आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिबेटींच्या दमनासाठी चीनला तवांगची लालसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिबेटचे १४ वे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावरून भारत आणि चीनदरम्यान तणाव वाढला आहे. चीनने बीजिंगमधील भारतीय राजदूतांना याबाबतचा इशाराही दिला आहे. वादग्रस्त प्रदेशांत दलाई लामांचा दौरा आयोजित करून भारत द्विपक्षीय संबंधांना बाधा पोहोचवत आहे, असे चीनचे म्हणणे आहे. 

चिनी माध्यमांनी धमकी दिली आहे की, भारताने कूटनीतीसाठी दलाई लामांचा वापर केला तर आम्हीही काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करू. दुसरीकडे भारताने चीनच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तसेच दलाई लामांच्या अरुणाचल दौऱ्याला राजकीय रंग न देण्याचा सल्ला दिला आहे. भारताने म्हटले की, भारत ‘एक चीन’ धोरणाचा सन्मान करतो आणि चीनकडूनही आमची हीच अपेक्षा आहे.  

या तणावाचे मूळ कारण अरुणाचल प्रदेशातील तवांग हा प्रदेश आहे. तवांगच्या पश्चिमेला भूतान, तर पूर्वेला तिबेट आहे. १९१४ च्या सिमला करारांतर्गत मॅकमोहन रेषा ही ब्रिटिश भारत आणि तिबेट यामधील सीमा असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे तवांगसह तिबेटचा मोठा भूभाग ब्रिटिश भारतात आला. मात्र चीनने सिमला करार स्वीकारला नाही. १९५० च्या दशकात तिबेट चीनने तिबेटवर  आणि १९६२ च्या भारत-चीन युद्धात तवांगसह अनेक भागांवर ताबा मिळवला. पुढे आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनने माघार घेतली असली तरी आपण मॅकमोहन रेषा मानत नसल्याचे सांगत तवांगवर आपला दावा सांगायला सुरुवात केली.  

स्वतंत्र तिबेटची मागणी मोडून काढण्यासाठी चीनला तवांगवर नियंत्रण मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण तवांगमध्ये मोठ्या प्रमाणावर तिबेटियन जनता आहे. तवांग हे सहाव्या दलाई लामांचे जन्मस्थळ असून तेथे बौद्ध धर्माचा महत्त्वाचा मठ आहे. युद्धाच्या दृष्टीनेही तवांगचे महत्त्व आहे. तवांगवर ताबा मिळाल्यास भूतान दोन्ही बाजूंनी घेरला जाईल. तसेच सिलिगुडी कॉरिडॉरपर्यंत बीजिंग पाय पसरेल. या दोन्हीही शक्यता भारताच्या सीमा सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहेत.
- अजय धवले, २५, माजी विद्यार्थी, नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी
बातम्या आणखी आहेत...