आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुवा-बाबांच्या प्रतिसत्ता का तयार होतात?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या बाबांनी सरकारचे अपयश हेरलेले असते. जे काम खरे तर प्रशासनाकडून चांगल्या रितीने होणे आवश्यक असते ते काम तसे होत नसल्यामुळे या बाबांच्या सार्वजनिक कार्याचे बरेच कौतुक होते. कारण सरकारने अनेक चांगली धोरणे,योजना आखलेल्या असतात, त्यासाठी बराच पैसाही दिलेला असतो. पण प्रशासनातील भ्रष्टाचारात योजना ठप्प होतात आणि तिथे हे बाबा चाणाक्षपणे घुसतात.

बाबा राम रहिम याला अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ३९ लोकांचा बळी गेला. ही चिंतेची बाब आहेच, पण या बाबाला दोषी ठरवल्यानंतरही ज्या पद्धतीची शाही वागणूक सरकार व प्रशासनाकडून मिळाली ती त्याहून अधिक चिंतेची बाब आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबद्दल शिक्षा व हत्येसारख्या गुन्ह्यामध्ये चौकशी सुरू असूनही सरकार आणि प्रशासन त्याची बडदास्त ठेवण्यात पुढाकार घेते हा देशासाठी चिंतेचा विषय ठरतो. 

हरियाणातील खट्टर सरकार व बाबा राम रहिम यांचे साटेलोटेे आता लपून राहिलेले नाही. सीबीआयचे न्यायालय व चंदिगडचे उच्च न्यायालय यांनी कणखर भूमिका घेतली नसती तर बाबा कधीच सुटला असता. उच्च न्यायालयाने तर पंतप्रधानांनाही तिखट सवाल केला. परिणामी मोदी यांना आपली ‘मन की बात’ रातोरात बदलून तेथे हरियाणावर सफाई द्यावी लागली.  

तथापि, हरियाणा नव्हे, तर जवळपास सर्वच राज्यांमध्ये धार्मिक प्रतिसत्ता निर्माण झाल्या आहेत. भक्तांची संख्या जितकी मोठी तितका सत्तास्थानाचा प्रभाव जास्त. यातील प्रत्येक जण वाकड्या मार्गाने जाणारा आहे, असे नाही. देशप्रेम किंवा सामाजिक कणव यातून प्रेरणा घेऊन निरपेक्षपणे काम करणाऱ्या अनेक संस्था देशात आहेत. त्या वगळल्या तर राजकारणावर प्रभाव टाकण्याची हौस जवळपास प्रत्येक धर्मगुरूला आहे. सत्तेवर प्रभाव टाकण्याची हौस असणारे हे अध्यात्म कोणते हे समजत नाही. कारण आध्यात्मिक व्यक्तीला असल्या गोष्टींमध्ये रस नसतो. शुद्ध अध्यात्मात रंगलेली व्यक्ती लोकांची सेवा करील किंवा करणारही नाही. त्याला स्वत:ला सिद्ध करायचे नसते वा समाजाची वाहवा मिळवायची नसते. यामुळे संघटना बांधणे, नवे उपक्रम हाती घेणे यामध्ये शुद्ध आध्यात्मिक व्यक्तीचा वावर सहसा दिसणार नाही. तो असलाच तर त्याची जाहिरात होणार नाही आणि त्यामध्ये असंगाशी संग होणार नाही याची दक्षता पुरेपूर घेतली जाईल. 

शुद्ध आध्यात्मिक उद्देशांपलीकडे अनेक धार्मिक संस्था असतात. त्या सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात करतात. त्यांच्या व्यासपीठावर नेत्यांसह समाजाच्या सर्व क्षेत्रांतील प्रतिष्ठित येऊन बसतात. त्यांचे प्रदर्शन कौशल्य बहारीचे असते. देशासमोरील बहुतेक सर्व समस्यांवर त्यांच्याकडे तोडगा असतो व त्या तोडग्याचा हिरिरीने पुरस्कार करणाऱ्यांचे थवे माध्यमांमधून हिंडत असतात. आरोग्याच्या मोहिमांमध्ये ते हिरिरीने भाग घेतात. शैक्षणिक कार्यात पुढे राहतात. गरिबांना शिष्यवृत्ती मिळेल, वैद्यकीय मदत मिळेल, अन्न-वस्त्र मिळेल यासाठी कार्यकर्त्यांची फौज कामाला लावतात. क्वचित गरिबांच्या निवाऱ्याचीही सोय करतात. विपुल दानधर्म व त्याची त्याहून विपुल प्रसिद्धी ते करतात. या धर्मगुरूंचा शिष्यवर्ग मोक्षप्राप्तीसाठी हे सर्व करत असतो. मोक्षप्राप्तीसाठी व्यभिचार होत असेल तर तेही त्याला मान्य असते. 

प्रत्येक बाबाचा बारकाईने अभ्यास केला तर त्याचे आतले शिष्य फार थोडे असतात. त्यांचीच संघटनेवर हुकूमत असते. या आतल्या वर्तुळाकडूनच बाबा अनेक गैरव्यवहार करून घेत असतात. मात्र, स्वत:ला ते सफाईने सर्वांपासून दूर ठेवतात. म्हणून गैरव्यवहार झाले, अत्याचार झाले, व्यभिचार झाला तरी त्याचा दोष शेवटी बाबाच्या जवळ असलेल्या एक-दोन शिष्यांवर टाकला जातो. अन्य लाखो साधकांची बाबावरील श्रद्धा कायम राहते. प्रश्न असा येतो की, अशा बाबांच्या नादी लाखो लोक का लागतात आणि त्याला शिक्षा झाल्यावर कायदा हातात घेण्याची हिंमत त्यांच्याकडे कुठून येते? 

हे तथाकथित धार्मिक बाबा स्वत:चे प्रस्थ वाढवण्यास सामाजिक कार्याचा सफाईने उपयोग करून घेतात का, हा अभ्यासाचा विषय आहे. या बाबांनी सरकारचे अपयश हेरलेले असते. जे काम खरे तर प्रशासनाकडून चांगल्या रीतीने होणे आवश्यक असते ते काम तसे होत नसल्यामुळे या बाबांच्या सार्वजनिक कार्याचे बरेच कौतुक होते. इथे खरे तर सरकारपेक्षा प्रशासनाला अधिक दोष दिला पाहिजे. कारण सरकारने अनेक चांगली धोरणे, योजना आखलेल्या असतात, त्यासाठी बराच पैसाही दिलेला असतो. पण प्रशासनातील भ्रष्टाचारात योजना ठप्प होतात. पैसा भलत्यांच्या हाती जातो. रुग्णालये, साध्या वैद्यकीय सेवा, शाळांसाठी वाहतूक, शिक्षण, रोजगार, उद्योग अशा योजना ठप्प होतात आणि तिथे हे बाबा चाणाक्षपणे घुसतात. 

उत्तर भारतात ३००हून अधिक डेरे आहेत. ते अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे चालवत आहेत. असेच काम बाकी काही बाबा अन्य राज्यांत चालवतात. ज्या सेवा सरकारकडून मिळणे आवश्यक आहे, त्या सेवा या धर्मसंस्थांकडून तत्परतेने व बहुधा मोफत मिळतात. औषधपाणी मिळते, मुलांची शिक्षणे होतात, रोजगार मिळतात, अडचणीच्या वेळी कर्ज मिळते, जेवणखाण्याचा प्रश्न मिटतो. आयुष्य नैराश्य येऊ नये इतपत चांगले होते. बाबांकडे विविध कारणांसाठी पैसेेवाल्यांची रांग लागलेली असते, त्यातील थोड्या पैशातूनही लाखो गरिबांचे जगणे सुसह्य करणे बाबांना अशक्य नसते. प्रशासकीय सेवेतील भ्रष्टाचार, दिरंगाई यातून बाबांना काम करण्यास संधी मिळते. नंतर त्याचा विस्तार इतका होत जातो की प्रशासनाला बाबांच्या पाया पडावे लागते. या बाबांना आपल्या कार्यक्रमासाठी नेतेमंडळी लागतात, ती प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकण्यासाठी. एकदा बडा नेता व्यासपीठावर दिसला की प्रशासकीय अधिकारी सुतासारखे सरळ येतात. बाबांची कामे झटपट होतात आणि झटपट कामातून प्रभावही झटपट वाढतो. 

हा प्रभाव इतका वाढतो की कायदा झुगारून देण्याची वृत्ती येते. प्रथम लहानसहान गोष्टींमध्ये कायदा झुगारून काम केले जाते. पुढे गरज पाहून मोठ्या प्रकरणात शक्तिप्रदर्शन केले जाते. शक्तिप्रदर्शनापुढे सरकारसह सर्वच शरण येतात, कारण जमावाचा धाक सर्वांनाच असतो. युरोप-अमेरिकेत चर्च व अन्य धार्मिक संघटनांचा प्रभाव कमी नाही. निवडणुकीसाठी चर्चची मदत घेण्याचा प्रयत्न सर्व पक्ष करतात व निवडणुकीवर धर्मगुरू प्रभावही टाकतात. पण हा प्रभाव धर्माशी संबंधित नैतिक वर्तणुकीबाबत असतो. रोजच्या जीवनाशी निगडित अशा समस्यांवर धर्मगुरू प्रभाव टाकत नाहीत. कारण त्यांना तशी संधी तेथील प्रशासन देत नाही. सरकार व प्रशासनाने रोजचे जगणे सुलभ व कार्यक्षम करून ठेवले असल्याने धर्मगुरूंचा प्रभाव हा निव्वळ धार्मिक गोष्टींपुरता राहतो. त्यांची प्रतिसत्ता निर्माण होत नाही. भारतात मात्र प्रतिसत्ता होते. येथील अकार्यक्षम प्रशासन यंत्रणा प्रतिसत्ता निर्माण करण्यास वाव देते. प्रतिसत्ता केवळ धार्मिक नेत्यांकडूनच निर्माण होत नाही. प्रभाव टाकणारी कोणतीही व्यक्ती किंवा संघटना आपल्या परिसरात प्रतिसत्ता निर्माण करते. कारण प्रशासन सर्व स्तरांवर खंगलेेले आहे. देशातील प्रशासन खंबीर व कार्यक्षम झाले तर अशा संघटनांना प्रभाव टाकणे व टिकवणे अवघड होईल. पंतप्रधान मोदी नव्या युगाची भाषा करतात. ते नवे युग उत्तम प्रशासनातून येऊ शकते. काँग्रेसच्या राज्यात प्रशासनाची पुरती दुर्दशा झाली. त्यातूनच या बाबाबुवांचे पेव फुटले व प्रभाव टाकू लागले. हे बदलायचे तर भाजपला बरेच कठोरपणे वागावे लागेल. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. मोदींचे सरकार तर अशा धर्मगुरूंपुढे काँग्रेसपेक्षा अधिक हतबल झालेले दिसत आहे. ही अधिक चिंतेची बाब आहे. 
 
- प्रशांत दीक्षित, राज्य संपादक, दैनिक दिव्य मराठी
prashant.dixit@dbcorp.in 
बातम्या आणखी आहेत...