आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेची प्रतिष्ठा लोकप्रतिनिधींच्या हाती!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात लोकशाही व्यवस्था असून संसद हा त्याचा मुख्य भाग आहे. संसदीय परंपरेनुसार योग्य चर्चेद्वारे संविधान सभेने भविष्यातील शक्यता अधोरेखित करत भारतीय संविधानास जन्म दिला. मात्र, वर्तमान स्थिती पाहता सदनात निकोप चर्चेचा अभाव दिसून येतो. सध्याच्या हिवाळी अधिवेशनात तर एकाच मुद्द्यावरून वारंवार संसद स्थगित करण्यात आली. अर्थ विधेयक तेवढे वादरहित पारित झाले. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेप्रती कमी आणि राजकीय पक्षाप्रती अधिक निष्ठावान बनले आहेत का, असा प्रश्न उभा राहतो. सव्वाशे कोटी लोकांचे प्रतिनिधी या सभागृहापर्यंत लोकांचे म्हणणे, समस्या पोहोचवू शकत आहेत का? की केवळ तात्कालिक मुद्द्यांवरून राजकारण करण्यात मग्न आहेत?

सत्ताधारी पक्षाची कामे तसेच प्रत्येक योजनेची समीक्षा करणे तसेच जनतेतील वास्तविकता सदनात प्रश्नांकित करणे, हे विरोधी पक्षाचे काम असते. सरकारलाही त्यावर उत्तर देणे तसेच कामांची मुदत निश्चित करणे बाध्य असते. प्रत्येक खासदाराला आपल्या मतदार क्षेत्रात लागू असलेल्या सर्व योजनांची आतापर्यंतची सर्व आकडेवारी घेऊन सदनात उपस्थित राहणे आवश्यक असते. यावरून सरकारच्या उपक्रमांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे की नाही, हे निश्चित केले जाते.

संसदेतील निकोप चर्चेमुळे देशभरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. विविध सामाजिक मुद्द्यांवर आपल्या नेत्याचे मत, विचार काय आहेत, हे लोकांना कळते. संसदेतील प्रभावी भाषणांचा जनतेवर सकारात्मक परिणाम होतो. भविष्यातील पिढीला समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे खासदारांकडून संसदेला तिच्या हक्काची प्रतिष्ठा मिळवून देणे अपेक्षित आहे.

-प्रतीक भालेकर, २०, बीई, अल्मनाई
राजीव गांधी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, भोपाळ
er.bhalekarprateek@gmail.com
बातम्या आणखी आहेत...