आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलराज साहनी : एक अभिनेता-भाष्यकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलराज साहनी हे नाव डोळ्यासमोर येताच एक अपार खोली आणि करुणा असलेल्या मानवी संवेदनेचा चेहरा समोर येतो. खरं तर बलराज साहनींची पिढी म्हणजे आमच्यासाठी आधीची पिढी, पण त्यांच्या चित्रपटांनी आणि साहित्याने हे अंतर मिटवून टाकलं. 

बलराज साहनी यांचा सिनेमा जास्त कळायला आणि भावायला लागला तो सामाजिक चळवळीशी जोडले गेल्यानंतर. विशेषत: महिला चळवळीशी जोडले गेल्यानंतर. स्वत: स्त्री असणं आणि दुय्यमत्वाचं कठोर वास्तव समोर आल्यावर ‘सीमा’ चित्रपटात शिक्षा भोगण्यासाठी आलेली गौरी (नूतन) म्हणते, ‘मला इथे राहायचं नाही, पळून जायचं आहे.’ त्यावर अनाथाश्रमाचे व्यवस्थापक बाबूजी (बलराज साहनी) म्हणतात, ‘मैं भी चाहता हूं यहां से भाग जाऊ, लेकीन नहीं जा सकता। हमारी इस छोटीसी दुनिया में चारो तरफ निराशा है, दु:ख है, टूटे हुए सपने हैं, इन से भागकर हम कहां जा सकते हैं?’ हे एेकताना दु:खाशी दोन हात केले पाहिजेत, अशी ठाम भावना मनात दाटून आल्याचं आठवतं. त्यांच्यावर चित्रित झालेली गाणीही तेवढीच अर्थपूर्ण!  “तू प्यार का सागर है’ किंवा “कहां जा रहा है तू ऐ जाने वाले...’ अशी आयुष्य उजळून टाकणारी गाणी. 

बलराज यांचे काळजाला भिडलेले आणखी दोन चित्रपट म्हणजे ‘दो बिघा जमीन’ आणि ‘गर्म हवा’! ‘दो बिघा जमीन’मध्ये एका लहान शेतकऱ्याची सावकारी पाशामुळे झालेली शोकांतिका, पराकोटीचं दारिद्र्य आणि मानवी मूल्यांचं होत जाणारं अध:पतन, माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा लयाला जाणं, मानवी दु:खाची परिसीमा आहे. माणसांचं ओझं वाहत, रिक्षा ओढत जाणारा, संपत्तीच्या मस्तीत असलेल्यांनी निर्माण केलेल्या परिस्थितीत आणि स्पर्धेचा बळी ठरलेला शंभू महातो काळजात केवळ कालवाकालव निर्माण करत नाही तर विचार करायलाही भाग पाडतो. आजची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे अशा विचार करायला भाग पाडणाऱ्या माणसांची कधी नव्हे इतकी गरज आहे. 

बलराज साहनींचा असाच एक सिनेमा आहे, ‘गर्म हवा’. या सिनेमात फाळणीमुळे संपूर्ण देशावर, समाजावर झालेला परिणाम तर दाखवला आहेच; पण हिंदू-मुस्लिम समाजाच्या संबंधावर झालेला दु:खद परिणामही दाखवला आहे. या कथेचे नायक मिर्झा साहेब यांनी मनाने फाळणी स्वीकारलेली नाही. त्यांना पाकिस्तानला जायचे नाही. त्यांचे नातेवाईक एकेक करून निघून जातात. त्या फाळणीची आणि मानवी मूल्यांच्या अध:पतनाची किंमत त्यांच्या मुलीने स्वत:चाच जीव घेण्यामध्ये होते. कोसळून पडलेले मिर्झा साहेब जायला निघतात, पण त्यांचा सामना जनांच्या प्रवाहाशी होतो. आपल्या मुलाला ते सांगतात, त्या प्रवाहात सामील हो. ‘इन्सान कब तक अकेला जी सकता है।’  

या पार्श्वभूमीवर मिर्झा साहेब त्या मनांच्या प्रवाहात सामील होतात. आता हा प्रवाह न जाणे कुठे लुप्त झाला आहे. अशा भूमिका करताना बलराज साहनी भूमिकेशी एकजीव होऊन जायचे. बलराज साहनी यांनी स्वत: फाळणीचे दु:ख सोसले होते. आता पाकिस्तानमध्ये असलेल्या रावळपिंडीला त्यांचा जन्म झाला. फाळणीनंतर अतिशय समृद्ध, संपन्न असलेल्या त्यांच्या कुटुंबाला निर्वासित म्हणून जगण्याची पाळी आली; पण फाळणीचं वास्तव स्वीकारताना त्यांनी एका समाजाला जबाबदार धरले नाही, त्यामुळे ती कटुता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात, विचारात दिसली नाही. 

बलराज साहनी यांचं उच्चशिक्षण लाहोरमध्ये झालं. विद्यार्थिदशेतही त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता होती. ब्रिटिशकालीन, मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीबाबत त्यांची मतं स्पष्ट होती. एका उच्चपदस्थांसाठी आयोजित भोजन समारंभात बलराज साहनी म्हणाले, ‘या देशातील शिक्षणपद्धती भोजन समारंभासारखी आहे. पाहुणे अत्यंत चांगल्या पेहरावात उपस्थित आहेत. चांदीचे चमचे आणि महागड्या कपबशा यांनी टेबल झगमगतंय, असंख्य वाढपे आकर्षक गणवेशात आहेत; परंतु अरेरे, खाण्यास काहीच नाही.’ यापेक्षा आजच्या शिक्षण पद्धतीचं समर्पक वर्णन काय असू शकतं? बलराज साहनी यांची फारशी समोर न आलेली भाषाविषयक भूमिका थक्क करणारी आहे. 

१९७२ मध्ये जेएनयूच्या पदवीप्रदान समारंभात बोलताना बलराज साहनी यांनी इंग्रजी भाषा आणि भाषा माध्यमाबद्दल मार्मिक भाष्य केलं. इथल्या धनिक, उद्योगपती आणि सत्ताधारी लोकांना इंग्रजीचा प्रसार हा कसा उपयोगी पडतो, भाषेच्या आडून वर्गीय हितसंबंध कसे बळकट केले जातात आणि या वर्गाचे हितसंबंध हेच राष्ट्रीय हितसंबंध असे भासवले जाते, असं त्यांचं विवेचन होतं. आज यापेक्षा काय वेगळी स्थिती आहे. आणि हे लक्षात घ्या की हे १९७२ मधलं भाषण आहे. 

बलराज साहनी यांनी उर्दू भाषेच्या राजकारणाबाबतदेखील त्या काळी आपलं स्पष्ट मत नोंदवलं आहे आणि ते भाषेचं राजकारण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. त्या काळात मुंबईत भरलेल्या काही उर्दू परिषदांमध्ये उर्दूला अल्पसंख्याकांची भाषा म्हणून स्थान मिळावे, अशी मागणी सुरू केली होती. त्यावर टीका करताना बलराज साहनी यांनी लिहिलं होतं, ‘ही ब्रिटिशांची वृत्ती आहे, भाषेचा संबंध धर्माशी जोडण्याची. उदा. उर्दू ही पंजाबची भाषा बनवण्याचं कारण पंजाबमधले बहुसंख्य लोक मुसलमान आहेत. अशा रीतीने समाजामध्ये जातीयतेचे विष कालवायचे. ज्या प्रदेशामध्ये उर्दू ही मातृभाषा नाही त्या भागामध्ये उर्दूला मान्यता मिळवून घेणे याचा अर्थ उर्दू आणि मुस्लिम अल्पसंख्याक यांची सांगड घालणे होय. उर्दू ही वरिष्ठ वर्गाची, शहरी रहिवाशांची आणि दरबारी लोकांची भाषा आहे. परंतु उर्दू लेखन करणाऱ्यांमध्ये हिंदूही होते आणि मुसलमानही. मात्र, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात उर्दूला समानता मिळायला हवी, हे नि:संशय. कारण त्या प्रदेशाची उर्दू ही मातृभाषा आहे.’ 

‘मेरी फिल्मी अमरकथा’मध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘मार्क्सवादाने मला भाषेच्या समस्येकडे शास्त्रीय दृष्टीने पाहायला शिकवले, टागोर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या प्रभावामुळे माझी अशी भूमिका आहे की, कुठल्याही कलावंताच्या आणि लेखकाच्या लेखी मातृभाषा ही आपल्या अाविष्काराचे सर्वोत्कृष्ट माध्यम होय.’ 

बलराज साहनी यांना भारतातील विविधतेची सखोल जाणीव आहे. ‘आपला देश हा अनेक प्रकारच्या लोकांचे आणि राष्ट्रांचे कुटुंब आहे. प्रत्येकाला समान अधिकार प्राप्त झाले पाहिजेत.’ कुठलाही विचार न करता एक देश एक भाषा, एक देश एक धर्म, एक देश आणि आम्ही म्हणतो ती संस्कृती, असं म्हणणाऱ्या लोकांसाठी हा संदेश आहे. 

बलराज साहनी यांना रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांचा वारसा लाभला. त्या विचारांच्या आधारावर त्यांनी स्वत:ला घडवलं. सर्वंकष पद्धतीने संपूर्ण आयुष्यभर ते आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिले आणि त्याच आधारावर जगले. आमच्या काळात बलराज साहनी यांची आठवण अर्थपूर्ण आहे. त्यांच्याच ‘सोने की चिड़िया’ या चित्रपटातलं गीत तसंच अर्थपूर्ण आहे.  

रातभर का है मेहमा अंधेरा, 
किस के रोके रुका है सवेरा, 
रात जितनी भी संगीन होगी,
सुबह उतनी ही रंगीन होगी...
 
 
- रझिया पटेल, सामाजिक कार्यकर्त्या
raziap@gmail.com
बातम्या आणखी आहेत...