आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहंगंड कमी केल्यास बॉलीवूड टिकेल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिजिटल जगातही प्रचंड प्रतिभा सामावली आहे. डोक्यावर छत्री घेऊन चालणाऱ्या तसेच नको तेथे नको तेवढा लवाजमा घेऊन वावरणाऱ्या कलाकारांशिवाय येथील काम सुरळीत चालते. अशा स्थितीशी बॉलीवूड कधी स्पर्धा करू शकेल का? 

बॉलीवूड म्हटले की ग्लॅमर, भरपूर पैसा, तारे-तारकांची प्रसिद्धी, मनोरंजन असे एकंदरीत झगमगते जग डोळ्यासमोर येते. कदाचित या चित्रपटांतून दिसणाऱ्या कल्पनाविलासाचा हा परिणाम असेल. या चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा हाच दृष्टिकोन असेल तर आपल्याला त्यावर अाेढवलेले संकटही दिसणार नाही. पण हा चष्मा थोडा बाजूला काढला तर या सृष्टीवरील संकटांचे सावट स्पष्ट दिसेल. 
या वर्षी ‘बाहुबली- २’ ने प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे मोठ्या प्रमाणावर खेचून आणले. ‘दंगल’नेही अमाप यश मिळवले. ‘हिंदी मीडियम’ आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’सारख्या कमी बजेटच्या चित्रपटांनाही प्रेक्षक मिळाले. पण या मोजक्याच चित्रपटांमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे दृश्यरूप उभे राहत नाही. अनेक बिग बजेट आणि समीक्षकांनी उचलून धरलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटलेले पाहून ट्रेड अॅनालिस्टदेखील थक्क झाले आहेत. या चित्रपटांमध्येच काही तरी कमतरता असेल. समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास अशा चित्रपटांची घसरण २०१३ पेक्षाही खाली घसरली आहे. ‘रंगून’, ‘जग्गा जासूस’ आणि ‘राब्ता’सारखे मोठे आणि एकदम नव्या कथानकावर आधारित चित्रपट अाले आहेत. पण या चित्रपटांना अपेक्षित उत्पन्नापैकी एकतृतीयांशदेखील कमावणे कठीण झाले. वितरकांसाठी ना नफा ना तोटा अशी स्थितीही नव्हती. ‘ओके जानू’, ‘मेरी प्यारी बिंदू’, आणि ‘नूर’सारख्या रोमॅन्टिक विनोदी चित्रपटांनीही तिघांमध्ये मिळून ५० कोटींचाही आकडा गाठला नाही. काही वर्षांपूर्वी कोणताही रोमँटिक विनोदी चित्रपट हा आकडा सहजतेने गाठू शकत होता. पण यावर्षी तर सलमान खानचा ‘ट्यूबलाइट’देखील मोठ्या संघर्षानंतर बॉक्स ऑफिसवर १२५ कोटी जमवताना दिसला. 

सलमानच्या मागील काही चित्रपटांनी ३०० कोटी रुपयांपर्यंतचे कलेक्शन केले होते. त्यामुळे ‘बाहुबली’ आणि ‘दंगल’ यशस्वी ठरले तरी ट्रेंड काही वेगळाच आहे. एक म्हणजे चित्रपटांमुळे मिळणारे उत्पन्न सतत घटत चालले आहे. दुसरे म्हणजे काही चित्रपट प्रेक्षकांना आवडल्यानंतर त्यांचा तोंडी प्रचार खूप वेगाने झाला. हा व्हॉट्सअॅप आणि सामाजिक माध्यमांच्या अपडेट्सचा परिणाम असावा. बाहुबली-२ ला यामुळेच मोठे यश मिळाले. तिसरे म्हणजे  एखादा चित्रपट पसंतीस उतरला नाही किंवा पसंत पडल्यावरही आवर्जून पाहण्यासारखा नाही, असा शिक्का बसल्यास प्रेक्षक तो पाहण्यास जात नाहीत. चौथा ट्रेंड म्हणजे, हल्ली दोनच प्रकारचे चित्रपट अधिक लोकप्रिय होत आहेत. एक म्हणजे अतिभव्य दृश्य असलेले किंवा उच्च वैचारिक पातळीवरील चित्रपट.  भव्यतेचा अनुभव देणारे चित्रपट केवळ मोठ्या पडद्यावरच पाहणे पसंत केले जातात. त्यामुळे डोळ्यांचे पारणे फिटतात. यात ‘अॅव्हेंजर्स’ किंवा ‘बाहुबली’चा समावेश होतो. उच्च संकल्पनेवर आधारीत चित्रपट प्रासंगिक विषयावर नवा दृष्टीकोन देतात. याचा एक खास प्रेक्षक वर्गच असतो. बाकी सर्व गोष्टींचे आकर्षण केव्हाच कमी झाले आहे. लोकांना आता चित्रपट पाहण्याची गरज वाटत नाही. निर्मात्यांना भांडवलाची चणचण हा मुद्दा तर आहेच. अखेरचे म्हणजे, सरकारनेही बौद्धिक चोरी आणि कररोपणाच्या मुद्द्यावर फार काही काम केले नाही. बॉलीवूडशी सरकारचे वैर हे यामागील मुख्य कारण आहे. कारण चित्रपट सृष्टी ही श्रीमंत आणि साधन-संपन्न लोकांची उद्योगसृष्टी आहे, असा एक गैरसमज आहे. 

बॉलीवूड चित्रपटसृष्टी तोट्यात जाण्यामागील मुख्य कारण म्हणजे वाढता मोबाइल कंटेंट. यू ट्यूबचे सध्या १५० कोटी मासिक प्रेक्षक आहेत.  प्रत्येक प्रेक्षक साइटवर दररोज सुुमारे एक तास घालवतो. २०० कोटी फेसबुक वापरकर्तेही अॅपवर दिवसातील कित्येक तास घालवतात. इतरही डिजिटल कंटेट अॅप आहेत. त्यात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार एल्ट यांचा समावेश हाेताे. भारतीय बाजारपेठेत हे वेगाने आपला जम बसवत आहेत. बहुतांश भारतीय नागरिक ‘टाइमपास’साठी चित्रपट पाहतात. हा टाइमपास तर आता मोबाइलवरही होत आहे. मोफत किंवा फार थोड्या किंमतीत. मग चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाण्याची गरजच काय? 
खुले आम चित्रपटांची चोरी आणि हे प्रकार थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांची अनिच्छा, यामुळे चित्रपटांची स्थिती आणखी गंभीर झाली आहे. इतर कंटेंटच्या तुलनेत बॉलीवूड चित्रपटांवर अधिक कर आहे. चित्रपटांसाठी जीएसटीचे दर अधिक आहेत. शहरांमध्ये दुरवस्थेत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे चित्रपटगृहांपर्यंत जाण्याचा अनुभव फार चांगला नसतो. त्याऐवजी फोन किंवा टीव्हीवर कंटेंट स्ट्रीम करणे सोपे आहे. अर्थात, यात बॉलीवूड चित्रपटसृष्टीचाही दोष आहेच. एवढे तंत्रज्ञान विकसित होऊनही भांडवलात फार फरक पडलेला नाही. भव्य कॅमेरे आणि लाइट सेट-अपअसूनही चित्रिकरणाची पद्धत आजही खूप महागडी आहे. 

प्रेक्षकांना फार न आवडणारे कलाकारही एवढे मानधन मागतात की, तेवढा गल्ला त्यांचे चित्रपटही कमावत नाहीत. अनेक तरुण कलाकार सेटवरही आपल्या मदतनीसांचा ताफा घेऊन येतात. यासाठी दररोजचा लाखो रुपयांचा खर्च होतो. परिणामी मुंबईमध्येच एका दिवसाचे चित्रीकरण २० लाख रुपयांत पडते. साधारण बजेटच्या चित्रपटांसाठी साधारणत: चित्रीकरणासाठी ८० दिवस लागतात.  त्या तुलनेत फेसबुकवर स्टँड अप कॉमिक व्हिडिओ पसंत आला तर त्यासाठी फार तर लाख रुपये खर्च झालेले असतात. हल्ली साधारण सेलफोनदेखील फोर के रिझोल्युशन रेकॉर्डिंग क्षमतेचे असतात. वृत्तवाहिन्याही मोठ्या कॅमेऱ्याचे सेटअप बाजूला सारून आता मोबाइल फोन पत्रकारितेचे स्वागत करत आहेत. तसेच डिजिटल जगातही प्रचंड प्रतिभा सामावली आहे. डोक्यावर छत्री घेऊन चालणाऱ्या तसेच नको तेथे नको तेवढा लवाजमा घेऊन वावरणाऱ्या कलाकारांशिवाय येथील काम सुरळीत चालते. अशा स्थितीशी बॉलीवूड कधी स्पर्धा करू शकेल का? बॉलीवूड चित्रपटांना सर्व स्तरांवर कमीत कमी पन्नास टक्के खर्च कमी करावा लागेल.
 
यापूर्वी केवळ चित्रपटांकडेच आपला कंटेंट दाखवण्यासाठी मार्केटिंग बजेट आणि मोठा पडदा होता. या स्पर्धेत कुठेतरी टीव्हीचा सहभाग होता. आता वितरणातील सर्वच अडथळे संपुष्टात आले आहेत. ज्याच्याकडे सेलफोन आहे, तो कंटेंट निर्माता आणि वितरकही आहे. ग्राहक तर तो स्वत:च आहे. या नव्या बदललेल्या काळात बॉलीवूडने आपलीही कात टाकली पाहिजे. नव्या रूपातील कंटेंट सादर करावे लागतील. चित्रीकरणाचा खर्च आणि अनाठायी गर्व कमी केला पाहिजे. योग्य कर आराखडा आणि बौद्धिक चौर्याविरोधात कडक कारवाई करत सरकारनेही चित्रपटसृष्टीला मदत करण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लाखो नागरिकांना रोजगार मिळतो. एकूणच बॉलीवूडदेखील काळानुरूप बदलेल. उत्कृष्ट, स्वस्त कंटेंट चित्रपटसृष्टीला पुढील अनेक पिढ्या जिवंत ठेवेल, अशी आशा आहे.  त्यामुळे सध्या तरी आशादायक वातावरणासाठी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...’ असेच म्हणू शकतो.
- चेतन भगत 
chetan.bhagat@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...