आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुमसते काश्मीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर मतदारसंघामध्ये गेल्या रविवारी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेले केवळ ७.१ टक्के मतदान व हिंसाचारात ७ जणांचा मृत्यू पाहता जम्मू व काश्मीरमधील राजकीय परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हणता येईल. राज्यात पीडीपी व भाजपचे सरकार असताना काश्मीरच्या राजकीय परिस्थितीत आमूलाग्र बदल होईल, असे सकारात्मक वातावरण तयार करू, अशी ग्वाही  दोन्ही पक्षांनी दिली होती. पण प्रत्यक्षात सत्तांतरानंतर हिंसाचार, दहशतवादी कारवाया, लष्करावर नागरिकांकडून होणारी सातत्याने दगडफेक व पाकिस्तानचा वाढता हस्तक्षेप यात वाढ झालेली िदसते. रविवारी श्रीनगर मतदारसंघात जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांपेक्षा सुरक्षा जवानांची संख्या अधिक होती. दहशतवादी हल्ल्यांची शक्यता म्हणून सर्वच केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था जरी ठेवण्यात आली असली तरी मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत पराकोटीचा निरुत्साह का आला, याची कारणे शोधण्याची गरज आहे. 

श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला वयाच्या ८१ व्या वर्षी निवडणूक लढवत आहेत. फारुख अब्दुल्ला यांचा राजकीय प्रवास कमालीचा वादग्रस्त असला तरी काश्मिरी जनतेत त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. काश्मीरच्या राजकारणाचे निदान करणारे ते एक प्रमुख नेते आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या हातातून काश्मीर निघून जाण्याची भीती व्यक्त केली. या मुलाखतीत अब्दुल्ला यांनी केंद्रातील व राज्यातील सरकार काश्मीरियतला, तरुण मुलांच्या मानसिकतेला समजून घेत नसल्याने हा प्रश्न अतिशय जटिल होत चालल्याची भीती व्यक्त केली. 

बेरोजगारी व राजकीय अस्थिरतेमुळे काश्मीरमधील तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून हातात दगड घेत स्वत:च्या प्राणाची तमा न बाळगता भारतीय लष्करावर हल्ले करत असून याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून कोणतेही ठाम धोरण नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. अब्दुल्ला यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातही भ्रष्टाचार व दहशतवादाने काश्मीर होरपळला होता (आणि ते वाजपेयी सरकार सत्तेत असताना एनडीए आघाडीत सामीलही झाले होते.) पण बहुतांश वेळी राज्यात व केंद्रात काँग्रेस पक्ष असल्याने सेक्युलर राजकीय परिप्रेक्षातून या प्रश्नाकडे पाहिले जात होते. त्यामुळे या प्रश्नाचा लंबक धर्माधारित राजकारणाकडे झुकला नाही. ३७० कलमाच्या अंतर्गत काश्मीरला मिळालेली स्वायत्तता, हुरियतसारख्या फुटीरतावादी गटांना  (जे काश्मिरी जनतेचे प्रतिनिधी असल्याचा दावा करत असतात) चर्चेत सहभागी करून घेणे, पाकिस्तानशी अनेक पातळ्यांवर चर्चा करणे यातून परिस्थिती हाताळली जात होती. पण जम्मू व काश्मीर राज्यात व केंद्रात भाजप निवडून आल्याने काश्मीर प्रश्नाकडे हिंदुत्वाच्या नजरेतून पाहिले जाऊ लागले. 

भाजपला ज्या पद्धतीने काश्मीर प्रश्न हाताळायचा आहे त्यासाठी त्यांच्याकडे राज्यात बहुमत नाही आणि पीडीपीशी केलेली युती ही केवळ सत्तेसाठी आहे. भाजपने ही सत्ता मिळवली ती काश्मीरच्या राजकारणात हिंदुत्वाला स्थान आहे या मुद्द्यावरून. हे मात्र राजकीय वास्तव आहे की, भाजपला त्यांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच काश्मीरच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात शिरकाव करता आला. त्यामुळे केंद्रात शक्तिशाली सत्ता मिळाल्याने जी राजकीय चौकट भाजपतील थिंक टँकच्या मनात आहे ती राबवता येईल, अशा पद्धतीने सुरुवातीस काही पावले उचलली गेली. त्यातले पहिले पाऊल म्हणजे हुरियत कॉन्फरन्सचे काश्मीरच्या राजकारणातले स्थान पूर्णपणे नाकारून केंद्राने फक्त पाकिस्तानशी चर्चा सुरू केली. 

हेच पाऊल सरकारला महागात पडले. कारण हुरियत निवडणुकांमध्ये भाग घेत नसला तरी त्यांचा काश्मीरच्या राजकारणातील प्रभाव नाकारता येत नाही. गेल्या वर्षी सर्व पक्षांचे नेते काश्मीर दौऱ्यावर गेले होते व त्यांनी काश्मीर खोऱ्यातील विविध राजकीय नेत्यांशी चर्चा केली. हुरियतने या घडामोडींकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने केंद्राच्या हाती काहीच लागले नाही. भारत-पाकिस्तान चर्चेत हुरियतला सामील करून घेतले जात नाही तोपर्यंत काश्मीर पूर्वपदावर येणार नाही, ही हुरियतची भूमिका भाजपला मान्य नाही. 

गेले वर्षभर काश्मीर तापवण्यात व तरुणांना गल्लीबोळातून लष्करावर दगडफेक करण्यामागे हुरियतची फूस आहे, हे जगजाहीर आहे. पण सरकार हुरियतच्या मुसक्या बांधू शकलेले नाही. त्यात पाकिस्तानशी संवादाचे जवळपास सर्व मार्ग थांबले आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली काही तरी चर्चेचे फार्स होतात, पण आता अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर त्यांना काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची गरज वाटू लागली आहे. हा आणखी एक धोका निर्माण झाला आहे. काश्मीरचे राजकीय नेपथ्य वेगाने बदलत आहे त्याबरोबर केंद्राची भूमिका लवचिक असण्याची गरज आहे. 
 
- सुजय शास्त्री, डेप्युटी न्यूज एडिटर, मुंबई
बातम्या आणखी आहेत...