आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशिया जिहादच्या विळख्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्सनल लाॅचा मुद्दा भारतापुरताच मर्यादित होता; पण हे वारे भारताबाहेरही वाहू लागले आहे. इंडोनेशिया हा देश आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. तेथील लाखो मुसलमान इस्लामी कायदा पाहिजे म्हणून जिहादची भाषा करत आहेत. तेथील मुल्ला-मौलवींचे म्हणणे आहे की, पर्सनल लाॅ ही त्यांची धर्माची खरी ओळख आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही थोडीही माघार घेणार नाहीत.

इंडोनेशिया हा देश मुस्लिमबहुल असला तरी तेथील संस्कृती ही भारतीय संस्कृतीप्रमाणे प्राचीन आहे. तेथील माणूस कोणत्याही धर्माचा अनुयायी असला तरी हिंदू संस्कृती तेथे रुजल्याचे दिसते. तेथील विमानसेवेचे नाव ‘गरुड’ आहे. तेथील पंतप्रधान भारत यात्रेला निघतात तेव्हा त्यांची पत्नी त्यांना येताना आवर्जून गंगाजल आणण्यासाठी पात्र देते. त्याच इंडोनेशियातील मुसलमान आता रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची मागणी आहे की, त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी शरीयत लागू करा. हे सारे पाहून विचार येतो की राष्ट्राप्रमाणे धर्मही अत्यावश्यक बाब आहे काय? शेकडो वर्षांपूर्वीचे जुने कायदे स्वीकारून देश आणि तेथील कोट्यवधी जनतेला अंधकाराच्या गर्तेत ढकलून देणे योग्य होईल काय? पण इंडोनेशियातील कोट्यवधी मुसलमान रस्त्यावर उतरून आम्हाला केवळ आणि केवळ इस्लामी कायदाच हवा, अशी मागणी करताहेत हे धक्कादायक आहे.

शरीयत हीच आमची राज्यघटना आहे आणि त्यामुळे शरीयतला विरोध करणाऱ्याला तत्काळ हटवून दंडित केले पाहिजे. इंडोनेशियातील मुस्लिम बांधवांनाही भारतातील कट्टरवादी वर्गाप्रमाणेच शरीयतचा कायदा पाहिजे. यासाठी आता रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध जिहाद पुकारला आहे. भारतीय संस्कृतीत रमणाऱ्या इंडोनेशियाला कट्टरवादी देश बनवण्याचा चंग बांधला आहे. जकार्ता येथे कट्टरतावादी मुस्लिमांनी तेथील गव्हर्नरच्या विरुद्ध जिहाद छेडला आहे. मागील शुक्रवारी जकार्ता येथील इस्तिकलाल नामक मशिदीत तेथील गव्हर्नरच्या विरोधात इस्लामचा अपमान केल्याचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर स्थानिक गव्हर्नरच्या निवासाला चारही बाजंूनी घेरण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेसाठी तेथील सरकारने २० हजार जवान गव्हर्नरच्या घराच्या आजूबाजूला तैनात केले आहेत. बसंुकी परनामा हे तेथील गव्हर्नर असून ते ख्रिश्चनधर्मीय आहेत. आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये ते दुसऱ्यांदा गव्हर्नर बनण्यास इच्छुक आहेत; पण कट्टरवादी मुसलमानांनी आतापासून त्यांचा तीव्र विरोध सुरू केला आहे. त्यांनी कुराणातील आयतांचा दाखला देत मागणी केली आहे की, इस्लामी देशाच्या कोणत्याही भागात गैरमुस्लिमाच्या हातात सत्ता देता येणार नाही. कट्टरवाद्यांच्या मते, इंडोनेशिया हा देश लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा मुस्लिम देश आहे. त्यामुळे तेथे कोणा बिगर मुसलमानाला सत्तेत सहभागी करून घेता येणार नाही.

बसुंकी परनामा यांनी पवित्र कुराणातील आयतींचा दाखला देत म्हटले होते- मुसलमान हे कुराणातील आयतींचा उपयोग करून त्यांना सत्तेतून हुसकावण्याचे षड््यंत्र करत आहेत. थोडक्यात म्हणजे जकार्तामधील जनतेत ख्रिश्चनांबद्दल तीव्र घृणा दिसून येत आहे. मुस्लिम असा राजकीय प्रश्न विचारत आहेत की, जगात एकाही ख्रिश्चनबहुल देशात मुस्लिम सत्ताधीश बनू शकत नाही, तर मग मुस्लिम देशात कोणत्या नियमाच्या आधारे ख्रिश्चनांना सत्ताधीश बनवता येईल? त्याची धर्मनिरपेक्षता ही केवळ अन्य धर्मांसाठी आहे. त्यामुळे आता इंडोनेशियातील सत्ता पूर्णपणे मुस्लिमांच्या हाती असली पाहिजे. मुस्लिमांचा पर्सनल लाॅ हाच तेथील नॅशनल लाॅ असला पाहिजे. त्या लोकांना देशाबाहेर काढले पाहिजे, जे आतून कट्टरवादाची जोपासना करतात आणि सत्ताधीश बनण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा जप करतात. त्यांच्यावर फतवा लागू करून त्यांना सत्तेतून दूर फेकले पाहिजे.

ख्रिश्चन आणि इस्लाम आमने-सामने आले आहेत. मुस्लिम कट्टरवादी आता जाहीररीत्या इंडोनेशियाला इस्लामी देश घोषित करण्याची मागणी करत आहेत. यासाठी जनमत घेण्याची मागणीही मूळ धरत आहे. त्यामुळे तेथील बिगरमुस्लिम अधिकारी आणि कर्मचारी भयभीत झाले आहेत. आता धर्मनिरपेक्ष इंडोनेशियात जिहादी दहशतवाद शक्तिशाली होत आहे. येत्या काळात ख्रिश्चन आणि जिहादी यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शरीयत आणि पर्सनल लाॅचा हा करिष्मा असल्याचे मानले जात आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी घरी बसूनच काम करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विदेशी दूतावासाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पेट्रोल पंप आणि शाॅपिंग माॅलच्या ठिकाणी सशस्त्र जवान तैनात केले आहेत. इस्लामिक डिफेंडर्स फ्रंटने मागणी केली आहे की जकार्ताच्या गव्हर्नरला इस्लामचा अपराधी घोषित करून जेलमध्ये बंद करण्यात यावे. ख्रिश्चन गव्हर्नरने प्रतिस्पर्धी उमेदवाराशी चर्चा करताना इस्लामचा दाखला दिला होता. असे केल्यामुळे त्यांना दंड करणे आवश्यक आहे. परनामा यांनी या प्रकरणात आधीच क्षमायाचना केली आहे. राष्ट्रपती विडिडो यांनी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अल्पसंख्याक समुदायाबद्दल सहानुभूती बाळगणे आपल्या साऱ्यांचे दायित्व आहे. जगात इंडोनेशियाची जी ओळख आहे ती आपण जपली पाहिजे. इंडोनेशियात धर्माच्या आधारे भेदभाव करता येणार नाही, अशी भूमिका राष्ट्रपतींनी घेतली आहे.

भारतात जे नेहमी पाहायला मिळते तेच आता इंडोनेशियात पाहायला मिळत आहे. थोडक्यात सांगायचे तर तेथील मुस्लिम कोणत्याही परिस्थितीत ख्रिश्चन गव्हर्नर किंवा ख्रिश्चन राष्ट्रपती स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाहीत. एकेकाळी हिंदूबहुल असलेला इंडोनेशिया मुस्लिमबहुल झाला. मुस्लिमबहुल झाल्यानंतरही तेथे सर्वसमावेशक हिंदू संस्कृती नांदत होती. आता तेथे जिहादी कट्टरवादाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. हे वेळीच रोखले नाही तर विनाश निश्चित आहे.
- मुजफ्फर हुसेन
बातम्या आणखी आहेत...