आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारा तारांगणातला : किदांबी श्रीकांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीकांतच्या यशात एक आल्हाददायक पैलू म्हणजे गोपीचंदने शोधून काढलेल्या इंडोनेशियन शिक्षकांची साथ. ऑलिम्पिक व जागतिक जेत्या चेन लाँगला पाऊण तासात नमवल्यानंतर श्रीकांतने धाव घेतली इंडोनेशियन गुरू मुलयो यांच्याकडे. अन् त्यांना चक्क मिठी मारली की! 

सारं भारतीय क्रीडा क्षेत्र, म्हणजे १३० कोटी नागरिकांपैकी (म्हणे) तीन कोटी खेळाडू नव्हे तर प्रेक्षक, डोळ्यात जीव ओतून आकाशाकडे बघत होते. नभांच्या पटलावर आपापल्या आवडत्या ताऱ्यांच्या उदयाची उत्कंठेने वाट बघत होते. 
आता स्टार स्पोर्ट््स वा तत्सम संस्था सांगतात त्या आकड्यावर विश्वास ठेवून बघूया म्हणजे म्हणे हे भाविक निदान तीन कोटी. त्यातले ९९ टक्के भक्त विराट ताऱ्याचे. माही व युवी या ताऱ्यांचेही भक्तगण चिक्कार. पण रोहित व धवन याही ताऱ्यांना डोळ्यांनी आरती ओवाळण्यास किती किती अति उत्सुक. या साऱ्या ताऱ्यांचा उदय अटळ मानला जात होता. 

ज्योतिष्यांनी कुंडली मांडलेली होती. त्यानुसार या ताऱ्यांच्या उदयाची घटिका निश्चित केलेली होती. पण म्हणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सत्याग्रहास यश आलं अन् कुडमुड्या ज्योतिषाचार्यांची भाकितं एकजात, एकसाथ फसत गेली. उदय होण्याआधीच हे तारे म्हणे अस्ताला गेले. असंही होत असतं, असे खुलासे ज्योतिष भास्करांनी केले. शांतता राखण्याचे आदेश शासनाने काढले. आणि त्याच वेळी तारांगण उजळून काढणारे वेगळेच तारे दर्शन देऊ लागले. तीन कोटी क्रीडा शौकिनांपैकी पाच-पन्नास हजार हिंदवासीयांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. दोन कोटी नव्याण्णव लाखांना प्रश्न पडला. हे तारांगण आलंय तरी कुठून? आजवर आपल्या डोळ्यात ते कसे कधी भरले नव्हते. 

या नवताऱ्यांत अग्रभागी होत्या तारका. त्यांना सायना अन् सिंधू या नावांनी ओळखलं जातं. भारतीय क्रीडाप्रेमींना एव्हाना ती नावं परिचित झालेली आहेत. पण याता त्यांच्यापेक्षाही प्रकाशमान झाले आहेत आभाळातील सप्तर्षी. तीन कोटींपैकी दोन कोटी नव्याण्णव लाख रसिक आता जुळवून घेत आहेत या सप्तर्षींशी. त्यापैकी कुणी एक साई प्रणीत, तर कुणी प्रणय, कुणी पारुपल्ली कश्यप, तर कुणी अजय जयराम, कुणी समीर वर्मा, तर कुणी सौरभ वर्मा. अन् या तारांगणातील सप्तर्षींचा नवा केंद्रबिंदू तारा म्हणजे असाच एक किदांबी श्रीकांत. गतवर्षी रिओ-ऑलिम्पिकनंतर जसं तारिका सिंधूला सोन्याने मढवलं गेलं होतं, तसाच आता श्रीकांत ताऱ्याला आठ कोटी रुपड्यांचा मुलामा देण्यात येत आहे. 

चॅम्पियन्स उर्फ राष्ट्रकुल करंडक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या संघाकडून अपेक्षाभंग झाला खरा. पण त्याच पंधरवड्याने, आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या उगवत्या अष्टपैलुत्वाची उमेद दिली. क्रिकेट पलीकडील फार मोठ्या क्रीडा क्षेत्राकडे भारतीयांना वळवलं. बुद्धिबळातील जागतिक सांघिक स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला चमूंची ब्राँझ पदकं थोडक्यात हुकली. पण त्यांचे क्रमांक चौथे-चौथे लागले. मंगोलियातील उलन बटार बॉक्सिंगमध्ये देवेंद्रो सिंगनं रौप्य, तर १९ वर्षीय अंकुश दहियाने सुवर्ण पदक पटकावलं. नेमबाजीत नव्यानं रूढ होत असलेल्या मिश्र शूटिंगमध्ये जितू राय व हिना सिधू-पंडित जोडी सर्वोत्तम ठरली. आणि आता किदांबी श्रीकांतने तर पाठोपाठच्या जागतिक अव्वल (सुपर सिरीज) बॅडमिंटन स्पर्धात सुवर्णांची जोडी खेचून आणलीय! 

पण श्रीकांतच्या यशापलीकडे नेणारं यश भारतीय बॅडमिंटनपटूंनी कमावलंय. आजवर भारतीय बॅडमिंटनचा डोलारा असे एकखांबी : महायुद्धानंतर एकटे देविंदर मोहन. मग जमाना नंदू नाटेकरांचा. त्यानंतर प्रकाश पदुकोणचा. मग पुल्लेला गोपीचंदचा. पण आता प्रथमच भारताला लाभलाय, एकुलत्या एक महानायकाऐवजी कर्तबगार शिलेदारांच्या जथा. त्यात आहेत तीसवर्षीय पारुपल्ली कश्यप अन् २९ वर्षीय अजय जयराम असे अनुभवी, कसलेले वीर. तसेच श्रीकांत, साई प्रणीत, प्रणय, सौरभ वर्मा हे चौघेही चोवीस वर्षांचे, तर सौरभचा धाकटा भाऊ समीर हा त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी तरुण. पंचविशीच्या उंबरठ्यावरील हे पाच पांडव, संकेत देत आहेत. भारतीय बॅडमिंटनमधील अभूतपूर्व प्रगतीचे, एका नवयुगाचे! चीन, दक्षिण कोरिया, एकेकाळचे इंडोनेशिया व मलेशिया या बॅडमिंटनमधील महासत्तांच्या जवळपास जाण्याचे! 

जागतिक रँकिंगमध्ये पहिल्या २२ जणांत चौघे भारतीय असावेत, इतपत विकासाचा टप्पा भारतानं यापूर्वी कधी गाठला होता? पदुकोण जगात अव्वल होता व काही वर्षे पहिल्या तिघा-चौघांत जरूर होता. पण तिथं तो एकाकीच होता! आता प्रणय २१ वा. साईप्रणीत १६ वा, जयराम १५ वा आणि श्रीकांत सध्याच्या ११व्या स्थानावरून पाचव्या-सहाव्या क्रमांकावर पोहोचल्यासारखाच! ही पलटण एकसाथ स्पर्धेत उतरल्याचे फायदे परस्परांना! इंडोनेशियन स्पर्धेत प्रणयने ऑलिंपिक जेता चेन लाँग व महारथी ली चाँग यांचे पत्ते काढले अन् श्रीकांतची वाटचाल किती सोपी केली! इंडोनेशियन स्पर्धेतील उपविजेत्या साकाईला कश्यपने ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यातच घरचा रस्ता दाखवला! प्रणय-कश्यप स्वत: अजिंक्य बनू शकले नाहीत. पण, श्रीकांत-साई प्रणीत यांच्या मार्गातील अडथळे त्यांनीच दूर केले! हे भारतीय बॅडमिंटनचं नववैभव. 

एकाकी महानायकाऐवजी कर्तबगार शिलेदारांची पलटण, हा भारतीय बॅडमिंटनचा नवा चेहरा. याचा अर्थ असा अजिबात नव्हे की, देविंदर वा नाटेकर, पदुकोण वा गोपीचंद अशांची उणीव त्यांना जाणवत नाही. पण या आभाळातील सप्तर्षींतूनच असा महानायक गवसू शकेल. कुणी सांगावं. श्रीकांत वा साई प्रणीत ऑलिम्पिक पदक पटकावेलही! 
या यशात आणखी एक आल्हाददायक पैलू म्हणजे गोपीचंदने शोधून काढलेल्या इंडोनेशियन शिक्षकांची साथ. 

ऑलिम्पिक व जागतिक जेत्या चेन लाँगला पाऊण तासात नमवल्यानंतर श्रीकांतने धाव घेतली इंडोनेशियन गुरू मुलयो यांच्याकडे. अन् त्यांना चक्क मिठी मारली की! तशीच गोष्ट फिजिओ किरणची. श्रीकांतचा पाय दुखावला तेव्हा किरणने त्याला घरी जाऊ दिलं नाही. कोर्टवरील बॉक्समध्ये बसवलं आणि बसल्या बसल्या खेळतं ठेवलं. दुखापतीच्या दिवसांचा उपयोग फिटनेस वाढवण्यासाठी करून घेतला! मुख्य म्हणजे फिजिओ, व्यायाम शिक्षक व स्वत: गोपीचंद यांच्यावर श्रीकांतचा पूर्ण भरवसा आहे. त्यांनी आखून दिलेला सराव, व्यायाम, आहार यांच्याबाबत तो मनापासून आज्ञापालन करत आलाय. 

पण श्रीकांत बालपणापासून असा नव्हता. तेव्हा आंध्रमधील गुंटूर गावी तो दादाला, नंदगोपालला चिकटलेला असायला. आई-वडिलांनी नंदगोपालपाठोपाठ त्याला गोपीचंदकडे ठेवलं. तेव्हाही तो ‘दादा’सह दुहेरीच खेळायचा! गोपीचंदनी त्याचं दुहेरी (डबल्स) बंद केलं. त्याच्यातील गुणवत्ता हेरली. त्याचं तंत्र चौकटीबाहेरचं आहे, हे जाणून घेतलं. अन् तंत्राच्या पोथीत, चौकटीत त्याला अडकवलं नाही. पण उपजत कल्पकतेला संयमाची जोड देण्यासही शिकवलं. तरुण वयातील खोड्या व भंकस यातून मोठी स्वप्नं पाहायची अन् त्यासाठी मेहनत घेण्याची प्रेरणा दिली. 

असा हा तारांगणातला तारा, क्रिकेटपलीकडच्या क्रीडा विश्वाकडे भारताला नेणाऱ्या सुशीलकुमार व योगेश्वर दत्त व साक्षी मलिक, अभिनव बिंद्रा व गगन नारंग, विजेंदर व मेरी कोम, सायना व सिंधू यांच्याप्रमाणे प्रेरक तारा, ज्याला अजून खूप काही जग जिंकायचंय असा तारा! तारांंगणातील तारा! बॅडमिंटनपटू आदींच्या तारांगणाचेही आपण सारे सचिन-विराटप्रमाणे स्वागत करू लागू, तेव्हाच देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यास चालना मिळेल.  
 
- वि. वि. करमरकर (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व समीक्षक) 
बातम्या आणखी आहेत...