आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकीतले गुरू बळीचे बकरे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-पाकमध्ये दीडशे कोटी लोकांसाठी शंभर सिंथेटिक क्रीडांगणे असतील-नसतील. पण ऑस्ट्रेलिया, जर्मनी, हॉलंड, स्पेन, बेल्जियम, फ्रान्स, पोलंड, कॅनडा, अर्जेंटिना, न्यूझीलंड आदी डझनभर देशांची एकत्रित लोकसंख्या ३५ कोटीही नसेल, पण त्यांच्याकडे उपलब्ध असावीत दीड हजारावर सिंथेटिक क्रीडांगणं. म्हणजे नस्ती भारत-पाकच्या पावपटही नाही, पण सिंथेटिक क्रीडांगणं पंधरापट! भारत व पाश्चात्त्य देश यातील या वाढत्या दरीची किंमत भारत कायम मोजतोय.

‘देहान्त प्रायश्चित्त!’ – ‘काय, देहान्त प्रायश्चित्त!’ – ‘ नक्की, देहान्त प्रायश्चित्त?’– ‘होय, होय, होय, देहान्त प्रायश्चित्त!’  
‘हॉकी इंडिया’ या राष्ट्रीय हॉकी संघटनेच्या ‘उत्तम कामगिरी (हाय परफॉर्मन्स) समिती’च्या २४ वजनदार सदस्यांनी रामशास्त्री प्रभुणे यांच्या थाटात ही शिक्षा ठोठावली आणि टोकियो ऑलिम्पिक दोन वर्षांनंतर आलेलं असताना, त्यांच्या हाती ठेवलं, त्यांच्याच मायदेशीचं तिकीट. त्यांच्याच कारकीर्दीत भारताने चॅम्पियन्स व जागतिक संघटना स्पर्धेत ३४ वर्षांनंतर पदकं पटकावली ती जणू कवडीमोलाचीच. 

रोलँट ऑल्टमन्स यांचा गुन्हा काय? गेल्या चार वर्षांतील त्यांच्या कारकीर्दीत भारताला कमावता आलं ना ऑलिम्पिक पदक, ना निदान विश्वचषक पदक. हा गुन्हा कुणाचा वा कुणाकुणाचा. अर्थात एकट्या प्रशिक्षकांचा, ऑल्टमन्सचा. मग निर्दोष व निष्पाप कोण, अथवा कोण-कोण? अर्थातच तमाम सारे खेळाडू, सर्वोच्च संचालक डेव्हिड जॉन, हॉकी इंडियाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य हे सारे सारे निष्पाप व निर्दोष! 

ही सजा देणाऱ्या समितीत कोण-कोण होते? स्वत: ऑल्टमन्सचा करार अकाली, अवेळी व बहुतांशी अकारण संपवण्यात आला. मलेशिया व कॅनडा या सुमार दर्जाच्या संघाशी भारत हरल्याचे खापर त्यांच्यावर फोडण्यात आलं आणि त्यांच्या जागी हंगामी प्रशिक्षकपदी डेव्हिड जॉन यांना बसवण्यात आलं. हे डेव्हिड जॉन कोण? त्यांची मूळ नेमणूक झाली होती व्यायाम शिक्षक या नात्याने. एक्सरसाइझ फिजिओलॉजिस्ट या नात्यानं. मग त्यांना बढती दिली गेली, तेव्हाचे परदेशी प्रशिक्षक मायकल नॉब्स यांचे शास्त्रीय (सायंटिफिक) सल्लागार म्हणून. आता ऑल्टमन्स यांचा वारसदार नेमला जाईपर्यंत, मार्गदर्शनाची सूत्र असतील व्यायाम शिक्षकांच्या हाती! हॉलंडच्या पुरुष व महिला संघांना ऑलिम्पिक यश मिळवून देणाऱ्या ऑल्टमन्सची जागा घेणारं, निदान येत्या तीन महिन्यांसाठी एक व्यायाम शिक्षक : तरीही भारतीय हॉकीला अच्छे दिन येणारच येणार! 

पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल : हॉकी इंडियाच्या न्यायदानात आहे कमालीचं सातत्य. त्यांनी फासावर लटकवलेले ऑल्टमन्स हे कोणी पहिले वा अपवादात्मक गुरुजी नाहीत. गेल्या २३ वर्षांत ते आहेत २३ वे बळीचे बकरे! १९९४ ते २०१७ या २३ वर्षांत सात परदेशी प्रशिक्षकांसह १० भारतीय गुरूंचा बळी घेण्यात आलाय. त्यापैकी गोलरक्षक सेंड्रिक परेरांचा दोनदा, तर वासुदेव बास्करन यांचा पाचदा. 

आघाडीच्या फळीच बगलेवर खेळणारे ऑलिम्पियन झफर इक्बाल व हरचरण सिंग या गुरूंची नावे अनेकांच्या स्मरणात असतील. पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ व त्यांच्याच जमान्यात आक्रमक धनराज पिल्लेसह जागतिक दर्जाचे परगत सिंग, मुंबईचे जोकीम कारव्हालो व जगबीर सिंग कौशिक व राजिंदर सिंग हेही उत्तम खेळाडू. त्यांसह तज्ज्ञ प्रशिक्षक सी. आर. कुमार अन् हरेंद्र सिंग यांनाही असेच फासावर लटकवलं गेलंय आणि अर्थातच सेड्रिक परेरा व बास्करन या जोडीला. 

परदेशी प्रशिक्षकांपैकी गेरार्ड रॅच यांनी नियुक्ती सर्वांना अचंबित करणारी. २००४ चे अथेन्स ऑलिम्पिक केवळ दोन-तीन महिन्यांवर आलेले असताना, त्यांना नेमलं जावं अन् त्यांनी नेमणूक स्वीकारावी, या दोन्हीही गोष्टी शौकिनांना चक्रावून सोडणाऱ्या. त्यांना काढलं, यापेक्षाही त्यांना कसं नेमलं गेलं याचीच चौकशी व्हायला हवी… 

पण बळीचे बकरे बनवलेले इतर सारे मार्गदर्शक ख्यातनाम. भारतात येण्याआधी छान कामगिरी करून दाखवणारे. ऑस्ट्रेलियातील उत्तम क्रिकेटपटू व हॉकी ऑलिम्पियन रिक चार्ल्सवर्थ यांना हॉकी व क्रीडा खाते यातील नोकरशहांनी कुत्सितपणे कुजवले, खुर्चीत डांबून ठेवले. हुद्दा दिला होता तांत्रिक संचालकपदाचा! तो निव्वळ देखावा! ऑस्ट्रेलियन पुरुष व महिला हॉकी संघांना शिखरावर नेऊन ठेवणारे रिक चार्ल्सवर्थ हे कोणतीही जबाबदारी उचलण्याच्या लायकीचे आहेत, अशीच ना भारतीय हॉकी संघटकांची मानसिकता, ना भारतीय क्रीडा खात्याची किंवा भारतीय प्राधिकरणाची, साईची वृत्ती! 

मायकल नॉब्स व टेरी वॉल्श हे गुरू ऑस्ट्रेलियाचे ऑलिम्पिकपटू. वॉल्शच्या विद्युतगती चढाया हे हॉकीचे वैभव. ऑस्ट्रेलिया व नेदरलँड्स यांच्या राष्ट्रीय संघांसाठी खास आमंत्रित मार्गदर्शक. आधीपासून कल्पना असलेले त्यांचे काही वादग्रस्त आर्थिक व्यवहार, हॉकी इंडियाचे सर्वेसर्वा नरिंदर बात्रा यांनी अचानक उकरून काढले व वॉल्श यांच्या हाती नारळ ठेवला. रिक चार्ल्सवर्थ यांचे वारसदार जोस ब्रासा हे आंतरराष्ट्रीय संघटनेचे मान्यताप्राप्त मास्टर दर्जाचे सीनियर शिक्षक. हॉलंडचे पॉल व्हॅनअॅस यांनी त्यांच्या डच (हॉलंडच्या) संघास, ऑलिम्पिक रौप्य पदकापर्यंत झेपावलेले अन् अॅस यांचे हॉलंडमधील वारसदार रोलँड ओल्टमन्स यांनी डच पुरुष-स्त्री संघांना, ऑलिम्पिकमधील त्यापुढील पायरीवर शिखरावर भरारीत नेलेलं. 

ऑस्ट्रेलिया, हॉलंड, स्पेन आदी देशांत झकास कामगिरी करून दाखवणाऱ्या या साऱ्या मार्गदर्शकांना नेमण्यात, नेमताना तारीफ व गाजावाजा करण्यात अन् अकाली उचलबांगडी करण्यात धन्यता मानली हॉकी इंडियानं अन् भारतीय क्रीडा खात्यानं व साईने. हा काय मामला आहे? 
या साऱ्याचं मूळ आहे भारतीय हॉकीच्या गौरवशाली इतिहासात. त्याचबरोबर हॉकी खेळातील आमूलाग्र बदलांना मूक संमती देण्याच्या आत्मघातकी दिशाहीनतेत आणि हॉकीच्या बदलत्या रूपाची जाण न ठेवणाऱ्या अडाणीपणात. तसेच संघटकांच्या घोडचुकांचा बोजा ऑलिम्पियन हॉकी संघाच्या डोईवर ठेवण्याच्या अपप्रवृत्तीत. 

भारताचा गौरवशाली इतिहास म्हणजे ध्यानचंद व रूपसिंग ते बलबीर व उधम ते प्रिथपाल, चरणजीत व अजितपाल प्रभृतींची कर्तबगारी. १९२८ ते १९८४ या ५२ वर्षांतील सलग १२ ऑलिम्पिकमध्ये, भारताच्या खात्यात ८ सुवर्ण, एक रौप्य व दोन ब्राँझ अशी ११ पदकं. सांघिक खेळातील ही दादागिरी ऑलिम्पिकमध्ये अतुलनीय. त्यासोबत विश्वचषकात पहिल्या तीन स्पर्धांत चढता आलेख : १९७१ स्पेनमध्ये ब्राँझ, ७३ हॉलंडमध्ये रौप्य अन्् ७५ मलेशियात सुवर्ण.  

त्या दिमाखदार यशातील वस्तुस्थिती, गुरूंना बळीचे बकरे बनवणारे संघटक सोयीस्करपणे विसरू पाहतात. ते सारं यश एक अपवाद वगळता होतं नैसर्गिक हिरवळीवरचं. पण ज्या क्षणी महागड्या सिंथेटिक गालिचाच्या टर्फवरचं मग ते अॅस्ट्रोटर्फ असो वा पॉलिग्राफ, सारी आंतरराष्ट्रीय हॉकी खेळवण्यात भारत व पाकिस्तान यांनी मंजुरी दिली त्याक्षणी त्यांनी आपलं थडगं खोदलं. भारत-पाकमध्ये दीडशे कोटी लोकांसाठी शंभर सिंथेटिक क्रीडांगणे असतील-नसतील. पण ऑस्ट्रेलिया, जर्मनी, हॉलंड, स्पेन, बेल्जियम, फ्रान्स, पोलंड, कॅनडा, अर्जेंटिना, न्यूझीलंड आदी डझनभर देशांची एकत्रित लोकसंख्या ३५ कोटीही नसेल, पण त्यांच्याकडे उपलब्ध असावीत दीड हजारावर सिंथेटिक क्रीडांगणं. म्हणजे नस्ती भारत-पाकच्या पावपटही नाही, पण सिंथेटिक क्रीडांगणं पंधरापट! भारत व पाश्चात्त्य देश यातील या वाढत्या दरीची किंमत भारत कायम मोजतोय. 

पण संघटकांना, संघटनांना कोण हात लावणार? त्या उद्दाम पुढाऱ्यांना भाषा कळते फक्त न्यायालयाची. त्यासाठी हवेत न्या. मुदगल, लोढा… 
एरवीही खेळाडू वा संघ बदलण्यापेक्षा गुरूला काढणं कित्ती कित्ती सोयीचं! बाजारातून एक नारळ आणायचा. निमंत्रित अतिथीच्या हाती ठेवायचा! अतिथी देवो भव असं म्हणत वाहायचं!

- वि. वि. करमरकर, (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व समीक्षक)
बातम्या आणखी आहेत...