आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजनैतिक विजय!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अांतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी दुसऱ्यांदा विराजमान हाेण्याचा सन्मान अखेर भारताचे न्या. दलवीर भंडारी यांना मिळाला. या फेरनियुक्तीत ब्रिटन माेठा अडसर ठरला हाेता. ब्रिटनने क्रिस्ताेफर ग्रीनवुड यांना नामांकन जाहीर केले हाेते. या दाेघांत अक्षरश: अटीतटीची लढत चालली हाेती. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ब्रिटनचा समावेश असल्याने अमेरिका, रशिया, फ्रान्स अाणि चीन या देशांनी ग्रीनवुड यांना समर्थन दिले, त्यामुळे ब्रिटनचे पारडे जड बनले हाेते. ११ फेऱ्यांमध्ये न्या. भंडारी यांना संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दाेनतृतीयांश मतांनी बहुमत मिळाले. मात्र, सुरक्षा परिषदेत ते ग्रीनवुड यांच्या तुलनेत ३ मतांनी पिछाडीवर हाेते. त्यासाठी १२ वी फेरी घेतली जाणार हाेती; मात्र या चुरशीच्या लढतीत अखेरच्या क्षणी ब्रिटनचे क्रिस्ताेफर ग्रीनवुड यांनी अापला पराभव स्वीकारून अनपेक्षितरीत्या माघार घेतली. महासभेतील १९३ पैकी १८३, तर सुरक्षा परिषदेतील सर्व १५ मते न्या. भंडारी यांना मिळाल्याने फेरनियुक्तीचा मार्ग माेकळा झाला.


न्या. भंडारी यांची निवड म्हणजे संयुक्त राष्ट्रातील भारताचा माेठा राजनैतिक विजय मानला जात असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी त्यासाठी जबरदस्त माेहीम चालवली हाेती. दरम्यान, यापूर्वी न्या. नगेंद्र सिंह ‘अायसीजे’मध्ये दाेन वेळा न्यायाधीश झाले हाेते. न्या. भंडारी यांची ‘अायसीजे’वर निवड झाल्यानंतर जितके काही निर्णय घेतले गेले त्यामध्ये त्यांचे मत हे ‘स्पेशल अाेपिनियन’ राहिले हे यानिमित्ताने उल्लेखनीय ठरावे. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली सुनावलेल्या देहदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्या प्रकरणातील १५ न्यायाधीशांमध्ये न्या. दलवीर भंडारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण हाेती. त्यांनी २००८ च्या भारत-पाक कराराचा हवाला देत मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा पाकिस्तानवर ठपका ठेवला हाेता. 


न्या. भंडारी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४७ मध्ये झाला. आजोबा बी. सी. भंडारी आणि वडील महावीरचंद भंडारी यांच्याकडून त्यांना वकिलीचा वारसा मिळाला. भंडारी यांनी राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. शिकागोत वकिली केल्यानंतर ते भारतात परतले. १९७३ ते १९७६ या काळात राजस्थान हायकोर्टात वकिली केली. १९७७ मध्ये ते दिल्ली हायकोर्टात वकिली करू लागले. या क्षेत्रातील २३ वर्षांच्या अनुभवानंतर १९९१ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर २००५ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली हाेती. १९ जून २०१२ राेजी पहिल्यांदा त्यांनी अांतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशपदाची शपथ घेतली. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गाैरवण्यात अाले अाहे. न्यायप्रणालीत जगभर हाेत असलेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘ज्युडिशियल रिफाॅर्म्स : रिसेंट ग्लाेबल ट्रेंड्स’ हे पुस्तकदेखील लिहिले अाहे. 


नेदरलँडमधील हेग येथे १९४६ मध्ये अांतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली. त्यानंतर पहिल्यांदाच या खेपेस ब्रिटनला सदस्यत्व मिळालेले नाही. साेप्या शब्दांत सांगायचे तर या अांतरराष्ट्रीय न्यायालयात पहिल्यांदाच ब्रिटनचा काेणी न्यायाधीश नाही. या न्यायालयासाठी १५ न्यायाधीशांपैकी १४ जणांची निवड झाली हाेती. मात्र, न्या. भंडारी अाणि ग्रीनवुड यांच्यातील चुरस अत्यंत राेमांचक बनली हाेती. 


या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त राष्ट्र महासभा अाणि सुरक्षा परिषदेत मताधिक्याने विजयी हाेणे अावश्यक असते. या न्यायाधीशांपैकी एकतृतीयांश लाेकांची निवड दर तीन वर्षांनी केली जाते. त्याचप्रमाणे एकाच राष्ट्राचे दाेन न्यायाधीश असू शकत नाहीत, तसेच त्यांना अन्य काेणतेही पद स्वीकारता येत नाही. जर एखाद्या न्यायाधीशाला हटवायचे असेल तर उर्वरित न्यायाधीशांनी सर्वसंमतीने तसा निर्णय घेणे अत्यावश्यक असते. कुणीही सदस्य देश या न्यायालयाचे दार ठाेठावू शकताे. सध्या १९२ देश या न्यायालयाचे सदस्य अाहेत. सुरक्षा परिषदेतील सदस्य राष्ट्र विशेषत: महासत्तांनी न्या. भंडारी यांच्या विजयरथाची घाेडदाैड पाहून धसका घेतला. कदाचित भविष्यात अापणासमाेर नवी अाव्हाने उभी राहू शकतील, अशी भीती त्यांना वाटते अाहे. 

- श्रीपाद सबनीस

बातम्या आणखी आहेत...