आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलदेवचे संघर्षाचे ‘ते’ दिवस…

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटचा कपिलदेवसारखा हीरो, भारतीय क्रिकेटच्या खाणीतून काढण्याचे श्रेय राजसिंग डुंगरपूर या क्रिकेटवेड्या अवलियाकडे जाते. पाकिस्तानात कपिलदेवची गोलंदाजी आणि फलंदाजी चमकण्याआधी, सीसीआयच्या संघात यावे यासाठी तो राजसिंग यांच्या दरवाजापुढे दिवसभर बसून होता, हे कटू सत्य कुणालाही पटणारे नाही. भारताचे माजी कसोटीपटू आणि राजसिंग डुंगरपूर यांचे खास जवळचे मित्र, सहकारी क्रिकेटपटू यजुवेंद्रसिंग यांनी इतिहासाच्या कप्प्यातील हे लपलेले पान गेल्या आठवड्यात सर्वांपुढे आणले. निमित्त होते राजसिंग डुंगरपूर स्मृती व्याख्यान मालिकेतील पहिले पुष्प गुंफण्याचे. 

त्याचे असे झाले, त्या काळी सीसीआयच्या वतीने भारतीय तरुण क्रिकेटपटूंचा संघ परदेशात खेळायला जायचा. राजसिंग त्या योजनेचे सुकाणू होते. त्यांनी ईस्ट आफ्रिकेला जाणारा संघ निवडला. पतौडीचा नवाब मन्सूर अली याच्यासह भारतीय संघातील सीनियर क्रिकेटपटूदेखील त्या संघात होते. कपिलदेवला त्या दौऱ्याचा वास लागला. त्याने दौऱ्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, संघात त्याची निवड होऊ शकली नाही. आपली निवड झाली नसल्याचे कपिलदेवला  कळताच त्याने चंदिगडहून थेट मुंबई गाठली.  
मुंबईत उतरताच राजसिंग यांची एक रूम सीसीआयमध्ये असायची. तेथे राजसिंग हमखास सापडायचे. हे कपिललाही ठाऊक होते. त्याने राजसिंग यांना ईस्ट आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या संघात स्वत:ला घेण्याची गळ घातली. राजसिंग यांनी ते आता अशक्य असल्याचे सांगून टाकले; पण कपिलने हार मानली नाही. तो त्यांच्या दरवाजासमोर बसून राहिला. राजसिंग यांनी मग शक्कल लढवली. त्यांनी कपिलला सांगितले, तुझा पासपोर्ट आहे? कपिल म्हणाला नाही. 

राजसिंग यांनी लगेच सांगितले, पासपोर्ट असता तर निवडला असता; आता तू जाणार कसा? कपिलदेव, राजसिंग यांच्यापेक्षा चतुर होता. त्याने सांगितले, मी पासपोर्ट एक दिवसात मिळवू शकेन. राजसिंग यांची पंचाईत झाली. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. राजसिंग रात्रीचे जेवण करण्यासाठी सीसीआयच्या रेस्टॉरंटमध्ये गेले. त्यांना वाटले, कपिलदेव आता कंटाळून निघून जाईल. रात्री उशिराच घरी परतले. दरवाजात कपिलदेव बसलेला दिसला. त्या क्षणी त्यांना वाटले, या मुलात जिद्द, चिकाटी दिसतेय. आपण प्रयत्न करून पाहावा. त्यांनी कपिलला सांगितले, उद्या सकाळी ये, आपण ईस्ट आफ्रिका क्रिकेट संघाच्या अध्यक्षांशी बोलू. त्यांनी आणखी एक खेळाडू संघासोबत आणण्याची परवानगी दिली तर मी तुला संघात घेईन. कपिलच्या सुदैवाने होकार आला आणि कपिलदेव ईस्ट आफ्रिकेला गेला. 

कपिलदेवचे मैदानावरचे वावरणे, हावभाव आणि अघळपघळ क्रिकेट पेहराव संघाचे कप्तान पतौडी यांना पसंत नव्हता. त्यांनी राजसिंग यांना सांगितले, हा काही क्रिकेटपटू होईल असे वाटत नाही, त्याला क्रिकेटचे ‘मॅनर्स-एटिकेट्स’देखील ठाऊक नाहीत; कसा चालतो, कसा वावरतो, पाहा. 

राजसिंग यांनी कपिलदेवला क्रिकेटच्या रीतीभाती शिकवण्याची जबाबदारी यजुवेंद्रसिंग यांच्यावर टाकली. ईस्ट आफ्रिकेने २१७ धावसंख्येच्या जवळपास धावसंख्या उभारली. भारतीय संघ तगडा होता. या धावा सहज होतील असे वाटत होते, पण घडले विपरीत. भारतीय संघ कोसळला, ९ गडी बाद झाले, विजय लांब होता. अकरावा खेळाडू कपिलदेव मैदानात उतरला. पतौडीच्या कपाळावर आणखी आठ्या उमटल्या. राजसिंग यांनी यजुवेंद्रला खुणावले. यजुवेंद्रसिंग यांनी कपिलला खेळपट्टीपर्यंत चालत साथ दिली व सांगितले, तुला शिकवले आहे, त्याप्रमाणे खेळ. कसा खेळशील? यावर कपिल म्हणाला, ‘सरळ बॅटने’. किरमाणी नाबाद होता; त्याने सांगितले, एक धाव काढून समोर ये, मी धावा काढीन. 

ज्या ऑफस्पिनरने भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली होती, त्याचा चेंडू कपिलदेवने सरळ बॅटने उचलला व स्टेडियमच्या छपरापलीकडे, पार्किंगच्या जागेवर फेकून दिला. राजसिंग तर उड्याच मारायला लागला. कपिलदेवने ६०च्या जवळपास नाबाद धावा काढल्या. किरमाणी एकही धाव न काढता समोर उभा राहिला. कपिलच्या प्रत्येक चौकार-षटकाराला राजसिंग डुंगरपूर चांगल्या गाण्याला किंवा तान आली की दाद द्यावी तसे ओरडत होते. दिवसअखेर पतौडीला ते म्हणाले, ‘पॅट’ मला वाटते, हा मुलगा क्रिकेट खेळू शकेल! नाही? 
त्यानंतर कपिलदेवला कधीही कुणाच्याही दारासमोर बसून राहावे लागले नाही. 

यजुवेंद्रसिंग यांनी राजसिंग यांच्या क्रिकेटप्रेमाचे आणि विनोदी घटनांचे अनेक किस्से सांगितले. एकदा भारतीय संघाचा सामना चंबळ खोऱ्याच्या जवळपास ठेवला होता. डाकूंनी क्रिकेटपटूंना घेरले आणि पैसे मागितले. पतौडीने हात वर केले. सर्वांनी राजसिंगकडे बोट दाखवले. राजसिंग यांनी पैसे देऊन क्रिकेटपटूंची सुटका केली. त्यानंतर काही दिवसांनी क्रिकेटपटूंना कळले की, डाकूंच्या वेशातील ते सर्व जण खरे डाकू नव्हते, तर राजसिंग यांचे नोकर होते. 

क्रिकेटप्रमाणे गोल्फ खेळातही वाकबगार असणारे राजसिंग वन्यप्राणी व त्यांच्या छायाचित्रांमध्येही रमत. कॅसिनोमध्ये डोकावणारे ते क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक समस्यांवर मलमपट्टी करायचे, आर्थिक मदतही करायचे. केरी पॅकर सर्कशीत भारतीय क्रिकेटपटूंना जाण्यापासून परावृत्त करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीनंतर सीसीआयमध्ये क्रिकेट जवळजवळ १५ वर्षे बंदच झाले होते; ते त्यांनी पुन्हा सुरू केले. डॉन ब्रॅडमन हे त्यांचे आराध्य दैवत होते. मृत्यूपूर्वी त्यांना विस्मरणाची व्याधी झाली होती. आश्चर्याची गोष्ट अशी की, त्यांनी अखेरचा श्वास सोडण्याआधी त्यांच्यासमोर ब्रॅडमन यांच्या स्वाक्षरीची बॅट आणली त्या वेळी त्यांनी ‘डॉन’ हा एकमेव शब्द उच्चारला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
 
- विनायक दळवी, क्रीडा पत्रकार
बातम्या आणखी आहेत...