आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण हे बालगंधर्व?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपासून  मराठी मनाला स्वप्न पडले होते ते होते बालगंधर्वांच्या लडिवाळ अभिनयाचे. त्यांच्या स्त्री भूमिकांचे. राम गणेश गडकरी, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत नाटककारांच्या लेखणीतून  साकारलेल्या नाटकांतून बालगंधर्वांनी ज्या भूमिका केल्या त्या तत्कालीन नाट्यरसिकांनी मनात कोरून ठेवल्या. बालगंधर्व यांचे पुण्यात १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या घटनेला  यंदा १५ जुलै पन्नास वर्षे पूर्ण होतील. गेल्या २६ जूनला बालगंधर्वांची जयंती होती. 
 
पुण्यामध्ये २६ जून १९६८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर उभारले गेले त्या वास्तूच्या सुवर्णमहोत्सवी वर्षास सुरुवात झाली आहे. या साऱ्या घटना एकत्रित आल्याने बालगंधर्वांची आठवण होणे साहजिकच होते. पण दुर्दैव असे आहे की, ही आठवण महाराष्ट्रातील सर्वच भागांतील रसिकांना व महाराष्ट्र सरकारलाही झाली नाही. बालगंधर्वांवरील कार्यक्रम पुणे व बाकीच्या काही ठिकाणांपर्यंतच मर्यादित राहिले. १५ जुलैला त्यांच्या निधनाला पन्नास वर्षे पूर्ण होतील. त्या वेळी आजच्या पेक्षा चित्र काही वेगळे नसेल. याचे महत्त्वाचे कारण असे की, बालगंधर्व यांच्या अभिनयावर एकेकाळी सरस्वती व लक्ष्मी प्रसन्न होती. पण बालगंधर्व यांच्यावर आता कोणताही कार्यक्रम केला तर मोठमोठ्या जाहिराती किंवा प्रायोजक मिळणे दुरापास्त असल्याने राज्यातील तमाम सांस्कृतिक चळवळ्यांना बालगंधर्वांमध्ये रस नसणे हे साहजिकच आहे. 

बालगंधर्व यांना उत्तरायुष्यात जी विपन्नावस्था आली त्याला ते स्वत: जबाबदार होते. परंतु त्यांनी एकेकाळी नाट्यरसिकांना जो अवर्णनीय आनंद दिला होता, निदान त्याकडे पाहून महाराष्ट्र सरकारने त्यांना काही पेन्शन देणे आवश्यक होते. त्यांना आयुष्याच्या अखेरीस प्रतिमहिना आठशे रुपयांचे पेन्शन सरकारकडून मिळत होते. पण ते पुरेसे नव्हते. बालगंधर्व यांची अखेर विपन्नावस्थेतच झाली. त्यांच्या निधनानंतर पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर उभे राहिले. तेवढी एक वास्तू वगळता बालगंधर्वांच्या साऱ्या अस्तित्वखुणा आता पुसल्या गेल्यातच जमा आहेत. बालगंधर्वांना  मुंबई व पुणे या दोन शहरांनी भरभरून प्रेम दिले. गंधर्व नाटक मंडळीमध्ये घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटना या दोन शहरांत घडलेल्या आहेत. बालगंधर्व अखेरीच्या काळात माहिमला ज्या घरात राहत होते, ते घरही आता काळाच्या रेट्यात अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. 

प्रत्येक महान पुरुष ज्या घरात राहतो ते ताब्यात घेऊन तिथे त्याचे राष्ट्रीय स्मारक करा, अशी आततायी मागणी कोणीच करता कामा नये. पण प्रत्येक शहराचा इतिहास पुढील पिढ्यांना कळण्यासाठी ऐतिहासिक वास्तू, ठिकाणे इथे माहितीचे नीलफलक लावता येतात. पुणे आणि मुंबईत असे काही प्रयोग झाले आहेत.  ही बुद्धी महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका  यांना ना बालगंधर्व राहत असलेल्या वास्तूबाबत सुचली ना इतर मान्यवरांच्या बाबत. याचे कारण ऐतिहासिक वारसा जपण्याबाबतची विलक्षण अनास्था.  

दादर पूर्व येथील पाम व्ह्यू या इमारतीत रुइया महाविद्यालयाचे जे पूर्वी हॉस्टेल होते तिथे तसेच अखेरीच्या काळात काही दिवस रुइयापाठी असलेल्या फडके नर्सिंग होममध्ये बालगंधर्वांना उपचारांसाठी दाखल केले होते अशा वास्तूंच्या जवळ बालगंधर्वांची स्मृति राखणारे नीलफलक अजूनही लावता येतील. दुसऱ्या बाजूला बालगंधर्वांवर पूर्वी रत्नाकर मासिक, लोकराज्य, मराठी नाट्य परिषद अशा काही संस्था, प्रकाशकांनी जे विशेषांक प्रसिद्ध केले होते, बालगंधर्वांवर जी पुस्तके प्रकाशित झाली, त्यांच्या समकालीन नटांनी जी आत्मचरित्रे लिहिली त्यात बालगंधर्वांवरही लिहिले आहे, हे सगळे साहित्य एका छत्राखाली मिळेल, अशी व्यवस्था अलम महाराष्ट्रात सध्या कुठेही नाही. 

बालगंधर्वांनी अनेकांना लिहिलेली अस्सल पत्रे, त्यांच्याविषयीची सरकारी कागदपत्रे, त्यांना इतरांनी लिहिलेली पत्रे हे सारे अस्सल संदर्भसाधने आहेत. हे सारे एकत्रित करून सुसज्ज संदर्भदालन उघडावे, असे ना महाराष्ट्र सरकारच्या मनात आले ना रसिकजनांच्या. बालगंधर्व रंगमंदिराचा कायापालट होणार ,अशा बातम्या झळकत आहेत, मात्र जो या साऱ्याचा नायक आहे त्याच्या स्मृती जपण्याचे प्रामाणिक प्रयत्न स्मृतिपटलाआड गेले आहेत. कोण हे बालगंधर्व? असा प्रश्न अजून तरी विचारला जात नाही, हे सुदैवच म्हणायला हवे.
 
- समीर परांजपे, उपवृत्तसंपादक, मुंबई
बातम्या आणखी आहेत...