आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंतोत्सव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होळी जवळ आली की आम्हा पोरांच्या अंगात उत्साह संचारत असे. आदल्या दिवसापासूनच लाकडे गोळा करायला सुरुवात होई. पळवलेली लाकडे लपवून ठेवावी लागत. संध्याकाळी होळी रचून झाली की पळवलेली लाकडे बेमालूमपणे इतर लाकडे आणि गवत यांच्या साहाय्याने झाकून टाकली जात. एका वर्षी तर आमच्या घराच्या गच्चीवर शेजाऱ्यांचे जुने फर्निचर ठेवलेले होते ते पळवण्याच्या उद्योगात असताना त्यांना सुगावा लागला आणि ते ओरडत वर यायला निघाले तेव्हा धावत जाऊन गच्चीवरून खाली उडी मारावी लागली. अंधारात पायाखाली दगड आल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पाय टम्म सुजला. होळीच्या दिवशी नव्हे तर चांगले तीन-चार दिवस अंथरुणातच पडून राहावे लागले. धुळवडीच्या दिवशी रंग खेळायलाही जाता आले नाही. नंतर मालिश करून घ्यायला व्यायामशाळेत गेलो तर माझ्या एका टारगट मित्राने खूप दुखावणाऱ्या व्यायाम शिक्षकांकडे मला नेऊन माझ्या विव्हळण्याची गंमत बघितली. त्याच उन्हाळ्यात तो झाडावरून पडून हात गळ्यात बांधून आला तेव्हा मी पकडून त्याच व्यायाम शिक्षकांकडे त्याला घेऊन गेलो. पण त्याने सहनशक्तीची कमाल मर्यादा दाखवून आम्हाला सर्वांनाच चकित केले. हुं का चू न करता त्याने हात चोळून घेतला. बाहेर आल्यावर मी त्याला म्हणालो, ‘खरेच मानले तुला. कसे सहन करू शकलास?’ त्यावर तो हसत सुटला आणि म्हणाला, ‘लागले आहे डाव्या हाताला आणि उजवा हात चोळून घेतला. मग सहन करायला काय जाते?” 

पोलिस खात्यात नोकरी करायला लागल्यावर अनेकदा जातीय तणाव असलेल्या ठिकाणी नेमणूक असल्याने ड्रेस घालून रंग खेळत हुंदडणाऱ्यांना आवरायचे काम करावे लागे. एका वर्षी मला नागपूरला अग्निशमन दलाच्या प्रशिक्षणासाठी महिनाभर पाठवले  असताना होळीचा सण आला. आमच्या शिबिरात एक वरिष्ठ अधिकारी होते. ते फारच अहंमन्य होते आणि त्यांच्या वागणुकीने त्यांनी सर्वांना दुखावून ठेवले होते. एका अधिकाऱ्याला ते फारच वाईट वागवत असत. अशा प्रशिक्षणासाठी निरनिराळ्या राज्यांतून आलेल्या अधिकाऱ्यांशी असे वागून चालत नाही. होळीच्या आदल्या दिवशी वर्गात त्यांनी त्यांच्याकडे होळीचा रंग खेळताना हौदात रंग तयार करून त्यात सर्वाना बुचकळून काढले जात असल्याची माहिती दिली. धुळवडीच्या दिवशी आम्ही सगळे एकत्र जमलो आणि माफक प्रमाणात रंग उडवला. परत हॉस्टेलकडे जात असताना दोन मोठे पाण्याने भरलेले हौद होते. त्यांच्या जवळून जात असताना मी इतरांना इशारा केला आणि त्या गर्विष्ठ अधिकाऱ्यांना उचलून पाण्यात टाकून दिले. ते नाराज होऊन वर आले आणि आपला चष्मा पाण्यात पडला असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या पैकी पोहणारे आम्ही एक-दोघेजण पाण्यात उतरलो आणि बुड्या मारून त्यांचा चष्मा काढून दिला. शिबिराच्या उरलेल्या काळात मात्र त्यांची वागणूक बऱ्यापैकी चांगली राहिली. 

माझ्याबरोबर शाळेत असलेल्या एका मित्राला अंगावर रंग टाकून कपडे खराब करून घ्यायला मुळीच आवडत नसे. होळीच्या दुसऱ्या दिवशी तो जो गायब होई तो एकदम रात्रीच उगवे. पुष्कळ वर्षांनंतर तो होळीच्या वेळी माझ्याकडे आलेला होता. सकाळी उठून गुपचूप मागून जाऊन त्याच्या डोक्यावर मी रंगाची बादली रिकामी केली. तेव्हा तो मुळीच चिडला नाही. मला नवल वाटले. तेव्हा त्याने खुलासा केला की तुझेच कपडे मी घातलेले आहेत तेव्हा हवा तितका रंग उडव. माझी हरकत नाही. 

एका होळीच्या वेळी मी मध्य प्रदेशात होतो. तेव्हा एका मित्राबरोबर आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत होळी खेळायला गेलो. पळसाच्या आणि इतर रंगीबेरंगी फुलांपासून रंग तयार केलेला होता. त्या वर्षी सगळ्या छोट्या मुलामुलींबरोबर रंग खेळताना बालपण परत जागे झाले. खरे तर होळी म्हणजे वसंतोत्सव हा आपला राष्ट्रीय सण आहे. पण त्याला फार बीभत्स स्वरूप आले आहे. होळीच्या निमित्ताने शिवीगाळ करण्याची हौस अनेकजण पुरवून घेतात. आणि वाॅर्निश किंवा रासायनिक रंग जे कातडीला हानिकारक ठरू शकतात ते वापरून उत्सवाच्या रंगाचा भंग करतात. जे रंग खेळायला नाखुश असतील किंवा आपल्या मित्रपरिवारातले नसतील त्यांच्या अंगावर रंग टाकणे म्हणजे शिक्षा होण्यालायक खोडी आहे. आमच्या नात्यातल्या एका मुलीला होळीच्या दिवशीच बाळ झाले. त्या नवजात शिशूला घेऊन दुसऱ्या दिवशी दवाखान्यातून आम्ही घरी निघालो. तेव्हा टॅक्सीत बसत असताना कोणीतरी वरच्या मजल्यावरून रंगाने भरलेला फुगा टाकला. तो नेमका त्या बाळाच्या आईच्या अंगावर पडला. तो रंग विषारी होता आणि त्याने तिचा हात आणि चेहरा दुसऱ्या दिवशी सुजला. तो फुगा त्या बाळाच्या अंगावर पडला असता तर काय झाले असते त्याची कल्पनासुद्धा करवत नाही. 

वसंत ऋतूच्या आगमनासाठी सारी सृष्टी रंगोत्सव साजरा करीत असते. त्यात आपण सहभागी होऊन आनंद लुटायचा असतो. रंग महोत्सवासाठी निसर्गातल्या साऱ्या शक्ती आपली संहारकता आवरून घेऊन नाजूक फुले जन्माला घालत असतात. सौंदर्यनिर्मितीसाठी हा संयम अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला साजऱ्या करायच्या आनंदाची परिणती इतरांच्या त्रासात किंवा दुःखात होऊ नये याची काळजी आपण घ्यायलाच हवी. आपले सण जर माणसामाणसांत असलेला स्नेहाचा संबंध बिघडवायला कारणीभूत होणार असले तर ते कशाला साजरे करायचे?
 
- भीष्मराज बाम, ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्र तज्ञ.
बातम्या आणखी आहेत...