आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांचे जातीय उदात्तीकरण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानमधील कुख्यात गंुड आनंदपाल सिंह यास राजस्थान पोलिसांनी तथाकथित बनावट चकमकीत मारले आणि आपल्या हातांनी लावलेल्या विषवृक्षाची फळे चाखण्याची वेळ मुख्यमंत्री वसुंधराराजेंवर आली. वसुंधराराजे ह्या हिंदुत्वाचे, राजपुतांचे कार्ड खेळून सत्तेत आल्या, त्यांचेच अभय आनंदपालला होते. 

राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजकीयीकरण आपल्या देशाला अलीकडे सवयीचे झाले, त्याचे फारसे वैषम्य कुणालाच वाटत नाही. हा मुद्दा आता नागरिक, प्रशासन आणि सरकार या तिन्ही प्रमुख घटकांच्या अंगवळणी पडला आहे. स्वातंत्र्याआधीही आपल्या देशात अनेक गुन्हेगार होऊन गेले. पण त्यांची कधीच व कुणीच भलावण केली नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात या दृष्टिकोनात झपाट्याने बदल घडत गेले. गुन्हेगारी जगतात शिरताना काही लोकांनी आपल्यावरील अन्यायासाठी बंदूक हाती घेतली, अपराधाचा रक्तरंजित इतिहास लिहिला. त्या व्यक्तीशी निगडित काही वर्गातील विशिष्ट लोकांनाच याबद्दल थोडीफार सहानुभूती असल्याचंही दिसून आलं. 

फुलनदेवी हे याचं सर्वात बोलकं उदाहरण ठरावं. नंतर राजाभय्या, मोहंमद शहाबुद्दीन, मुन्ना बजरंगी, सीमा परिहार, डीपी यादव, मुख्तार अन्सारी, शेखर तिवारी, अरुण शंकर शुक्ला अशी मोठी यादी तयार होते. आपल्याकडेही अरुण गवळीचे राजकीय उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला गेलाच. यंदाही अश्विन नाईक व अरुण गवळीच्या घरात निवडणुकीचे तिकीट दिले गेलेय आणि लोकांनी त्यांना निवडून दिलेय. इतकेच नव्हे तर ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ असे गुन्हेगारीचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्नही झाला. दक्षिणेकडे वीरप्पनबद्दलही सहानुभूती होती. मुंबईत वरदराजन मुदलियारबद्दल काही दाक्षिणात्यांची सहानुभूती होती. संतोकबेन जाडेजाला गुजरातेतील पोरबंदर भागात गॉडमदर म्हटलं जात होतं. इतकेच नव्हे तर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर मरण पावली तेव्हा मुंबईची क्वीन म्हणून तिची भलावण करणारा, नागपाड्याची गॉडमदर म्हणणारा वर्ग मोठ्या प्रमाणात तिच्या अंत्यसंस्कारास हजर होता. 

काही लोकांनी आत्मसंघर्षापुढे जाऊन आततायी विभाजनवादी भूमिका स्वीकारत त्याच्या आडून अनेक गंभीर गुन्हे प्रसवले. आपल्याकडचा खलिस्तानवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले आणि श्रीलंकेतील लिट्टेचा म्होरक्या व्ही. प्रभाकरन ही आपल्याला ठळक जाणवणारी नावे. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्तींना त्या-त्या समाजातून काही प्रमाणात पाठिंबा मिळाला आणि त्यांची विषवल्ली फोफावली; यांना राजकीय पाठबळ होते. ब्राझीलमध्ये २०११ ला पकडला गेलेला अँटानियो लोपेस हा रोसिना व रिओमधील अनेक लोकांना मसिहा वाटे, नुकतेच पकडले गेलेल्या लुईझ कार्लोसचीही तीच गत आहे. रॉबिनहूड या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने भुरळ पडल्यागत वागणारे गुन्हेगार जगभरातील बहुतांश देशांत आढळतात. याचे प्रतीक सिनेमा, कथा, कादंबऱ्या, डेली सोपमध्येही पडले; पण त्याचा प्रभाव हा त्या-त्या परगण्यापुरता मर्यादित राहायचा. 

या सर्व गुन्हेगारीच्या आलेखात सामान्य माणूस कुठेच व्यक्त होत नव्हता. आपले मत तो राखून ठेवत होता. “आपल्याला काय’ ही भावना त्याच्या ठायी रुजली होती. पण दुर्दैवाने हे चित्रही आता बदलत चालल्याची ग्वाही देणारी घटना आपल्या देशात घडते आहे. घटना आहे राजस्थानची. गर्दीच्या मानसिकतेच्या पुढचे रक्तरंजित पाऊल कसे असेल याची सूचक जाणीव देणारी आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील कुख्यात बदमाश आनंदपाल सिंह याला राजस्थान पोलिसांनी तथाकथित बनावट चकमकीत मारले आणि आपल्या हातांनी लावलेल्या विषवृक्षाची फळे चाखण्याची वेळ मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यावर आली. 

वसुंधराराजे ह्या हिंदुत्वाचे, राजपुतांचे कार्ड खेळून सत्तेत आल्या होत्या. त्यांचेच अभय या आनंदपाल सिंहाला होते, पण दोन पावले पुढे जाऊन आनंदपाल सिंहाने सगळ्या पातळ्या ओलांडल्या. त्याच्या फार्महाऊसमध्ये जे काही सापडले ते आजवरच्या सर्वात क्रूर आणि विकृत गुन्हेगारांजवळदेखील आढळले नव्हते. माणसाला बसता येणार नाही अन् झोपताही येणार नाही असे लोखंडी पिंजरे, बुलेटप्रूफ खिडक्यांच्या टॉर्चररूम्स, दात-हाडे विरघळवण्यासाठी अॅसिड, माणसांचा भुगा करण्यासाठी क्रशचेंबर आणि काळोख्या भूमिगत बराकी. हे सर्व एका बंकरवजा हवेलीमध्ये राजरोस सुरू होते. 

राजस्थानमध्ये संगमरवर-ग्रॅनाइटच्या खाणी आहेत, त्यांचे माफिया आहेत. त्यांचा पैसा निवडणुकीत फिरतो. हे लोक निवडणुकांत सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी होते. मात्र, मागील चार वर्षांत आनंदपालने या खाणमालकांना आणि त्यांच्या अर्थकारणाशी निगडित लोकांनाच लक्ष्य करायला सुरुवात केली. खाणलॉबीचा वसुंधराराजेंवर दबाव वाढू लागला तसा त्यांचा नाइलाज झाला आणि इतके दिवस जे पोलिस आनंदपालच्या हातात हात घालून होते त्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. इथपर्यंत काहीच अराजक नव्हते. पण लोकांच्या मनात जो जातीय अभिनिवेश राजकारण्यांनी जागृत केला होता त्याचा आता ज्वालामुखी झाला. त्याची यथासांग परिणती होऊन राजपुतांनी आनंदपालला आपला हीरो घोषित केलं. अनेक तरुणांनी आपल्या छातीवर त्याचे नाव गोंदवून घेतले. काही लोक त्याची तुलना थेट वीर राणा प्रतापशी करताहेत! त्याच्यावर वीरगीते रचली जाताहेत. तसे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झाले आहेत !! ‘अब कुछ न सहेगा गायेगा गाना, एक हुआ अब राजपुताना, जिसके सामने झुकता है जमाना’ अशी त्यांनी भावनिक साद घातली आहे. भरीस राज्याच्या पोलिस प्रशासनाने अनेक संशयी भूमिका घेतल्याने आनंदपालच्या अंत्यविधीस हत्येपासूनचा चक्क २० वा दिवस उजाडावा लागला! 

सध्या राजपूत समाजाच्या वतीने सुखदेवसिंह गोगामेडी यांनी व्यवस्था व प्रशासन यांनाच आव्हान दिले आहे. त्यांना पकडण्यासाठी सरकार जिवाचे रान करते आहे, स्थानिक लोकांनी त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले आहे. ज्या आनंदपालने अनेक गंभीर गुन्हे केले त्याची राजपूत लोकांनी केलेली भलावण डोळे पांढरी करणारी आहे. तो आपल्या जातीचा माणूस आहे, तो आपला राजा आहे, तो आपला आयडॉल आहे, हे विचार आता इतके खोलवर रुजले आहेत की त्यात मतपरिवर्तन होणे महाकठीण झाले आहे! संपूर्ण राजस्थानात अखिल राजपूत मेळाव्यासाठी सोशल मीडियावरून अत्यंत भयानक मेसेजेस शेअर केले जाताहेत. 

आता राजपुतांनी या मुद्द्याआडून आरक्षणापासून ते सत्तासंघर्षापर्यंतची भाषा सुरू केली आहे. त्यांची भाषा वसुंधरांना धडा शिकवण्याची आहे, त्यांची भाषा सरकारविरोधी आहे! आनंदपालच्या मृत्यूनंतर नागौर व नजीकच्या जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या. पण राजस्थान वगळता इतरत्र त्याची दखल शब्दमात्र घेतली गेली नाही. त्याच वेळी बंगालमधील हिंसाचारासाठी मीडियाने खर्ची घातलेला आत्यंतिक वेळ खूप काही सांगून जातो !! आजघडीला सुखदेव गोगामेडी ही वसुंधराराजे सरकारसाठी डोकेदुखी ठरली आहे. भरीस भर म्हणजे आनंदपालच्या कुटुंबीयांनी हा समग्र राजपुतांवर हल्ला असल्याचे सांगत प्रसंगी जीव देण्याची वा जीव घेण्याची तयारी ठेवण्याची भाषा केली आहे. या सर्व प्रकरणात जोधपूर, उदयपूर, जयपूर आणि मध्य राजस्थानमधील सर्व जिल्हे ढवळून निघाले आहेत. तिथे जातीय ध्रुवीकरण अत्यंत वेगाने होते आहे. तथाकथित गोरक्षकांनी याप्रकरणी आनंदपालला शहीद ठरवून सरकारची कोंडी केली. 

उल्लेखनीय बाब म्हणजे वसुंधरा सरकारमधील अनेक मंत्री आनंदपालला भेटत होते, असे तथ्य आता समोर येत आहे आणि त्याच वेळेस राजस्थान पोलिसांना पत्रकार परिषद घेऊन सांगावे लागतेय की हा काही रॉबिनहूड नव्हता! पोलिसांना हे ठाऊक होते तर इतके दिवस ते कशाची वाट पाहत होते? एकेकाळी सामान्य दूधवाला असणाऱ्या निर्व्यसनी आनंदपालला त्याच्या लग्नाच्या वरातीत तो खालच्या उपजातीतला आहे म्हणून उच्चकुलीन राजपुतांनीच घोड्यावर बसू दिले नव्हते. तेच राजपूत आता त्याच्या उदात्तीकरणासाठी कसे झटताहेत हे सर्व पाहता लोकमानस किती जातीसापेक्ष होत चालले आहे हे लक्षात येते. वीरप्पन आजच्या काळात जन्माला येऊन भविष्यात मृत्युमुखी पडला असता तर त्याच्या उदात्तीकरणासाठी त्याच्या वन्नियार जातीच्या लोकांनीही आंदोलन केले असते का? लोक इतके दिवस राजकारणी, कलाकार, लेखक, खेळाडू अशांचेच जातधर्म पाहायचे; आता या यादीत गुन्हेगारांचीही भर पडतेय. हे लोकशाहीला नक्कीच पोषक नाही. 
- sameerbapu@gmail.com
बातम्या आणखी आहेत...