आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुहांचा फॉर्म्युला यशस्वी होईल का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी जनतेचा भ्रमनिरास केलाय म्हणून विरोधी पक्षांनी एक व्हावं. मोदींच्या तोडीस तोड नेता असलेल्या नितीशकुमारांनी विरोधकांचं नेतृत्व करावं, असा या गुहा फॉर्म्युल्याचा सारांश आहे. 

डॉ. रामचंद्र गुहा, डॉ. अमर्त्य सेन, गोपाळकृष्ण गांधी ही विचारवंत मंडळी केवळ विचारवंत नाहीत तर भारतातल्या विचारी वर्गाचे प्रतिनिधी मानले जातात. त्यांनी मांडलेल्या कल्पना, विचार, फॉर्म्युले यांची नोंद जगभर घेतली जाते. यापैकी गुहा हे इतिहासकार आहेत. त्यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाला दहा वर्षे झाली. त्यानिमित्ताने त्यांची एका इंग्रजी न्यूज चॅनलने मुलाखत घेतली. या मुलाखतीत गुहा यांनी भारतीय राजकारणाचं विविध अंगांनी विश्लेषण केलं. 

या विश्लेषणात गुहा यांनी एक फॉर्म्युला मांडला. त्यात त्यांनी म्हटलं की, काँग्रेस हा नेता नसलेला पक्ष आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय देऊ शकणारा नेता म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे योग्य असले तरी ते पक्ष नसलेले नेते आहेत. म्हणून काँग्रेसने नितीशकुमारांना पक्षाचा अध्यक्ष करावं. राहुल गांधी यांनी राजकारण सोडून इतर काहीही उद्योग करावा. ते त्यांच्या स्वत:च्या, काँग्रेसच्या आणि देशाच्याही हिताचं ठरेल. तरच काँग्रेस वाचेल, अन्यथा मरेल. 

गुहांचा हा फॉर्म्युला म्हणजे एक भन्नाट राजकीय कल्पना आहे. ती आदर्शवादी आहे. हा फॉर्म्युला कितपत यशस्वी होईल? हा जर तरचा विषय असला तरी त्या फॉर्म्युल्यातून सध्याच्या भारतीय राजकारणाचा गुंता, कमजोरी, मजबुरी, गरज त्यांनी अधोरेखित केलीय. हा गुंता सोडवण्याची दिशा त्यांनी त्यात स्पष्ट केलीय. स्वत: गुहा यांनीच म्हटलंय की, हा विचार, कल्पना लोकांना आदर्शवादी वाटेल; पण खराखुरा लोकशाहीवादी म्हणून मला ती मांडणं भाग आहे. ती काळाची गरज आहे. 

या मुलाखतीत गुहा यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. मोदी हे सध्या देशातले सर्वात समर्पित राजकीय नेते आहेत. त्यांच्याकडे रात्रंदिन काम करण्याची असीम ऊर्जा आहे. राजकारणाशी त्यांच्या बांधिलकीला तोड नाही किंवा ती अतुलनीय म्हणता येईल. या गुणांच्या बळावर त्यांनी भारतीय जनता पक्षात सर्वोच्च स्थान पटकावलं. देशाची सत्ता मिळवली. पक्षात आणि सत्तेत ते वरचढ ठरले. मात्र मोदींच्या या गुणांना बाधा आणणारे घटकही दाखवायला गुहा विसरले नाहीत. गुहा म्हणतात, एवढे सगळे गुण असलेल्या मोदींनी त्यांना मतं देणाऱ्यांचा भ्रमनिरास केलाय. हा भ्रमनिरास मोदी कट्टर हिंदुत्ववाद्यांपासून दूर राहतील किंवा आर्थिक सुधारणा घडवून आणतील या विश्वासाला तडा गेल्याने झाला आहे. मोदींनी जनतेचा भ्रमनिरास केलाय म्हणून विरोधी पक्षांनी एक व्हावं. मोदींच्या तोडीस तोड नेता असलेल्या नितीशकुमारांनी विरोधकांचं नेतृत्व करावं, असा या गुहा फॉर्म्युल्याचा सारांश आहे. 

नितीशच का? तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. स्वच्छ, पारदर्शक कारभार करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. घराणेशाहीचा त्यांच्या नेतृत्त्वाला डाग नाही. गेली दहा वर्षे ते बिहारमध्ये सत्तेवर आहेत. त्यांच्या काळात तिथं एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. बिहारमध्ये महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३५ टक्के आरक्षण आहे. त्यांनी विद्यार्थिनींना सायकली दिल्या. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाली. सायकल हे मुलींसाठी मुक्तीचं प्रतीक बनलं. 

नितीशकुमारांचा बिहारमधील दारूबंदीचा प्रयोग उल्लेखनीय ठरला. त्यामुळे महिलांमध्ये खुशी आली. घराघरामध्ये तंटे, झगडे कमी झाले. दारूमध्ये पैसे उडवणारा नवरा त्या पैशाची भाजी, दूध घरी घेऊन येतो, त्यातून घरात समाधान-सुख आलं. बिहार प्रगतीच्या दिशेनं झेपावतोय. बिहारींचं इतर राज्यात होणारं स्थलांतर थांबलंय. हे नितीश यांच्या सुशासनाचे परिणाम दिसू लागले आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे देश नव्या आशेनं पाहू लागलाय. गुहांसारखा विचारवंत त्यामुळे देशाचा भावी पंतप्रधान म्हणून नितीशकुमारांकडे बोट दाखवू लागला आहे. 

मोदींसारखा तगडा नेता, भाजपचं मजबूत पक्ष संघटन आणि देशात मोदींची सत्तेवरची प्रभावी पकड याला तोंड देण्यासाठी तेवढीच तयारी लागेल. मोदींच्या तोडीचा नेता नितीशकुमारांच्या रूपाने विरोधकांकडे आहे; पण त्या नेत्याचा पक्ष एका राज्यात मर्यादित आहे. मग नेत्यामागे लागणाऱ्या संघटनेची उणीव काँग्रेस पक्षाने भरून काढावी. तसाही काँग्रेस पक्ष नेत्याशिवाय आहे. देशाला आपला वाटेल असा नेता आज काँग्रेसकडे नाही. सोनिया गांधी आजारी आहेत. मनमोहन सिंग यांची इनिंग खेळून आऊट झालेल्या खेळाडूसारखी आहे. ते आता काँग्रेसला मार्गदर्शन करण्याशिवाय काहीही उपयोगाचे नाहीत. राहुल गांधींमध्ये नेतृत्वाचे गुण नाहीत. लोक त्यांना स्वीकारत नाहीत. प्रियंका गांधी यांना राजकारणात येऊन लोकांचा विश्वास मिळवावा लागेल. तो वेळखाऊ आणि जर तरचा प्रकार आहे. राजकारण हे गतिमान असतं. तिथं थांबायला, वाट पाहायला जागा नाही. पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंग या नेत्यांना काँग्रेसमध्येच मान्यता नाही. देशाने नेतृत्व स्वीकारण्याची गोष्ट खूप दूर. तेव्हा काँग्रेस संघटनेला आता जिवंत राहायला नितीशकुमारांसारख्या नेत्याची गरज आहे. 

काँग्रेसने गांधी घराण्याच्या प्रेमापोटी इतर बदल स्वीकारले नाहीत. नेतृत्व बदल केला नाही तर काँग्रेसलाच पर्यायी नवा पक्ष उदयाला येईल, असं भाकीतही गुहा यांनी केलंय. तसंही काँग्रेसची गरज संपलेली आहे. आणि काँग्रेसचं नेतृत्व असंच आळशी, निष्क्रिय आणि चालढकल नेत्यांच्या हातात राहिलं तर लोक नवा पक्ष उदयाला आणतील. इंदिरा गांधी यांच्या एकछत्री बलदंड सत्तेला पर्याय देण्यासाठी आणीबाणीच्या काळात लोकांतून जनता पक्ष उदयाला आला होता. हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे. इंदिरा विरोधक तेव्हा विखुरलेले होते. पण जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही वाचवण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पाहता पाहता देशव्यापी बनलं. त्या आंदोलनाच्या रेट्यातून बंडखोर काँग्रेसवाले, समाजवादी, जनसंघी अशा परस्परविरोधी विचारांच्या संघटना जनता पक्षात विलीन झाल्या होत्या. 

इंदिराविरोधाचा अजेंडा असणारे जनतावादी नेते लोकांनी सत्तेवर आणले होते. विरोधी पक्ष एक झाले तर लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. सत्ताबदल होतो. हा विश्वास या सत्तांतरातून आला होता. भारतातल्या लोकशाही व्यवस्थेचं सौंदर्य म्हणून या इतिहासाकडे पाहता येतं. 

तो इतिहास समोर आहे म्हणूनच गुहा मोदी विरोधकांच्या ऐक्याची भन्नाट कल्पना मांडताना दिसतात. त्यात नितीश यांची जमेची बाजू अशी की त्यांचा पक्ष बिहारपुरता मर्यादित असला तरी त्यांचा उदय ज्या जनता दल परिवारातून झालाय त्या परिवाराची एकजूट झाली तरी ते शंभर खासदार निवडून आणू शकतात. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, कर्नाटकचे एच. डी. देवेगौडा, उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव, अजित सिंग, हरयाणाचे चौटाला बंधू, लालूप्रसाद यांचे पक्ष या जनता परिवाराचेच घटक आहेत. या सर्वांशी नितीशकुमारांचा संवाद आहेच. 

गुहा यांनी मांडलेला नितीशकुमारांच्या नेतृत्वाचा फॉर्म्युला काँग्रेस व इतर विरोधी पक्षांतले घटक किती गांभीर्याने घेतात, जनता दल परिवार नितीशकुमारांमागे किती एकजुटीने उभा राहील, मोदींबद्दल लोकांचा भ्रमनिरास कितपत वाढेल, या मुद्द्यांभोवती यापुढे भारताचं राजकारण घोटाळत राहताना आपल्या दिसेल, हे यानिमित्ताने नक्की म्हणता येईल. 
 
- राजा कांदळकर संपादक, लोकमुद्रा 
rajak2008@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...