आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय नौदलाची नवी व्यूहरचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होर्मुझची सामुद्रधुनी, बाब-एल-मांदेब आणि मलाक्काची सामुद्रधुनी यांच्याबरोबरच हिंदी महासागराच्या अन्य प्रवेशद्वारांवर सतत टेहळणी करणे आणि आणीबाणीच्या काळात नाकेबंदी करणे भारतीय नौदलाला ‘मोहीम-आधारित तैनाती’द्वारे शक्य होणार आहे.


हिंदी महासागरातून भारताच्या सुरक्षेसमोर वाढत असलेले धोके विचारात घेऊन भारतीय नौदलाने नुकत्याच युद्धनौकांच्या ‘मोहीम-आधारित तैनाती’च्या नव्या धोरणाला मंजुरी दिली आहे. त्या धोरणानुसार हिंदी महासागराची प्रवेशद्वारे असलेल्या ठिकाणी भारतीय युद्धनौकांचा सतत पहारा असणार आहे. भारताच्या ‘सागर’ या धोरणाला पूरक अशी ही व्यवस्था असणार आहे. 


एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेच्या नौदलातील अधिकारी आणि प्रसिद्ध इतिहासकार आल्फ्रेड मॅहन यांनी असे म्हटले होते की, ‘हिंदी महासागरावर जो नियंत्रण मिळवेल, तो आशियावर प्रभुत्व गाजवेल. एकविसाव्या शतकात जगाचे भाग्य या महासागराद्वारे निश्चित होईल.’ 


आल्फ्रेड मॅहन यांचे ते प्रतिपादन तंतोतंत खरे ठरल्याचे अलीकडील काळात हिंदी महासागरात घडणाऱ्या घडामोडींवरून सिद्ध झाले आहे. या क्षेत्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील असले तरी त्यात भारत आणि चीन यांच्यातील प्रामुख्याने स्पर्धा होत आहे. हिंदी महासागरातील सर्वात मोठी नाविक शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय नौदलाकडे या महासागराची प्रवेशद्वारे असलेल्या मलाक्का, होर्मुझ आणि बाब-एल-मांदेब या सामुद्रधुन्यांवर नियंत्रण मिळवत युद्धजन्य परिस्थितीत त्यांची नाकेबंदी करण्याची क्षमता आहे. या सर्व सामुद्रधुन्या भारतासाठी सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश भारतीय नौदलाने आपल्या प्राथमिक सागरी हितांच्या क्षेत्रात केलेला आहे. त्या सामुद्रधुन्यांमधून चालणारी भारताची व्यापारी वाहतूक कशी सुरक्षित राहील यासाठी भारतीय नौदल सतत जागरूक असते. 


हिंदी महासागरीय परिसरात शांतता आणि स्थैर्य टिकून राहावे यासाठी भारताचा कायम प्रयत्न राहिला आहे. मात्र ‘सागरी रेशीम मार्ग’ योजनेमुळे भारताच्या हिंदी महासागरातील प्रभावाला आव्हान मिळू लागले आहे. या योजनेच्या माध्यमातून चीनने या क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून चीनने एडनचे आखात आणि तांबड्या समुद्राच्या संगमावर वसलेल्या आफ्रिकेतील दिग्बोतीमध्ये आपला पहिलावहिला परदेशी भूमीवरचा नाविक तळ सुरू केला आहे. हा नाविक तळ सुरू झाल्यावर तर आता चिनी नौदलाचा वावर या क्षेत्रात आणखी वाढणार आहे. ही बदलती परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय नौदलाने युद्धनौकांच्या तैनातीविषयी ‘मोहीम-आधारित तैनाती’ या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

 
या धोरणानुसार भारतीय नौदलाच्या १५ युद्धनौका, पाणबुड्या आणि विमाने आपल्या भूमीपासून दूरवर वसलेल्या हिंदी महासागराच्या प्रवेशद्वारांवर बारीक नजर ठेवण्यासाठी सतत तैनात असतील. त्याच वेळी त्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असतील. नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा याबाबत सांगतात, ‘धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. तिचा आढावा घेऊन हे धोरण पूर्ण स्वरूपात लागू करण्यात आले आहे. तसेच या धोरणाद्वारे होणारी तैनाती चक्राकार पद्धतीने असेल.’  
नव्या धोरणाच्या आधीपासूनच भारतीय नौदलाने अशा प्रकारची तैनाती काही प्रमाणात सुरू केली होती. एडनच्या आखातात वाढलेल्या सोमाली चाच्यांच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाची युद्धनौका २००८ पासून तेथे कायमस्वरूपी तैनात करण्यात आली आहे. अलीकडेच भारतीय नौदलाने मलाक्काच्या सामुद्रधुनीची आणखी प्रभावीपणे टेहळणी करता यावी यासाठी तेथे आपली युद्धनौका कायमस्वरूपी तैनात केली आहे. तिच्या मदतीने या सामुद्रधुनीतून येणाऱ्या-जाणाऱ्या जहाजांवर अहोरात्र लक्ष ठेवले जात आहे. त्याचबरोबर ओमानच्या दुकम येथील तळावर अलीकडेच भारतीय नौदलाची युद्धनौका, पाणबुडी आणि विमाने पाठवण्यात आली होती. सेशल्समध्ये भारतीय नौदलाचे पाणबुडीविरोधी ‘पी-८आय’ हे विमान आणि युद्धनौका तर नियमितपणे जात आहेतच. 


नव्या धोरणानुसार भारताच्या सीमांपासून दूरवर होणारी भारतीय नौदलाची कायमस्वरूपी तैनाती ही आपत्कालीन परिस्थितीत आसपासच्या देशांना सुरक्षा पुरवण्याची, समुद्रमार्गे येणाऱ्या दहशतवादाला रोखण्याची आणि नैसर्गिक संकटाच्या वेळी संबंधित प्रदेशात तातडीने मानवी मदत पोहोचवण्याचीही जबाबदारी पार पाडणार आहे. त्यातून हिंदी महासागरातील एक प्रभावी नौदल अशी ओळख अधिक ठळक करणे भारतीय नौदलाला शक्य होणार असून त्या माध्यमातून भारताच्या संबंधित देशांबरोबरच्या संबंधांनाही बळकटी मिळू शकणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, बाब-एल-मांदेब आणि मलाक्काची सामुद्रधुनी यांच्याबरोबरच हिंदी महासागराच्या अन्य प्रवेशद्वारांवर सतत टेहळणी करणे आणि आणीबाणीच्या काळात नाकेबंदी करणे भारतीय नौदलाला ‘मोहीम-आधारित तैनाती’द्वारे शक्य होणार आहे. 


गोव्यात पार पडलेल्या नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत नौदलाच्या या नव्या धोरणाबाबत विचार केला गेला. त्याच वेळी भूदल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि हवाई दल प्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्याशीही नौदल अधिकाऱ्यांनी संवाद साधला. हिंदी महासागरावर भारताचे वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान पेलत असताना या क्षेत्रातील आपल्या राष्ट्रहिताच्या संरक्षणासाठी तिन्ही सैन्यदले एकत्रितपणे कार्य करण्याची नितांत आवश्यकता भासत आहे. त्या दृष्टीने अलीकडील काळात प्रयत्न होत आहेत. नौदलाचे नवे धोरण अमलात आणत असताना दूरवर तैनात असलेल्या युद्धनौका, विमाने, पाणबुड्यांची देखभाल कशी करावी, त्यांना रसद पुरवठा कसा करावा आणि त्यावर तैनात करण्यात येणाऱ्या मनुष्यबळाची अदलाबदल कशी करता येईल याबाबतही सविस्तर मंथन गोव्याच्या परिषदेत करण्यात आल्याचे नौदलाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. हे मुद्दे संबंधित क्षेत्रातील भारतीय नौदलाच्या शाश्वत आणि परिणामकारक कार्यक्षमतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. इतक्या दूरवर तैनात असलेल्या युद्धनौका, पाणबुड्या आपल्या तळावर देखभालीसाठी येऊन पुन्हा त्या मोहिमेवर जाण्यासाठीचे आणि दरम्यानच्या काळात बदली युद्धनौका तेथे पाठवण्याचे वेळापत्रकही या परिषदेत निश्चित करण्यात आले आहे. 


अशा प्रकारे सुसज्ज युद्धनौका, पाणबुड्या आणि विमानांची तैनात केली जाणार असली तरी त्याच वेळी ‘नाविक राजनया’च्या माध्यमातूनही भारतीय नौदल या क्षेत्रातील विविध देशांच्या बंदरांना भेटी देत राहणार आहे. त्यातून त्या देशांबरोबरच्या भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यास नौदल हातभार लावत राहणार आहे. तसेच भारतीय नौदल हिंदी महासागरातील मित्रदेशांच्या नौदलांशी संपर्क वाढवून परस्पर सहकार्य वाढवण्यावर पूर्वीप्रमाणेच भर देत राहणार आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या ‘प्रोजेक्ट मौसम’ या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदी महासागरीय देशांबरोबरचे संबंध विकसित करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. या महासागराच्या किनाऱ्यावरील देशांशी भारताचे प्राचीन काळापासून व्यापारी तसेच सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. त्या संबंधांचे पुनरुज्जीवन करणे भारताचा हिंदी महासागरातील प्रभाव कायम ठेवण्यासाठी लाभदायक ठरणार आहे. 


अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी तेथील काँग्रेसला चीनशी संबंधित लष्करी व सुरक्षाविषयक घडामोडींचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार, २०१६ मध्ये चीनने मलाक्काच्या सामुद्रधुनीतील जलमार्गानेच ८० टक्के तेलाची आणि ११ टक्के नैसर्गिक वायूची आयात केली होती. चीनचा आफ्रिकन देशांशी होणारा व्यापारही याच सामुद्रधुनीतून होत आहे. त्यामुळे पुढील काळात मलाक्काच्या सामुद्रधुनीचे महत्त्व चीनसाठी आणखी वाढून चिनी नौदल या परिसरात अधिक सक्रिय होईल, असेही मत त्यात व्यक्त केले गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘मोहीम-आधारित तैनाती’च्या धोरणामुळे भारतीय नौदलाला हिंदी महासागरीय क्षेत्रातील आपले अस्तित्व अधिक भक्कम करण्यास मदत होणार आहे. 


- पराग पुरोहित (संरक्षण अभ्यासक)
parag12951@gmail.com

बातम्या आणखी आहेत...