आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकांची कबुली, कार्यक्रमाचे काय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे भाजपच्या दृष्टीने विनोदी विषय असले तरी त्यांच्या प्रत्येक राजकीय विधानाला प्रसारमाध्यमातून उत्तर देण्याची भाजपची घाई अनाकलनीय आहे. मोदींवर सातत्याने टीका करून त्यांचे राजकीय महत्त्व वाढले, अशी राजकीय मांडणी भाजपचे प्रवक्ते, नेते, समर्थक सांगत असतात, तसा प्रकार राहुल गांधी यांच्याबाबतीतही होऊ शकतो हे या मंडळींना मान्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या एखाद्या धोरणावर टीका केली की त्याला उत्तर त्यांची टवाळी करून दिली जाते; पण या धोरणाचे समर्थन किंवा राहुल गांधी यांच्या आरोपाचा प्रतिवाद वा युक्तिवाद तेवढ्या समर्थपणे मांडला जात नाही. राजकारणात थट्टा, कुरघोडी, मत्सर व टीका केली जात असते. पण राजकारणात नेत्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वातील सुसंस्कृतपणा, सभ्यता व ज्ञानावर समाजाकडून जोखले जात असते. प्रश्न समर्थकांच्या संख्येचा नसतो, तर त्याच्या लोकशाहीप्रती असलेल्या जबाबदारपणाचा असतो. राहुल गांधी हे काही तत्त्वचिंतक नाहीत किंवा ते देशात खूप लोकप्रिय आहेत असेही नाही किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षाने ६० वर्षे राज्य केले व ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पुत्र आहेत म्हणून खुद्द काँग्रेस पक्ष त्यांच्यापुढे लीन झालाय, असेही नाही. प्रत्यक्ष राजकारणात ते २००४ पासून आहेत आणि यूपीए सरकारच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी मंत्रिपदापासून दूर राहणे पसंत केले होते. यूपीए सरकारच्या अखेरच्या काळात त्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. २०१४ ची ऐतिहासिक अशी लोकसभा निवडणूक ही काँग्रेसच्या आजपर्यंतच्या इतिहासात त्यांच्या आत्मपरीक्षणासाठी कामी आली. या निवडणुकीत काँग्रेस काठावर जरी उत्तीर्ण झाली असती तरी या पक्षात पुन्हा अहंकार निर्माण झाला असता. पण लोकशाहीत नेत्यांना वठणीवर आणले जाते व त्याची किंमत नेत्यांना, राजकीय पक्षांना चुकवावी लागते. काँग्रेसला ती चांगलीच चुकवावी लागली. परवाच्या अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात राहुल गांधी यांनी २०१२ नंतर पक्षात एक प्रकारचा अहंकार आला होता व नेत्यांचा जनतेशी संपर्क, संवाद तुटला होता हे पहिल्यांदा मान्य केले. पक्षाच्या उपाध्यक्षाने अशी प्रांजळ कबुली देणे हे महत्त्वाचे आहे. पण अशा कबुलीनंतर प्रश्न उपस्थित होतो की, आजच्या घडीला २०१७ मध्ये काँग्रेसच्या कोणत्या नेत्याचा तळागाळातल्या समाजाशी, मध्यमवर्गाशी संपर्क, संवाद आहे? लोकसभेत काँग्रेस ४४ जागांवर असला तरी लोकसभेच्या बाहेर मोठा राजकीय अवकाश भाजपच्या अनेक वादग्रस्त धोरणांनी काँग्रेसला मिळाला आहे त्याचा फायदा हा पक्ष घेताना दिसतोय का? रस्त्यावर नेते, कार्यकर्ते उतरताना दिसत नाही. सरकारच्या अनेक दाव्यांना उघडे पाडले जात नाही. ‘अच्छे दिना’चे जेवढे काही दावे भाजपने केले होते त्यातील प्रत्येकाचा पदार्फाश करण्याची सुसंधी काँग्रेस एक विरोधी पक्ष म्हणून घेतोय का?  

राहुल गांधी एक विधान काँग्रेसमधील ज्येष्ठांच्या दिशेने केले. पक्षाने जबाबदारी दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयारी असल्याचे त्यांचे म्हणणे होते. काँग्रेसमधील ढुढ्ढाचार्यांना -ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधी पक्षाध्यक्ष व पंतप्रधानपदी नको आहेत, हे स्पष्ट आहे. कारण याच बुजुर्ग नेत्यांचे राजकीय-आर्थिक हितसंबंध त्यामुळे अडचणीत येतील, अशी स्थिती आहे. त्यामुळेच आपल्या पक्षाचा एक राजकीय-सामाजिक-आर्थिक कार्यक्रम असावा यासाठी त्यांचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. भाजपने काँग्रेसला आव्हान देताना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रण उठवले होते, पण ‘अच्छे दिनां’चे आश्वासनही दिले होते. तर काँग्रेसकडे २०१९ मध्ये लोकांपुढे जाताना कोणता असा आश्वासक कार्यक्रम आहे? राहुल गांधी यांचे संयमी व्यक्तिमत्त्व किंवा भाजपच्या राजकीय चुका हा काही काँग्रेसचा राजकीय कार्यक्रम असू शकत नाही. राहुल गांधी यांनी २०१९साठी पक्ष काय करू इच्छितो याचे संकेत दिले असते तर अधिक बरे झाले असते. 

- सुजय शास्त्री
उप वृत्तसंपादक, मुंबई
बातम्या आणखी आहेत...