आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्तीकाळाची मीडियाबाधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जरा कुठे भूकंप झाला की कॅमेऱ्यासोबत माइकचे दांडके हातात घेऊन ‘आता तुम्हाला कसे वाटतेय?’ किंवा“भूकंप कसा वाटला?’ असे बुद्धिभ्रष्ट झाल्यागतचे फालतू प्रश्न वृत्तवाहिन्यांकडून विचारले जातात. मूळ मुद्द्यांना बगल देऊन आपली हाय कलर्ड इमेज आणखी कशी गडद करता येईल याकडे त्यांचे लक्ष असते. 

२९ ऑगस्टला मुंबईत धो-धो पाऊस पडला. मुंबईकरांची दैना झाली. रस्ते पाण्याखाली गेले. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वाहतूक व्यवस्था कोलमडली. घरी परतणाऱ्या लोकांचे हाल झाले. महिला, वृद्ध नागरिक, लहान मुलांची दुरवस्था झाली. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. काही काळ विमानसेवा बंद राहिली. एक्सप्रेस हायवेदेखील काही काळासाठी बंद करण्यात आला होता. पाणी उपसण्यासाठी सरकारी यंत्रणा झटत होत्या. मुंबईकर मात्र न डगमगता आपल्या दिनचर्येत गर्क होता. इतकं सर्व घडत असताना मुंबईकर आपल्या नेहमीच्या तथाकथित ‘स्पिरीट’मध्ये एकमेकांसाठी ठाम उभा राहिला. त्याने सोशल मीडियावरून, व्हॉट्सअॅपवरून पावसात अडकलेल्या लोकांना आपल्या घरी येण्याचं आवाहन केलं. अनेक जण या काळात ‘रेनहोस्ट’ झाले. या लोकांनी भावनेच्या भरात आपल्या घराचे पत्ते, मोबाइल, लँडलाइन नंबर्स पब्लिकली पोस्ट केले. काहींनी घराचे गुगल लोकेशनही दिले. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री पोलिस कक्षात भेट देऊन आले. बीएमसीच्या तिजोरीवर ताबा असणारी शिवसेना सक्रिय झाली. शिवसैनिकांनी जागोजागी मदतीची सेंटर्स डिस्प्ले केली. धर्मस्थळे, मंगल कार्यालये, फंक्शन हॉल्स लोकांच्या निवाऱ्यासाठी खुली केली गेली. हे सर्व घडत असताना अपवाद वगळता आपला मीडिया काय करत होता हे ‘डोळे विस्फारून बघण्यासारखे’ होते... 

यापूर्वीही मुंबईने याहून भयानक अशी जलप्रलयाची अवस्था २६ जून २००५ ला अनुभवली होती. तेव्हाही आपल्या मीडियाने असेच रंग उधळले होते. पाऊस ही नैसर्गिक आपत्ती आहे. मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे पावसाची समस्या भरती- ओहोटीशी निगडित आहे. तरीही त्यावर वनटाइम फिक्सिंग सोल्युशन्स काढली जाऊ शकतात. त्यावर भर न देता भौगोलिक स्थितीचे कारण पुढे करून अतिवृष्टीचे नासूर आता अस्मिता म्हणून जोपासले जाताहेत हे वास्तव आहे. लोकलमध्ये जीवघेणी गर्दी सहन करणारा, नाले तुंबावेत तसे माणसांनी वाहनांनी तुंबलेले रस्ते मुकाट सहन करणारा, कोणीही कसेही हाकले तरी त्यावर व्यक्त न होणारा, लोकसमूहाच्या भौतिक सुखाच्या अपेक्षांवर पाणी ओतणारा अन् आयुष्य म्हणजे भावभावनांना जगणं असतं हे विसरून अहोरात्र यंत्राला जुपून घ्यावे तसे जगणारा हा मुंबईकर! याच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी आता त्याच्या बेगडी अस्मिता तयार करून त्याला ‘स्पिरीट’चे गोंडस नाव दिले जातेय. 

लोकलच्या दुतर्फा झालेल्या झोपडपट्ट्या, नालेसफाईची दरवर्षाची चिखलगाणी, मेट्रोच्या नियोजनशून्यतेमुळे रस्त्यांचे झालेले बेहाल, वाढत्या इमारती, मुंबईत येणारे लोकांचे लोंढे, प्लास्टिकमुळे तुंबणारी गटारे, प्रदूषण अशा अनेक बाबी या जलसंकटाच्या मुळाशी आहेत. मुंबईकर त्यावर मात्र मूक राहतो. दशकात एकदा येणाऱ्या या आपत्तीत आपली पाठ थोपटून घेतो. या आपत्ती व्यवस्थापनावर कोणी मुद्देसूद बोलत नाही. लोकांमध्ये आलेले हुरूपाचे कवित्वही आपत्तीपुरतेच दिसून येते. मुंबईकर पुन्हा लोकलमध्ये पत्ते खेळण्यात मग्न होतो अन् राजकारणी मुंबईला पिसत राहतात. मीडियाचं या काळातलं वागणं उथळ, बालिश व खुळचटपणाचं ठरलंय. 

नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती असो, आपल्या वाहिन्यांचे वर्तन टीआरपीप्रवण बेताल असते. आलेले संकट हे आपल्याला दर्शकांची संख्या वाढवून घेण्यासाठीची पर्वणी आहे, असाच होरा असतो. मुंबईवरील दहशतवाद्यांचा हल्ला आपल्या वाहिन्यांनी कसा कव्हर केला होता हे आठवून पाहिले की हसावे की रडावे, हे कळत नाही. काश्मीरमध्ये होणारे अतिरेक्यांचे हल्ले व त्याला प्रत्त्युत्तर देणाऱ्या जवानांमधील चकमकीचे तोकड्या चित्रणाची तीच प्रत दाखवण्याची घाई. हे सगळं करताना ‘सबसे पहले हम’चा धोशा त्यांच्या या नादानीमुळे शत्रूला आपोआप टिप्स मिळतात. आपत्तीकाळात लोकांना बुद्धिभ्रष्ट झाल्यागत प्रश्न विचारले जातात. २६ जूनच्या पुराच्या वेळेसदेखील हाच प्रकार होता. रेल्वे अपघात झाल्यावर टिकरमध्ये हेल्पलाइन नंबर्स फ्लॅश केले की आपलं काम झालं, असं यांचं वर्तन असतं. शेजारी देशांच्या सीमेशी तणावस्थिती झाली की लष्करापेक्षा वाहिन्यांना लढाईची खुमखुमी जास्त येते. रामरहीमच्या घटनेनंतर मीडियाचा चेव पुन्हा दिसला. त्यावर अनेक बाइट्स अवर्स घालवले. वास्तवात बाबाबुवा म्हणजे भरकटलेली माध्यमे आणि सत्तातुर राजकारणी यांची संयुक्त देण आहे. तत्सम साधूबाबांच्या निवासात जाऊन स्टिंग करावे, असे यांना कधीच वाटलं नाही. कोणतीही आपत्ती यांना इष्टापत्ती वाटते. परवाच्या पावसाच्या संकटावरील याचं कव्हरेज आपला मीडिया अजून बाल्यावस्थेतच अडकल्याची ग्वाही देतो.  

मुंबईत अतिवृष्टी झाल्याच्या एक दिवस आधी अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ‘हार्वे’ हे भीषण चक्रीवादळ धडकले, त्यात अभूतपूर्व हानी झाली. लेख लिहिताना मृतांचा आकडा बत्तीसवर गेला होता. अमेरिकेच्या इतिहासातील विध्वंसक वादळांत याची नोंद होईल इतकी हानी याने पाहिल्यास आपल्या वाहिन्यांची लाज वाटावी, अशी स्थिती आहे. ‘अमेरिका बुडाली’ अशा अर्थाच्या भंपक हेडलाइन्स तिकडे कुणी चालवल्या नाहीत. वादळातून कशीबशी सुटका झालेल्या लोकांना तिथल्या चॅनेलपर्सननी ‘या दुरवस्थेसाठी डेमोक्रॅट दोषी की रिपब्लिकन दोषी?’ असला बाळबोध सवाल केला नाही. आपत्तीकालीन शेल्टर, लोकेशन्स, वादळाची स्थिती, अॅक्टिव्ह अलर्ट््स, मदत मोहिमेचे स्पॉट्स यांची सातत्याने माहिती दिली जात होती. वाचलेल्या लोकांना हळुवार पद्धतीने बोलकं केलं जात होतं. विमानसेवेतील बदलांपासून ते आणखी काही तास पाऊस पडल्यास सखल भागात पाण्याचा स्तर कुठवर जाऊ शकतो, याचे अंदाज सांगणारे ड्रॉइंग दाखवले जात होते. बाधित सेवांचं सुधारित शेड्यूल प्रसारित केलं जात होतं. पाऊस ओसरल्यावर मदत यंत्रणा काय काम करणार आहे याचे विवरण सतत दाखवले जात होते. पूरकाळात लोकांनी घ्यायच्या दक्षता वारंवार डिस्प्ले होत होत्या. वाचलेल्या लोकांना नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देत होते.  त्या उलट २९ ऑगस्टच्या घटनेत आपल्या बहुतांश मीडियाचं वर्तन काय खेदजनकच. आपल्याला याचीही सवय झालीय. 

छातीइतक्या पाण्यातून चालणाऱ्या व्यक्तींना आपल्या वाहिन्यांचे प्रतिनिधी अत्यंत भोंगळ प्रश्न विचारत होते. मुंबईच्या कोणत्या भागात किती पाणी साचले आहे याचा वा अख्ख्या मुंबईचा टेक्नोसॅव्ही मॅप दाखवला नाही. रेल्वेगाड्यांच्या स्थितीचे थ्रीडी ड्रॉइंग सादर केले नाही. विमान वाहतुकीतील विस्कळीत झालेले फ्लाइट क्रमांक दाखवले गेले नाहीत. सोशल मीडियावर लोकांनी आवाहन म्हणून दिलेले पत्ते वाहिन्यांच्या स्क्रीनवर दिसले नाहीत. येणाऱ्या काळात अदमासे आणखी जास्ती पाऊस पडला तर आणखी कोणते भाग जलमय होऊ शकतात याचे तंत्रशुद्ध सादरीकरणदेखील केले गेले नाही. लोकांची ने-आण करणारी कोणती मोठी वाहने कोणत्या रस्त्यावरून धावत आहेत, जीपीएस वापरून महत्त्वाच्या वाहनांचे क्रमांक दिले गेले नाहीत. पाणी तुंबण्याच्या दुर्घटनेस प्लास्टिक किती मोठ्या जबाबदार आहे आणि त्या बाबतीत मुंबईकर किती उदासीन आहे यावरही प्रकाश टाकला नाही. एरवी गाय, गोमांस यावरून माणसांचा जीव घेणारे लोक उकिरड्यावर पडलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर सोयीस्कर मौन पत्करतात. ज्या प्लास्टिकमुळे गायीच नव्हे, तर अशा पद्धतीने माणसेही उद्ध्वस्त होतात. पावसानंतर येणारे संसर्गजन्य आजार जसे की लेप्टोस्पायरोसिस, रोगराई यावरही भाष्य केलं नाही. आपल्या वाहिन्या एक तर निर्भर्त्सना करत होत्या वा अकारण ओव्हरसेंटमेंटल झाल्याचा आव आणत होत्या. सरकार आणि प्रशासनास धारेवर धरण्यासाठी वाहिन्यांच्या प्रतिनिधीकडे त्या विषयाचे सखोल ज्ञान असणं क्रमप्राप्त आहे, पण त्याही पातळीवर आनंदी आनंद आहे. तरीही आपला मीडिया सुधारत नाही, या आपत्ती दिनांचा इव्हेंट करून त्यावर आपल्या टीआरपीची होळी ते खेळत बसतात. आपल्या मीडियाला आपत्तीकाळातलं शहाणपण कधी येणार हे एखादा टीआरपीवाला बाबाबुवाच सांगू शकेल, कारण सध्या देशात त्यांनाच अच्छे दिन आलेले आहेत....

- समीर गायकवाड
sameerbapu@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...