आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’ सुसाट !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाला शिवसेनेकडूनच हातभार लागला म्हटल्यावर आता हा महामार्ग सुसाट वेगाने पूर्ण होण्याची लक्षणं दिसू लागली आहेत. जालना मुक्कामी महामार्ग थांबवणारच, अशी डरकाळी फोडणाऱ्या उद्धव साहेबांच्या सैनिकाने मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कर्मभूमीतच करारपत्रावर स्वाक्षरी करण्याची महत्त्वपूर्ण मोहीम फत्ते केल्याने कोणी कोणाला कसारा घाट दाखविला यावर आता वाच्यता करण्यात काहीच मतलब उरलेला नाही. एक मात्र खरे की, समृद्धीच्या मार्गात विविधांगी काटे पेरून त्यात अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधकांच्या छुप्या कारवायांना कधी गनिमी काव्याने साथ देऊन वा शक्य असेल तेथे उघड उघड विरोध दाखवित शिवसेनेच्या मुखंडांनी मुंबई-नागपूरमधील दुरावा कसा अधिकाधिक वाढेल यासाठी जंगजंग पछाडले. जमेल तेथे वा शक्य होईल तेव्हा मार्गात अडथळा आणणाऱ्या विरोधकांच्या सुरात सूर मिसळत महामार्गाच्या विरोधाचा सूरदेखील आतापर्यंत आळवत ठेवला. त्यामुळे असे वातावरण निर्माण झाले की, आता समृद्धीचे काही एक खरे नाही. हा प्रकल्पदेखील वादाच्या गर्तेत अडकून युतीचा कार्यकाळ संपुष्टात आला तरी पूर्णत्वास जाऊच शकणार नाही. मुख्यमंत्र्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहते की काय, असे एकूण चित्र होते. असो, पण ते एकदाचे बदलले आहे वा बदलू पाहत आहे, असाच याचा अन्वयार्थ काढता येऊ शकेल. 

केंद्रापाठोपाठ राज्यात अन् लागलीच स्थानिक स्वराज्य संस्था असो की, गल्लीबोळातील छोट्या-मोठ्या निवडणुका या सर्वच स्तरावर बदलाचे वारे वाहू लागले. फक्त महाराष्ट्राचा विचार करता काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा राज्याच्या सत्तेवरील मुक्काम हा देखील दशकभराहून अधिक असाच झालेला होता. त्यांचीही गणना प्रस्थापितांमध्ये होऊ लागली होती. सत्ताधाऱ्यांच्या तोंडी मुतण्याची भाषा येऊ लागल्यावर बदलाचे वारे येथेही जोरकसपणे वाहू लागणार, असे दिसत होते. त्यानुसार बदल झाला खरा, पण तो सर्वांच्या पचनी पडेलच, असे काही झाले नाही. 
 
कोपर्डी घटनेतील निर्भयेला न्याय देण्याच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा एकवटला, पाठोपाठ शेतकरी संपावर निघाले, कर्जमाफी की कर्जमुक्ती असा वाद सुरू झाला, असे करून एक एक मुद्दा बाहेर येऊ लागला अन् रान पेटू लागले. समृद्धी महामार्गाविरोधातील आंदोलनाने तर थेट प्रकल्पग्रस्त गावात शेतकऱ्यांचे सरणच रचण्याची रणनीती आखली. आजवर झालेल्या जवळपास सर्व आंदोलनाची भूमिका व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेतेमंडळींचे चेहरे जगजाहीर होते. किमानपक्षी परिचित होते. किंबहुना या पार्श्वभूमीमुळेच त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनाला जनाधार मिळत होता. अलीकडच्या आंदोलनांमध्ये हाच कळीचा मुद्दा आहे. मराठा क्रांती मोर्चा असो की बहुजनांचा क्रांती मोर्चा, शेतकरी आंदोलन असो की शेतकरी संपावर जाण्याचे आंदोलन असो यांचे नेतृत्व नेमके कोण करीत होते, त्यांच्यात नेमके कोणत्या मुद्द्यावर मतैक्य होते, असा किमान एक तरी मुद्दा वा विषय स्पष्टपणे दिसलेला नाही.  ही आंदोलनं मग अल्पायुषी ठरली. 

शेतकरी आंदोलनाशी संबंधित सुकाणू समितीच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री महोदय जातीने कोकण किनाऱ्यावर जाऊन आले म्हटल्यावर संभाव्य सर्वच प्रश्न मग हळूहळू मागे पडतात. आंदोलनं ही एक तर सरकारविरोधात किंवा आक्रोश हा प्रस्थापितांच्या विरोधातच व्यक्त होत असतो, असा आजवरचा इतिहास आहे. शेतकरी आंदोलन असो की समृद्धी महामार्ग या निमित्ताने अलीकडच्या काळात उभ्या राहिलेल्या आंदोलनांमुळे बऱ्याच काळापासून अडगळीत गेलेल्या पक्ष-संघटनांच्या नेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. अशा बव्हंशी मंडळींच्या हाती आंदोलनाची धुरा असल्यामुळे पुढे त्या आंदोलनाचे काय होईल याची श्वाश्वती देखील कोणीच देऊ शकणार नाही. 

एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष असो की किसान सभा ही राज्यातील चळवळींचे नेतृत्व करीत. वैचारिक भूमिका घेऊन त्यासाठी पूर्ण शक्तिनिशी लढा देत अशी त्यांची ख्याती होती. कालौघात या पक्षांची स्थिती यथातथा झाली. नर्मदा आंदोलनाची चळवळ तर केव्हाच क्षीण झाल्यागत आहे. अन्य असंख्य संघटना वा पक्षांची तर चर्चाही करणे कालसुसंगत ठरणार नाही. कुठे तरी एखादा शे-पाचशेचा मोर्चा, उपोषण, निवेदने देणे या पलीकडे यांचे काम उरलेले नाही, परंतु शेतकरी आंदोलन असो की समृद्धी महामार्गाविरोधात उभा राहणारा लढा याचे नेतृत्व करण्याची एकही संधी अडगळीतील मंडळींकरवी सोडली जात नाही. त्यांच्या या संधीचे सोने करण्याच्या युक्तीमुळे अजूनही काही ठिकाणी आंदोलनांची धग टिकून असताना शिवसेनेचा मावळलेला विरोध ‘समृद्धी’ला हातभार लावणारा ठरावा. 
- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...