आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात शेअर बाजार गुंतवणुकीला बहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय शेअर बाजार परकीय गुंतवणूकदारांच्या तालावर नाचतो, असे म्हटले जाते. पण अगदी अलीकडे म्युच्युअल फंडाच्या मार्गाने भारतीय नागरिक शेअर बाजारातील गुंतवणुकीची फळे चाखू लागल्याने देशी गुंतवणूकदार शेअर बाजाराचे तारू आपल्या ताब्यात घेऊ शकतात, अशी शुभचिन्हे दिसू लागली आहेत. 

अनेक व्यवहारांसाठी आधार कार्डची सक्ती केली जात असल्याने आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येते, अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि हा वाद न्यायालयातही गेला आहे. पण व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि गुगलच्या या जमान्यात खरोखरच असे काही वैयक्तिक स्वातंत्र्य अत्याधुनिक जगात राहू शकते काय, यावरही चर्चा होत राहील. पण अगदी अलीकडे गुगलवर शोधाच्या निरीक्षणाने समाज कसा बदलतो आहे, त्याच्या सवयी कशा बदलत आहेत आणि तो भविष्य कशात पाहतो आहे, हे जाणून घेतले जात आहे. 

अशा या गुगलवर आता ‘एसआयपी’, ‘मल्टिबॅगर्स’, ‘म्युच्युअल फंड’ ‘निफ्टी’ याचा शोध भारतात १०० टक्क्यांनी वाढला आहे. याचा अर्थ जो समाज शेअर बाजाराला फक्त सट्टाबाजारच समजत होता, त्याला शेअर बाजार जाणून घेण्याची इच्छा होते आहे. या नव्या माहितीत नवी गोष्ट अशी आहे की, आतापर्यंत मेट्रो म्हणजे महानगरांपुरताच मर्यादित असलेला हा विषय भारतातील छोट्या शहरांचा विषय होऊ घातला आहे. पैशांचे महत्त्व वाढल्याने काही शहरी व्यवहारचतुर लोक काम न करता इतका पैसा कमावतात तरी कसे, असे कुतूहल ग्रामीण भागात निर्माण झालेच आहे आणि पैसे म्हणजे सर्वस्व नसले तरी पैशांशिवाय पान हलत नाही, हेही आता सर्वमान्य झाले आहे. त्यामुळे झारखंड, दादरा-नगरहवेली, सिक्कीम, दमण आणि दिव, हरियाणा, छत्तीसगड, कर्नाटक आणि गोवा या भागांतही शेअर बाजाराच्या गुंतवणुकीला महत्त्व येऊ लागले आहे, असा हा गुगल ट्रेंड सांगतो. 

अशा ग्रामीण आणि निमशहरी भागातून म्युच्युअल फंडांत होणारी गुंतवणूक या वर्षी जूनअखेर ३.५ लाख कोटी रुपयांवर (४६ टक्के वाढ) गेली असून दर महिन्याला या मार्गाने इक्विटी फंडांत येणारे ४,५०० कोटी रुपये हा त्याचा थेट पुरावा आहे.(गेल्या वर्षी ३, ५०० कोटी) म्युच्युअल फंड असोसिएशनच्या माहितीनुसार प्रमुख १५ शहरांना वगळून मध्यम शहरांचा वाटा जून २०१६ अखेर २.४२ लाख कोटी रु. वरून जून २०१७ म्हणजे एका वर्षात ३.५४ लाख कोटी रुपये इतका वाढला आहे. तर फोलिओची संख्या एका वर्षात ९३ लाखांवरून विक्रमी ५.८२ कोटी एवढी झाली आहे. याचा चांगला परिणाम म्हणजे अशा उत्पादक गुंतवणुकीला भारतात आलेले चांगले दिवस. 

म्युच्युअल फंडच्या असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, २०१६-१७ या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडाच्या मार्गाने बाजारात ३.४३ ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक झाली. २०१५-१६ मध्ये ती १.३३ ट्रिलियन रुपयांची होती, म्हणजे तिच्यात तब्बल १५५ टक्के वाढ झाली आहे. भारतात म्युच्युअल फंडांद्वारे इतकी गुंतवणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याविषयीची जागरूकता वाढली असून त्यातही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे महिन्याला विशिष्ट रक्कम गुंतवण्याचा मार्ग गुंतवणूकदारप्रिय झाला आहे. एप्रिल २०१७ या महिन्यात या मार्गाने ४,२६९ कोटी रुपये आले. हेच प्रमाण २०१२मध्ये फक्त ९८० कोटी रुपये होते. शेअर बाजारात पैसे तर गुंतवायचे; पण फार जोखीम नको, ही भारतीय गुंतवणूकदारांची मानसिकता असून तिचा विचार करून म्युच्युअल फंड चालवणाऱ्या कंपन्यांनी नवनवे पर्याय गुंतवणूकदारांना दिले आहेत. शिवाय गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात मोठे चढउतार होऊनही अनेक म्युच्युअल फंडांनी १२ ते २० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.  

भारतीय शेअर बाजार हा नेहमीच परकीयांच्या गुंतवणुकीवर अवलंबून राहिला आहे. त्यामुळे परकीयांची चाल पाहूनच शेअर बाजाराची चाल काय राहील, याचे अंदाज आतापर्यंत केले जात होते. पण यात नजीकच्या काळात चांगलाच फरक पडणार असल्याची शुभचिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय गुंतवणूकदार हा नेहमीच सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व देणारा राहिला आहे. त्यामुळे बँकेत किंवा पोस्टात ठेव ठेवणे, हीच त्याची गुंतवणूक राहिली आहे. अर्ध्या रात्री मोडले तर पैसे मिळतात, म्हणून सोन्यासारख्या गुंतवणुकीचे त्याला आकर्षण आहे. पण अगदी अलीकडे म्हणजे नोटाबंदीनंतर भारतीय गुंतवणूकदारांच्या या सवयीत मोठा बदल दिसून येऊ लागला आहे. तो म्युच्युअल फंडांच्या मार्गाने शेअर बाजाराची चव चाखू लागला आहे. 

भारताचा जीडीपी गेल्या दशकात जगात चांगलाच दखलपात्र झाला आहे. पण याच काळात भारतीय करत असलेली बचत जीडीपीच्या २२ वरून १९ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. या काळात जमीन, सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत चालली होती. पण नोटाबंदीनंतर हा ट्रेंड बदलू लागला आहे. ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०१७ या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून तब्बल ३९,९७९ कोटी रुपये काढून घेतले. एवढी मोठी रक्कम शेअर बाजारातून काढली गेली तर बाजार कोसळतो, असा इतिहास आहे. पण त्या चार महिन्यांत बाजार फक्त एक टक्का खाली गेला होता. त्याचे कारण याच काळात भारतीय गुंतवणूकदारांनी तेवढ्याच म्हणजे ३९, ८२३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे. यात म्युच्युअल फंडांचा वाटा मोठा आहे, हा तो बदल होय. 
शेअर बाजारातील एकूण मूल्याच्या १० टक्के शेअर्स म्युच्युअल फंडांकडे तर ८ ते ९ टक्के शेअर्स देशातील मोठ्या गुंतवणूकदार संस्थांकडे आल्यामुळे परकीय गुंतवणूकदारांचे वर्चस्व कमी होण्यास मदत झाली आहे. एसआयपीच्या मार्गाने गुंतवणूक वाढल्याने दर महिन्याला तेवढ्या रकमेचे शेअर घेतले जात असल्याने बाजार पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 

शेअर बाजार आणि त्याच्याशी संबंधित गुंतवणुकीत फिरणारा पैसा हा जगाच्या चिंतेचा विषय झाला आहे, त्याचे कारण अमेरिकेसारख्या देशांत त्याचा अतिरेक झाला आहे. भारतासारख्या देशाला इतक्यात ही चिंता करण्याची गरज नाही. कारण भारतीय गुंतवणूकदारांना अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. एकूण गुंतवणुकीत म्युच्युअल फंडाचा वाटा केवळ २ टक्के आहे (मार्च २०१६) तर बँकेच्या ठेवींचे प्रमाण तब्बल ४४ टक्के तर भविष्य निर्वाह निधी आणि विम्यात गुंतवणुकीचे प्रमाण ३६ टक्के आहे. आता बँक ठेवीचे व्याजदर कमी होत असल्याने त्यात बदल होणे अपरिहार्य आहे. याचा अर्थ शेअर बाजार आणि तेही म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे क्षेत्र अजून किती विस्तारायचे आहे, हे यावरून लक्षात येते. एवढे कमी भारतीय गुंतवणूकदार असताना म्युच्युअल फंडाने बाजार सावरून धरला, याचा अर्थ खरोखरच भारतीय गुंतवणूकदार याच वेगाने या गुंतवणुकीकडे वळले तर भारतीय शेअर बाजाराला परकीय गुंतवणूकदारांच्या तालावर नाचण्याची अजिबात गरज पडणार नाही.
- यमाजी मालकर (पत्रकार व आर्थिक विश्लेषक) ymalkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...