आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी उद्याेजकांची नकारघंटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र, इन्व्हेस्ट मराठवाडा’ असे आवाहन करीत आग्रहाने औरंगाबादला बोलावलेल्या  फ्रान्सच्या वाणिज्य दूताने शुक्रवारी इथल्या राज्यकर्त्यांना चांगलीच चपराक लगावली. ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हे ठीक आहे; पण आम्ही मराठवाड्यात, अर्थात औरंगाबादमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही, असे स्पष्टच सांगून हे महाशय गेले. त्यामुळे इथल्या महत्त्वाकांक्षी औद्योगिक नगरीचे काय होणार आहे, असा प्रश्न पुन्हा आ वासून उभा राहिला आहे. काॅन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे (सीआयआय)आयोजित गुंतवणूक परिषदेत राज्याच्या उद्योगमंत्र्यांसमोर हा प्रकार घडला. मात्र, या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता मंत्री कार्यक्रम संपण्यापूर्वीच निघून गेले. हे वृत्त प्रकाशित झाल्यामुळे सीआयआयचे काही पदाधिकारी नाराज झाले. अशा वृत्ताने औरंगाबाद शहराचीच बदनामी होते, अशाही प्रतिक्रिया दिल्या गेल्या; पण हजारो कोटींची गुंतवणूक करणारे प्रगत देशातले उद्योजक काय पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेतात, हे मात्र कोणी लक्षात घ्यायला तयार नाही. 

मराठवाड्यात, विशेषत: डीएमआयसीच्या आॅरिक सिटीत मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करावी, यासाठी खरे तर सरकारपेक्षाही अधिक प्रयत्न स्थानिक उद्योजक आणि त्यांच्या संघटना करीत आहेत. ऋषी बागला हे सीआयआयचे राज्य अध्यक्ष आहेत आणि त्यांनीच ही गुंतवणूक परिषद औरंगाबादमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आणि मराठवाडा अध्यक्ष एन. श्रीराम यांना मराठवाड्यातील जनतेने मनापासून धन्यवादच द्यायला हवेत. फ्रान्सचे वाणिज्य दूत शाॅन मार्क मिन्काॅन यांनी औरंगाबादला येण्यात फ्रेंच कंपन्यांना रस नाही, असे म्हटले असेल तर त्यात सीआयआयचा काय दोष आहे? उलट स्टरलाइटसारख्या कंपनीने येत्या पाच वर्षांत तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय याच परिषदेत जाहीर केला, हेही महत्त्वाचे आहेच. पण म्हणून एक विदेशी वाणिज्य दूत काय सांगतो आहे, याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? उलट चातकासारखी वाट पाहत असूनही मोठे उद्योग आॅरिक सिटीत गुंतवणूक का करत नाहीत, याचे मूर्तिमंत उत्तर मिन्काॅन यांच्या रूपाने औरंगाबादमध्ये अवतरले होते. त्याचा फायदा घेत इथे न येण्यामागचे खरे कारण त्यांच्याकडून जाणून घेतले असते तर ही गुंतवणूक परिषद अधिक यशस्वी झाल्याचे म्हणता आले असते. पण राज्याच्या उद्याेगमंत्र्यांना त्यात फारसा रस होता, असे त्यांच्या वागण्यावरून दिसले  नाही. कॅनडा, फ्रान्स यासारख्या देशांचे प्रतिनिधी उपस्थित असताना उद्याेगमंत्र्यांनी त्यांना समजेल अशा इंग्रजी भाषेत भाषण करणे अपेक्षित होते. त्यांच्यासाठी हे सरकार काय करू शकते हे त्यांना अधिक प्रभावीपणे सांगितले असते तर काहीच परिणाम झाला नसता का? पण मंत्रिमहोदय मराठीतून भाषण करून गेले. गुरुवारी रात्री विदेशी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीतही उद्याेगमंत्र्यांना फारसा रस दिसत नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. निदान माध्यमांशी बोलण्यात तरी त्यांना रस नव्हता हे तर त्यांनी दाखवूनच दिले.  

फ्रेंच वाणिज्य दूत जे काही सांगून गेला आहे, त्याने तरी औरंगाबादच्या आणि राज्यातल्याही राज्यकर्त्यांचे डोळे उघडायला हवेत. फ्रेंच उद्योजक भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रातही गुंतवणूक करायला तयार आहेत. मात्र, मुंबई, पुण्यात. औरंगाबादला येण्यासाठी कोणी का तयार नाही, हे आपणच शोधायला हवे. इथे विदेशी उद्योजक आले तर त्यांच्यासमवेत येणाऱ्या त्या त्या देशातल्या अधिकाऱ्यांना या शहरात राहायला आवडेल का? हा पहिला प्रश्न. मुंबई-पुण्याच्या तुलनेत विचार केला तर नाही असेच उत्तर समोर येते. मग ते उद्योजक औरंगाबादमध्ये गुंतवणूक करायला तयार नसतील तर त्यांना  तरी दोष का द्यायचा? अरुंद रस्ते आणि दर शंभर, दीडशे मीटर्सवर खोळंबणारी वाहतूक, रस्त्यांवरील खड्डे या बाबी कदाचित मुंबई आणि पुण्यातही सारख्याच असतील. पण सर्वात महत्त्वाची कनेक्टिव्हिटी जी त्या दोन शहरांना आहे, त्या तुलनेत औरंगाबाद कुठेच नाही. अर्थात, ते समजून घ्यायचे असेल तर मुख्यमंत्री आणि उद्याेगमंत्र्यांनी किमान एकदा तरी रस्तेमार्गाने मुंबईहून औरंगाबादला येऊन पाहायला हवे. तरच त्यांना इथे उद्याेजकांना आकर्षण का वाटत नाही, हे पटकन कळू शकेल.  

दीड वर्षापूर्वी इथली पाणीटंचाईदेखील गाजली होती. पाऊस पुरेसा पडला नाही म्हणून इथल्या दारू आणि बिअर उद्याेगांचे पाणी बंद करण्यात आले होते. त्यात अनेक विदेशी कंपन्याही होत्या. त्यामुळे इथे पाणी नाही ही माहिती जगभर पसरली आहे. त्याचाही परिणाम इथे विदेशी गुंतवणूक यायला तयार न होण्यामागे असेल. पण तितक्या खोलात जायची सरकारची तयारी असेल तर त्यावरचे उपाय शोधता येतील. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी जात असेल तर उपयोग काय? 

- दीपक पटवे, निवासी संपादक (औरंगाबाद)
बातम्या आणखी आहेत...