आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानकर, हा महाराष्ट्र आहे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद करावा आणि आपल्या उमेदवाराला कपबशी हे चिन्ह द्यावे म्हणून धमकावल्याची चित्रफीत व्हायरल झाली. एका वृत्तवाहिनीने ही चित्रफीत प्रसारितही केली आहे. त्यामुळे जानकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही भगवान गडावर त्यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीने पलटवार केला. कार्यकर्त्यांमध्येही संतापाची लाट पसरली होती. जरा, जपून बोला म्हणून त्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना सल्लाही दिला होता. त्यानंतर जानकरांनी आपण असे बोललो नाही, माझ्या बोलण्याचा हा उद्देश नव्हता, असे स्पष्टीकरण दिल्यामुळे वाद थांबला होता. आता तर त्यांनी निवडणूक आचारसंहितेचाच भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना साहजिकच विषय मिळाला. मंत्रिपदाचा गैरवापर करून निवडणूक अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या जानकरांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसही बजावली. त्यानंतर त्यांनी आपले स्पष्टीकरण देताना पहिल्या घटनेप्रमाणेच घूमजाव केल्याचे दिसते. मी निवडणूक अधिकाऱ्याला विनंती केली, धमकावले नाही. त्यांच्या स्वायत्ततेला बाधा येईल, असे काहीही त्यांना बोललो नसल्याचा जानकरांनी खुलासा केला आहे. त्यांचा खुलासा तपासल्यानंतर कृत्यात तथ्य आढळून आले तर आयोग त्यांना समज देईल किंवा अन्य कारवाई देखील करू शकते. पण आज त्यांच्या या वक्तव्याने ते स्वत: जेवढे अडचणीत आले आहेत, तेवढेच भाजप सरकारही विरोधकांच्या कैचीत सापडले आहे. भाजप सरकारने नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पहिल्या क्रमांकाची मते आणि पालिका विजय मिळवला आहे. त्यांच्या या निर्विवाद वर्चस्वावरही अशा कृत्यांनी प्रश्नचिन्ह लागते. मुख्यमंत्र्यांनी जानकरांना यापूर्वी जपून वागण्याची तंबी दिली होती. आता जपून बोलण्याचा इशाराच त्यांना द्यावा लागणार आहे.


जानकर हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पळसावडे येथील रहिवासी आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात प्रवेश केला. धनगर समाजातून आणि अत्यंत गरीब परिस्थितीतून ते पुढे आले आहेत. धनगर समाज हा पश्चिम महाराष्ट्रासोबतच, मराठवाडा आणि खान्देशात चांगल्या प्राबल्याने आहे. या समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या विचाराने त्यांनी अभ्यासपूर्ण लढा देऊन नेतृत्व केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक, शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अनुक्रमे माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते प्रकाशझोतात आले. सुप्रिया सुळेंच्या विरोधात अत्यंत अटीतटीची लढत त्यांनी दिली होती. पराभवानंतरही त्यांना मिळालेली मते ही वाखणण्यासारखीच होती.

दरम्यान, त्यांनी स्वबळावर आणि चळवळीतून आलेल्या अभ्यासू कार्यकर्त्यांच्या जोरावर राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. काशीराम यांच्या बहुजन समाज पक्षापासून प्रेरणा घेत त्यांनी या राष्ट्रीय पक्षाची स्थापना केल्याचे ते सांगतात. हा पक्ष त्यांनी नावाला राष्ट्रीय न ठेवता २००४ आणि २००९ मध्ये महाराष्ट्रासह आसाम, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गोवा येथेही उमेदवार देऊन निवडणूक लढवली हाेती. प्रत्येक निवडणुकीत त्यांना मिळणाऱ्या मतांचा ग्राफ वाढतच गेला. भाजपलाही बहुजन समाजातील मतांनी आणि ते मिळवून देऊ शकतील, अशा नेतृत्वाने आकर्षित केले. स्व.गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून त्यांनी राजकारणात पाळेमुळेही रुजवण्याचा चांगला प्रयत्न केला. मतांचे राजकारण पहाता त्यांना गत विधानसभा निवडणुकीत भाजपने घटक पक्ष म्हणून महायुतीत घेतले. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर आणि नंतर थेट मंत्रिमंडळात स्थान दिले. मंत्री झाल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळवून दिले नाही म्हणून ते नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या धारदार वक्तव्याने भाजप आणि सरकार अडचणीत येत आहे. आता तर त्यांनी कहरच केला. ज्या महाराष्ट्राची परंपरा निवडणुका निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्याची आहे. त्या परंपरेलाच तडा जाईल, असे कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यांनी जर हे खरोखर केले असेल तर त्यामुळे सरकारबद्दल जनमानसाच्या मनात वेगळी भावना निर्माण होईल. यात सरकार बदनाम होईल. जानकर ज्या घटकातून वर आले आहे, त्यांच्याकडे पाहण्याचा यामुळे दृष्टिकोनही बदलेल. ते सांगतात त्या पद्धतीच्या संघर्षातून जानकर पुढे आले असे मानले तर त्यांचे असे वागणे बरे नव्हे, असे वाटते.

- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव
बातम्या आणखी आहेत...