आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वत्रिक गळचेपी! (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीताचा तिटकारा असणारे राज्यकर्ते इतिहासात हाेते. गायन-वादन, शेरोशायरी, हास्यविनोदात अजिबात रस नसणारेदेखील हाेते. याबद्दलच्या अनेक कथा आहेत. पण आजच्या स्वतंत्र भारतात काय सुरू आहे, हे काही समजत नाही. उपहास, विनोद, टोमण्यांची खुमारी अनुभवण्यासाठी एक बौद्धिक पातळी असावी लागते. तिचा एवढा दुष्काळ का पडावा या कलासक्त, साहित्यप्रेमी देशात? आपली ती अभिव्यक्ती आणि दुसऱ्याची ती चिखलफेक असा तोरा मिरवण्याची खोड सर्रास का जोपासली जात आहे? क्षुल्लक कारणानेही भावना दुखावत आहेत. रेडिओ जॉकी मलिष्का मेंडोसा मुंबईतल्या अमाप खड्ड्यांवर विडंबन गीत रचते. यात संतापण्यासारखे, आक्षेपार्ह आहे काय? मलिष्काचा आविर्भाव, तिने वापरलेले शब्द यात खटकण्यासारखे काही नाही. 

मुंबईकरांच्याच काय, राज्यातल्या सर्वच नागरिकांची भावना तिच्या विडंबनातून व्यक्त झाली आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते,’ हा दरवर्षीच्या पावसाळ्यातला सनातन प्रश्न आहे. त्यामुळेच मलिष्काचे विडंबन लोकांना पटले आणि त्याला सामाजिक माध्यमांमधून लाखोंच्या संख्येने ‘लाइक्स’ मिळत आहेत. एरवी अतोनात भ्रष्टाचार सुरू आहे. नागरी हिताची कामे तुंबली आहेत. सरकारी कार्यालयांमधून सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरू आहे. याकडे कोडग्या सहनशीलतेने सोईस्कर डोळेझाक करणारे राजकारणी मलिष्काच्या गाण्यामुळे मात्र अस्वस्थ झाले. लगोलग मुंबईतल्या एक नगरसेविकेने यमके जुळवून मलिष्काला धमकी देणारे गाणे रचले. त्याच मुंबई महापालिकेच्या कर्तव्यदक्ष (?) अधिकाऱ्यांनी मलिष्काच्या घरातून डेंग्यूच्या अळ्या शोधून काढल्या आणि तिला नोटीस बजावण्याची तत्परताही दाखवली. 

उबग, निराशा, संताप, पश्चात्तापाचे हसू यापैकी कसे व्यक्त व्हावे यावर? गेल्या अडीच दशकांपासून मुंबई शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे जन्मदाते बाळासाहेब ठाकरे स्वतः जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार होते. ते शब्दांऐजी चित्रांच्या माध्यमातून समाजातल्या व्यंगावर बोट ठेवायचे. त्याच कलाकार ठाकरेंच्या पक्षाला मलिष्काची अदाकारी खुपावी यासारखी करंटी बाब दुसरी नाही. मलिष्कामुळे मुंबईची बदनामी झाल्याचा कांगावा करणाऱ्या शिवसैनिकांबद्दल न बोललेलेच बरे. कारण, ‘मुंबईत पाऊसच खूप पडतो. त्याला आम्ही काय करणार’, असा पोरकट हताशपणा त्यांचे पक्षप्रमुखच व्यक्त करतात. जणू मुंबईइतका पाऊस जगात कुठे पडतच नाही. प्रत्यक्षात हा हताशपणा नसून हा सराईत बनेलपणा आहे. दरवर्षी नवे रस्ते म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण हे त्यामागचे खरे कारण. 

‘मलिष्का’प्रकरणी शिवसेनेला कोंडीत पकडू पाहणारी भाजपची नौटंकी तितकीच खोटी. भाजपचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यप्रेम अमर्त्य सेन यांच्या माहितीपटावरून देशाला दिसलेच अाहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणाऱ्या चंद्रकात पाटलांनी गेल्यावर्षी ‘खड्डा दाखवा, हजार रुपये मिळवा,’ अशी घोषणा केली होती. समस्त भाजपवाल्यांनी राज्याच्या रस्त्यांवरून हाडे खिळखिळी न होऊ देता प्रवास करून दाखवावाच. जनताच त्यांना दहा हजार देईल.   

एकूणच लोकशाही पद्धतीवर फारसा विश्वास नसलेल्या शिवसेनेचा गोंधळ एक वेळ समजून घेण्यासारखा आहे. सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला काय म्हणावे? इंदिरा गांधींच्या चरित्रावर बेतलेला मधुर भांडारकरांचा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. तो प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला डब्यात घालण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आतुर झाल्याचे दिसते. का, तर म्हणे यात इंदिरा गांधींची बदनामी आहे. ‘बॉम्बे’, ‘सरकार’ हे चित्रपट आधी बाळासाहेब ठाकरेंना दाखवून, त्यांच्या परवानगीने प्रदर्शित झाले होते. त्या वेळी ठाकरे यांना काँग्रेसने ‘हुकूमशहा’ ठरवले. तीच काँग्रेस अाता ठाकरेंचे अनुकरण करताना दिसते. सत्ताधारी भाजप हा तर बोलूनचालून पारंपरिक स्वयंघोषित संस्कृती रक्षक. बाजीराव-मस्तानीच्या कथेवरील चित्रपटावेळी त्यांनी घातलेला गोंधळ ताजा आहे. 

महात्मा गांधींच्या विचारांशी दुरान्वयानेही संबंध नसलेली ‘राष्ट्रवादी’ शरद पोंक्षेंच्या ‘नथुराम’मागे हात धुऊन लागते. त्याच पक्षाचे शरद पवार ‘घाशीराम कोतवाल’साठी मात्र जिवाचे रान करतात. याच ‘राष्ट्रवादी’कडे राज्याचे गृहमंत्रिपद असतानाही महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाध्यक्षांना झुंडशाहीच्या बळावर पळवून लावले जाते. एकूणातच काय तर सर्वच राजकीय पक्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कडवे विरोधक आहेत. सोईचे असते तेव्हा अभिव्यक्तीच्या नावाने गळे काढायचे. न पटणाऱ्या अभिव्यक्तीची सर्वतोपरी मुस्कटदाबी करायची. भारतात रुजू लागलेली ही सार्वत्रिक राजकीय वृत्ती सुसंस्कृत, विचारी समाजासाठी घातक आहेत. समाजहितैषी अभिव्यक्तीच्या पाठीशी राहणाऱ्या सुजाणांची संख्या नुसती वाढवून चालणार नाही, तर त्याचा दबावगट बनवावा लागेल. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जपण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...