आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभंग भारत आणि डॉ. बाबासाहेब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूज्य डॉ. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीचे हे समाप्ती वर्ष आहे. बाबासाहेबांच्या समकालीन नेत्यांपेक्षा बाबासाहेबांचे अनेक बाबतीत वेगळेपण आहे. १९४७पूर्वी देशात स्वातंत्र्याचे आंदोलन चालू होते. काँग्रेस तेव्हा राष्ट्रीय संस्था होती. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशात स्वातंत्र्याची मांडणी केली जात होती. इंग्रजांचा त्याला विरोध होता. सत्याग्रह, असहकार अशा मार्गाने चालणारे हे आंदोलन इंग्रजांनी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. हजारो आंदोलनकर्त्यांना तुरुंगात जावे लागले. स्वातंत्र्याचे आंदोलन मुख्यतः राजकीय आंदोलन होते. डॉ. बाबासाहेबांनी या आंदोलनात भाग घेतला नाही. 

याचा अर्थ त्यांना राजकीय स्वातंत्र्य नको होते, असा नाही. उलट त्यांचे म्हणणे असे होते की, स्वातंत्र्याची सर्वाधिक गरज अस्पृश्य बांधवांनाच आहे. परंतु राजकीय स्वातंत्र्य अगोदर की सामाजिक स्वातंत्र्य अगोदर, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि काही प्रश्न उपस्थित केले. तुम्ही राजकीय स्वातंत्र्य मागता; आमच्या सामाजिक स्वातंत्र्याचे काय? कोट्यवधी अस्पृश्य बांधवांना सामाजिक स्वातंत्र्य मिळणार आहे की नाही? ते कसे मिळणार आहे? बाबासाहेबांचा आग्रह होता की, राजकीय सत्तेत अस्पृश्यांना वाटा मिळाला पाहिजे. केवळ अस्पृश्यताविरोधी ठराव करून अस्पृश्यांचे प्रश्न संपत नाहीत. अस्पृश्यता संपवायची असेल तर अस्पृश्यांना राजकीय सत्तेत वाटा पाहिजे. या मागणीवर ते कायम ठाम राहिले. 

राजकीय परिभाषेत त्यांनी ही मागणी काही सिद्धांतांच्या आधारे केली. अस्पृश्य हे अल्पसंख्य आहेत, ते हिंदू समाजाच्या चार्तुवर्ण्य व्यवस्थेत बसत नाहीत, हिंदूंनीच त्यांना बाहेर ढकलले आहे, त्यामुळे त्यांना अल्पसंख्य असा दर्जा देण्यात आला पाहिजे. अल्पसंख्य म्हणून त्यांच्या अधिकारांचे रक्षण केले पाहिजे. त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ हवेत, ही भूमिका घेऊन त्यांनी गोलमेज परिषदेत भाग घेतला आणि १९३२मध्ये जातीय निवाड्याच्या अंतर्गत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवला. महात्मा गांधींच्या उपोषणामुळे हे मतदारसंघ त्यांना सोडावे लागले. परंतु त्यामुळे हिंदू समाजाच्या अस्पृश्यांचा प्रश्न केवळ सामाजिक नाही, केवळ धार्मिक नाही, तर त्याचे राजकीय आयामही तेवढेच मोठे आहेत, ही गोष्ट काँग्रेसच्याही लक्षात आली आणि त्यामुळे राखीव मतदारसंघ बाबासाहेबांना मिळाले. 

बाबासाहेबांचे वेगळेपण आणखी एका विषयात आहे, प्रामुख्याने ते जरी अस्पृश्यतेविरुद्ध लढा देत असले तरी या लढ्याची एक व्यापक राष्ट्रीय भूमिका होती. अस्पृश्यतेमुळे केवळ अस्पृश्यांचेच नुकसान झाले असे नसून  समग्र हिंदू समाजाचे नुकसान झाले आहे. हिंदू समाज विघटित झाला आहे आणि अनीतिमान झाला आहे. धर्माला विकृत स्वरूप आले आहे. अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजेच हिंदू समाजाला जडलेले रोग दूर करणे होय, अशी एक व्यापक भूमिका त्यांनी घेतली होती. समकालीनांनी ती तशी लक्षात घेतली नाही. यामुळे बाबासाहेब एकदा म्हणाले की, इतके दिवस आम्ही अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक आहे, असे समजत होतो; परंतु आता आमची दृष्टी बदलली आहे की, हा आमच्या नरदेहावरील कलंक आहे आणि तो आमचा आम्हालाच धुऊन काढला पाहिजे. हा कलंक धुऊन काढण्यासाठी त्यांनी आपल्या बांधवांना आवाहन केले की, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि सत्तेतील महत्त्वाच्या जागा आपल्या कर्तृत्वाने मिळवा. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी आपले सर्व जीवन अस्पृश्य बांधवांत स्वाभिमान जागवण्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी लढण्यास सिद्ध करण्यासाठी खर्च केले. 

‘ज्या घरात फूट आहे ते घर टिकत नाही.’ हे वाक्य डॉ. बाबासाहेबांच्या काही भाषणांत आणि लेखनात अनेक वेळा आलेले आहे. १८५८मध्ये अब्राहम लिंकन यांच्या स्प्रिंगफिल्ड येथील भाषणात हे वाक्य आलेले आहे. लिंकन यांना असे म्हणायचे होते की, अर्धे गुलाम आणि अर्धे मुक्त अशी अवस्था कोणतेही शासन फार काळ सहन करू शकणार नाही. घर एक ठेवण्यासाठी गुलामी गेली पाहिजे. बाबासाहेबांनादेखील हेच सांगायचे आहे की, आपले घर म्हणजे आपला देश अभंग ठेवायचा असेल तर ही सामाजिक दरी आपण घालवली पाहिजे. बाबासाहेबांचे वेगळेपण याच्यात आहे की, त्यांना आपल्या शक्तीची पूर्ण जाणीव होती. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची मीमांसा करताना ते एकदा म्हणाले की, स्वातंत्र्याचा लढा इंग्रज गेल्यानंतर या देशावर हिंदूंनी राज्य करायचे की मुसलमानांनी राज्य करायचे, याचा निर्णय करणारा लढा आहे, आपली शक्ती मुसलमानांच्या पारड्यात टाकली तर पारडे जड होईल आणि हिंदूंच्या पारड्यात टाकले तर हिंदूंचे पारडे जड होईल. शक्तीची अशी जाणीव बाबासाहेबांना होती. 

अल्पसंख्य म्हणून मुसलमानांप्रमाणे त्यांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी केली नाही. ते म्हणू शकत होते की, मुसलमानांना जर वेगळी भूमी देणार असाल तर अस्पृश्यांनाही वेगळी भूमी द्या आणि या मुद्द्यावर ते जिनांशी हातमिळवणीही करू शकत होते. परंतु ते जिनांना कधीही भेटले नाहीत. जिनांचे समर्थन त्यांनी कधी केले नाही. रानडे, गांधी, जिना या भाषणात त्यांनी जिनांच्या राजकारणाचे वाभाडे काढले आहेत. भारत अभंग कसा राहील, तो एकात्म कसा राहील आणि तो समर्थ कसा होईल याची पराकोटीची चिंता त्यांच्यामध्ये असे. 

आपल्या घरातील फूट सांधण्यासाठी त्यांनी सर्वांसाठी स्वातंत्र्य, सर्वांसाठी समता आणि सार्वत्रिक भ्रातृभावाचा आग्रह धरला. आपण प्रथम भारतीय आहोत आणि दुसऱ्यांदाही भारतीयच आहोत, याचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे. आपल्या विचारधारेपेक्षा किंवा आपल्या पक्षांपेक्षा आपला देश मोठा आहे याचीही सतत जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या देशावर परकीय आक्रमणे झाली आणि त्यांची सत्ता आली याला कारण आपणच आहोत. आपले लोक शत्रूला फितूर झाले, त्यांनी देशाशी गद्दारी केली आणि इथल्या समाजव्यवस्थेने, धर्मव्यवस्थेने अस्पृश्यांच्या हातातील शस्त्रे काढून घेतली. त्यामुळे देश परतंत्र झाला, असेच जर आपण वागत राहिलो तर मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य आपण पुन्हा गमावून बसू आणि एकदा गमावलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळवता येणार नाही, असे परखड इशारे त्यांनी दिले आहेत. अस्पृश्यांचे हित देशाच्या हिताशी जोडून जे सत्य आहे ते स्पष्ट शब्दांत, कोणाच्याही रागालोभाची पर्वा न करता आणि प्रसंगी अतिशय कठोर शब्दांत बाबासाहेब बोलत आणि लिहीत राहिले. हे त्यांचे वेगळेपण लक्षात घेऊन या महापुरुषाच्या महान मनोभावाची आपण मनोमन पूजा केली पाहिजे.
- रमेश पतंगे, ज्येेष्ठ पत्रकार
बातम्या आणखी आहेत...