आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चो रामस्वामी : बहुढंगी पत्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनानंतर ३६ तासांनंतर त्यांचे मित्र, मार्गदर्शक ‘चो रामस्वामी’ यांचे निधन झाले. चेन्नईच्या अपोलो हाॅस्पिटलमध्ये जेव्हा जयललिता यांच्यावर उपचार होत होते, तेव्हा त्याच हाॅस्पिटलमध्ये रामस्वामी यांच्यावरही उपचार चालू होते. मरिना बीचवर मंगळवारी सायंकाळी जयललिता यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्याचे सर्व धावते वर्णन चो यांनी टीव्हीवर पाहिले. योगायोगाने दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले. जयललिता यांचा एक निकटवर्ती पत्रकार केवळ एवढ्यापुरतेच चो रामस्वामी यांचे व्यक्तिमत्त्व मर्यादित नव्हते. ८२ वर्षांच्या वाटचालीत प्रखर राजकीय भाष्यकार, रंगभूमी, तामिळ चित्रपट, दूरदर्शन मालिकांचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि ‘तुघलक’ या तामिळ साप्ताहिकाचे मुख्य संपादक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली. प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे काम एवढे महत्त्वपूर्ण होते की तामिळनाडूला या बहुरंगी बहुढंगी पत्रकाराची दखल घ्यावीच लागली. २३ नाटकांचे लेखन, दिग्दर्शन व अभिनय करताना ते एवढे रंगून गेले की त्यात त्यांचे मूळ नावदेखील हरवले. श्रीनिवासा अय्यर रामस्वामी हे त्यांचे मूळ नाव. ‘थेंमोझियाल’ या नाटकातील भूमिकेने त्यांना नवीन नाव दिले. त्या नाटकानंतर श्रीनिवासा हे नाव गळून पडले. ‘चो रामस्वामी’ अशी नवीन ओळख त्यांना मिळाली आणि ती त्यांनी आयुष्यभर जपली. पत्रकारितेच्या क्षेत्रातले एवढे बहुरंगी व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात नाही. ज्येष्ठ पत्रकार विद्याधर गोखले यांची कामगिरी थोडेसे साधर्म्य दाखवते.

चो रामस्वामी यांचे कुटुंब कायदे व्यवसायातले. त्यांचे आजोबा, वडील, काका हे चेन्नईतील प्रसिद्ध वकील. चो यांनीही उच्च न्यायालयात वकिली केली. त्यांचे चळवळे मन रमले नाही, रंगभूमीकडे वळले. त्यांच्या पहिल्याच नाटकानं त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. जवळपास २०० चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांनी काम केले. चार चित्रपटांचे दिग्दर्शन केले, पटकथा लिहिल्या. एवढे असूनही त्यांची खरी ओळख होती ती एक पत्रकार म्हणूनच. त्यांनी ‘तुघलक’ हे तामिळ साप्ताहिक सुरू केले. त्यातील त्यांचे ‘मोहंमद बिन तुघलक’ हे राजकीय सदर लोकांना आवडायचे. एक लहरी राजा संसदीय लोकशाहीची कसा खेळ करतो, ही त्यांनी आणीबाणीच्या काळात लिहिलेली गोष्ट खूप गाजली. उत्कृष्ट पत्रकारितेचा बी. डी. गोयंका पुरस्कारही त्यांना िमळाला होता. एक पत्रकार राज्याच्या राजकीय घडामोडींमध्येही महत्त्वाची भूमिका कशी बजावू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चो रामस्वामी. इंदिरा गांधी, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज, मुपनार, जयप्रकाश नारायण अशा बऱ्याच दिग्गजांशी त्यांचे जवळचे संबंध होते. काँग्रेसच्या फुटीच्या काळात एकीकरण होण्यासाठी इंदिरा गांधी व कामराज यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी काम केले होते. नरेंद्र मोदींची तामिळनाडूतील जनतेला ओळख जी झाली ती तुघलक साप्ताहिकाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने
अलीकडच्या काळात चाे रामस्वामी ओळखले जायचे ते जयललिता यांचे ‘फ्रेंड, फिलाॅसाॅफर, गाइड’ म्हणून. त्यातही सुरुवातीच्या काळात उतार व नंतर चढाव होते. दोघांनीही अनेक चित्रपटांत एकत्र भूमिका केल्या.

एम. जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर जयललितांकडे राजकीय वारसा या नजरेतून पाहिले जायचे. पण मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला तो एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांचा. या सरकारने कार्यकाळ पूर्ण करावा, असे चो यांना वाटायचे. पण तसे झाले नाही. त्यानंतर जयललिता मुख्यमंत्री झाल्या तेव्हा चो त्यांचे प्रमुख विरोधकही होते. त्यांच्या विरोधात डीएमके व मुपनार यांच्या तामिळ मनिला काँग्रेस(टीएमसी)ला एकत्र आणण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी रजनीकांतलाही आवाहन केले होते. या सगळ्या खटपटींमध्ये दूरदृष्टी असलेला पत्रकार असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व ध्वनित होत होते. १९९९ च्या निवडणुकीत जयललिता यांच्याकडे पाठिंबा मागू नका, असे त्यांनी भाजपला बजावले होते. त्यांची ती भूमिका योग्यच होती, असे पुढे सिद्धही झाले. नंतर जयललिता यांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे वाजपेयी सरकार कोसळले. पुढे २००१ नंतर मात्र रामस्वामी यांनी जयललितांशी मिळते जुळते घेतले. ती त्यांची ‘राजकारणातील उलटी उडी’च म्हणावी लागेल. पाच वर्षांपूर्वी जयललितांच्या विरोधात डीएमके व टीएमसीची मोट बांधली होती. २००१ च्या निवडणुकीत मात्र त्यांनी जयललिता व टीएमसी यांना एकत्र आणले. त्यानंतर मात्र दोघांच्याही अखेरच्या काळापर्यंत जयललिता व चो रामस्वामी मित्र मार्गदर्शक म्हणूनच राहिले. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणावरील चित्रपट अभिनेत्याचा प्रभाव जसा संपला, तसेच चो रामस्वामी यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील बहुढंगी व्यक्तिमत्त्वाची अखेर झाली.

संजीव पिंपरकर निवासी संपादक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...