तू घेतल्या. त्यानंतर हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला. गृह संरक्षण विभागाने ली याच्यावर स्थलांतर तसेच सीमा शुल्क अंमलबजावणी विभागाची जबाबदारी सोपवली होती. अखेरीस कोर्टाने निकाल दिला- ‘हे संपूर्ण प्रकरण मानवी तस्करीसंबंधित असे वाटते. मात्र यात पुरेसे पुरावे नाहीत. साक्षीदारांच्या जबाबावरूनही आरोप सिद्ध होत नाहीत.’ अखेरीस हे प्रकरण बंद करण्यात आले. लीवर कोणतीही कारवाई झाली नाही. 
काही काळानंतर इतर अधिकाऱ्यांच्या तपासात अन्य काही प्रकरणांमध्ये ली लाच घेऊन व्यवहारात घोटाळे होऊ देत होता, असे समोर आले. कोरियन व्यापाऱ्याच्या प्रकरणातही लाच घेतली गेली होती. अखेरीस गेल्या जुलै महिन्यात त्याला १० महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. अमेरिकन सीमा सुरक्षेबाबतचे ली हे केवळ एक उदाहरण आहे. द न्यूयॉर्क टाइम्सने कोर्टातील हजारो प्रकरणांच्या नोंदी आणि गेल्या १० वर्षांतील अंतर्गत सुरक्षेसंबंधी कागदपत्रांचा अभ्यास केला. यावरून देशाचे संरक्षण आणि स्थलांतराच्या प्रक्रियेतील कायद्याचे पालन करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या सुमारे २०० कर्मचारी आणि अस्थायी कर्मचाऱ्यांनी १०२ कोटी रुपयांची लाच घेतल्याचे दिसून आले. या महाभागांनी कित्येक टन अमली पदार्थ आणि हजारो लोकांना बेकायदेशीररीत्या अमेरिकेत प्रवेश दिला. एवढेच नाही तर या लोकांना अवैध स्थलांतर कागदपत्रे, ग्रीन कार्ड विक्री केली तसेच ड्रग तस्करांना देशांतर्गत संवेदनशील माहितीही पुरवली. एका प्रकरणात तर खबऱ्याला जिवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अनेक प्रकरणांमध्ये लाचेचा आकडा समोरच आला नाही. कारण कोर्ट रेकॉर्डमध्येच माहिती स्पष्ट नव्हती. या प्रकरणांमध्ये भेटवस्तू, पर्यटन पॅकेज आणि सुरक्षा रक्षकांद्वारे चोरी करण्यात आलेल्या रकमेचा समावेश आहे. 

अमेरिकन निवडणूक प्रचारांतील आश्वासनांवरून असे वाटते की, सीमा संरक्षणाला नवे राष्ट्राध्यक्ष सर्वोच्च प्राधान्य देतील. त्यांनी पदभार स्वीकारताच सीमा प्रकरणातील या उणिवा दूर केल्या जाऊ शकतात. गृह संरक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, स्थलांतर यंत्रणेतील अंतर्गत उणिवा जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत सीमांवर भिंती बांधण्याला काहीच अर्थ नाही. या विभागात अडीच लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. विभागाचे आयजी जॉन रोथ म्हणतात, किती लाच घेतली हा प्रश्नच नाही, या विभागातील एक कर्मचारीदेखील देशाला मोठे नुकसान पोहोचवू शकतो. 

स्थलांतर तसेच कायदेतज्ज्ञ म्हणतात, सीमेवरील एजंट्सद्वारे घुसखोरी नवी नाही. सीमांवर अत्याधुनिक सेन्सर्स असून ड्रोनची सतत गस्त असते.  अमली पदार्थ तसेच मानवी तस्करांसाठी या सीमा भेदणे कठीण आहे. त्यामुळे ते सुरक्षा रक्षकांना लाच देतात. स्ट्रेट फॉर या ग्लोबल इंटेलिजन्स कंपनीचे प्रमुख संरक्षण अधिकारी फ्रेड बर्टन म्हणतात, शीतयुद्धादरम्यान विदेशी गुप्तचर संस्था हेच मार्ग अवलंबत असत. अंतर्गत भ्रष्टाचार ही मोठी समस्या असल्याचे गृह विभागातील प्रामाणिक अधिकारीही मान्य करतात. त्यामुळेच ते अंतर्गत तपास अधिकाऱ्यांची मदत घेत आहेत. भ्रष्ट कर्मचारी ओळखण्याचे प्रशिक्षण यात दिले जाते. लाचखोरीने अमेरिकन गृह विभाग खिळखिळा झाला आहे. २०१६ मध्ये १५ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. फेब्रुवारी २०१६ मध्ये कस्टम अधिकारी जॉनी एकोस्टा यांना लाचखोरी आणि अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. एकोस्टा यांनी ४८ लाख रुपयांची लाच घेऊन एक टनाहून अधिक प्रमाणातील अमली पदार्थ अमेरिकेत पोहोचवण्यास मदत केली होती.
 
कस्टम विभागातील अंतर्गत सुरक्षेतील माजी प्रमुख जेम्स टॉम्सचेक म्हणतात, अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपूर्वीचा तपास अधिक कडक व्हायला पाहिजे. जुन्या नोंदींचा तपास आणि पॉलिग्राफ टेस्ट यामुळेच अपयशी ठरत आहे.  - © The New York Times 

नागरिकत्व देणारे अधिकारीही लाच घेतात
नागरिकत्व तसेच हवाई संरक्षणाची जबाबदारी असलेले अनेक स्थलांतर व सीमा शुल्क अधिकारीही लाचखोरीप्रकरणी अटकेत आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये लॉस एंजलिस येथील नागरिकत्व तसेच स्थलांतर सेवा केंद्रातील अधिकारी डेनिल आमोस दोषी असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी ६० लोकांना अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश दिला. यासाठी ३६ लाख रुपये लाच घेतली होती. अहवालानुसार, विमानतळावरील  संवेदनशील परिसरात तसेच पार्सल ठेवण्याचे काम करणारे अधिकारीही हजारो डॉलर्सची लाच घेऊन भ्रष्टाचार करत आहेत. विमानात बॉम्ब अथवा शस्त्रास्त्र ठेवण्यास ते मदत करतात.
बातम्या आणखी आहेत...