आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिस्थिती तितकी वाईट नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत आमदार आणि खासदारांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना रात्री मांडवात पत्ते आणि जुगार खेळू देण्याची मागणी केली. त्यामुळे औरंगाबाद शहरातील गणेश मंडळांकडे पाहण्याचा दृष्टिकाेनच बदलला असण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आणि मराठवाडा विकासात मागे  असण्याचे हेच खरे कारण आहे, अशी टीका करण्याची संधी मिळाल्याचा आनंदही त्यामुळे काही मंडळींना झाला असावा. पण शितावरून भाताची परीक्षा करीत सर्व भातच अजून कच्चा आहे, असे समजण्याचे कारण नाही. आमदार आणि खासदारांनी ही मागणी जाहीररीत्या केली असली तरी औरंगाबादच्या बहुतेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ती मागणी आवडलेली नाही. ‘आम्ही पत्ते आणि जुगार खेळत नाही, आम्हाला या सवलतीची गरज नाही,’ असे ही मंडळे जाहीर करू लागली आहेत. असे जाहीर करताना त्यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या भावनाही तीव्र आहेत.  

या पार्श्वभूमीवरच औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही गणेश मंडळांची उदाहरणे विशेषत्वाने नमूद करायला हवीत. औरंगाबादच्याच छावणी परिसरासाठीच्या गणेश महासंघाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. ज्या उद्देशाने सव्वाशे वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले तो उद्देश समोर ठेवून जनप्रबोधनाचे कार्यक्रम मंडळाने आयोजित केले आहेत. त्यात कीर्तन, प्रवचन या लोकप्रिय माध्यमांचाही उपयोग करून घेतला गेला आहे. अर्थात, असे उपक्रम राबविणारी मंडळेही इथे कमी नाहीत. छावणी गणेश महासंघाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी यंदा परिसरातील पाच गरीब कुटुंबांना शौचालय बांधून दिले आहे. ज्या गरीब कुटुंबाला शासकीय योजनेचा लाभ घेता आलेला नाही आणि घरात मुली आणि महिलांची संख्या जास्त आहे, अशांचा मंडळाने नेमलेल्या समितीने शोध घेतला आणि त्यांना शौचालय बांधून दिले. त्यासाठी महासंघाने ७५ हजार रुपये खर्च केले आहेत. महासंघाचे अध्यक्ष रखमाजी जाधव यांचे त्यासाठी अभिनंदन करायला हवे.  आणखी काही गरीब कुटुंबांना अशी सोय उपलब्ध करून देता येते का यासाठीही महासंघ पुढे प्रयत्न करणार आहे, असे ते सांगतात.  

छावणी गणेश महासंघाच्या अध्यक्षांप्रमाणेच बीड जिल्ह्यातल्या परळी गावालगतच्या टोकवाडी गावातल्या डाॅ. राजाराम मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही अभिनंदन करायला हवे. टोकवाडीचे वरद गणेश मंडळही साधारण २० वर्षे जुने आहे. गावासाठी अनेक चांगले उपक्रम राबविण्याची या गणेश मंडळाची परंपरा आहे. यंदा त्यांनी दोन लाख रुपये खर्च करून गावातील पारधे वस्तीत चार सार्वजनिक शौचालये बांधून दिली. मागच्याच आठवड्यात त्यांचे लोकार्पण करण्यात आले. आता पुढच्या वर्षी गणेश मंडळाच्या पैशातून गावातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याचा त्यांचा निर्णय झाला आहे. वृक्षारोपण, गावात स्वच्छता मोहीम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे असे उपक्रम हे मंडळही डाॅ. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राबवत आलेच आहे. त्यात त्यांनी यंदा चार स्वच्छतागृहे बांधून मोठा आदर्श घालून दिला आहे याबाबतीत शंकाच नाही. 
 
असेच तिसरे उदाहरण जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील पांडेपोखरी या लहानशा गावातील गणेश मंडळाचे आहे. या मंडळाने यंदा जमा होणाऱ्या वर्गणीतून अवघी १० टक्के रक्कम गणेशोत्सवासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित सर्व रक्कम आत्महत्या केलेल्या परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या विधवांना देण्याचे त्यांनी ठरवले आहे. हे गाव लहान आहे. त्यामुळे मंडळाकडे वर्गणी म्हणून फार मोठी रक्कम जमा होणार नाही हे उघड आहे. परिणामी आत्महत्या केलेल्या पाच शेतकऱ्यांच्या विधवांना फार मोठी रक्कम मिळेल असेही नाही. प्रश्न रकमेचा नाहीच, प्रवृत्तीचा आहे. 

लहानशा गावातील मंडळाचे पदाधिकारी ही जी संवेदनशीलता दाखवताहेत तिचे मूल्य मोठे आहे आणि कौतुक त्याचेच केले पाहिजे. गणेशोत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करायचा असेल तर यासाठीच तो असला पाहिजे, ही भावना लहान लहान गावांमधूनही अशी परावर्तित होताना दिसते आहे. त्यामुळे परिस्थिती वाटते तितकी वाईट नाही हे लक्षात घेतले पाहिजे.   ही तर आहेत ठळकपणे समोर आलेली उदाहरणे. औरंगाबाद शहरात आणि मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अशी असंख्य मंडळे आहेत, जी आपापल्या परीने सार्वजनिक हित जोपासण्याची परंपरा तयार करीत आहेत. त्यांच्यापैकी काहींची उदाहरणे औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींनी शांतता समितीच्या बैठकीत दिली असती तर काही प्रमाणात तरी समितीच्या बैठकीचा उद्देश सफल झाला असे म्हणता आले असते. 
 
- दीपक पटवे, निवासी संपादक , औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...