आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामराम दोन हजार... सलाम सरकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आताची आपली दोन हजारांची नोट मात्र एकदम झोकात, वाजतगाजत चलनात आली. आपण मोठे जाणवण्यासाठी नोटबंदीच्या काळात तिने थोडी प्रतीक्षाही करायला लावली आणि बँकांतून व नंतर एटीएममधून मिळायला लागली. तेव्हा तिच्या नावीन्याचे व किमतीचे सर्वांना एवढे ‘अप्रूप’ वाटले की, अगदी प्रारंभी ती मिळाली की ‘ठेवून घेऊ आपल्याजवळ’ असे करावेसे वाटायचे. पण, ही नव्याची नवलाई संपताच या ‘दोन’ वालीने अनेकांना आर्थिक व्यवहारांत इंगा दाखवला.  

दोन हजारांची  नोट म्हटले की, एक मोठ्या आकाराच्या दिमाखदार मूल्यातील सध्याची सर्वात मोठी नोट आपल्या डोळ्यासमोर येते. खरे तर यापूर्वीच आपल्या चलनात दहा हजारांची नोट आली होती, पण ती चलनात येताना, असताना सामान्यांच्या हातात सहसा आली नाही व जातानाही ही सहजपणे फार गवगवा न करता चलनातून काढली गेली. पण, आताची आपली दोन हजारांची नोट मात्र एकदम झोकात, वाजत गाजत चलनात आली. आपण मोठे जाणवण्यासाठी नोटबंदीच्या काळात तिने थोडी प्रतीक्षाही करायला लावली आणि बँकांतून व नंतर एटीएममधून मिळायला लागली. तेव्हा तिच्या नावीन्याचे व किमतीचे सर्वांना एवढे ‘अप्रूप’ वाटले की, अगदी प्रारंभी ती मिळाली की ‘ठेवून घेऊ आपल्याजवळ’ असे करावेसे वाटायचे. पण, ही नव्याची नवलाई संपताच या ‘दोन’वालीने अनेकांना आर्थिक व्यवहारांत इंगा दाखवला. एक हजाराच्या दोन किंवा ५०० च्या चारएवढी मोठी किंमत असल्याचा दिमाख मिरवणाऱ्या या ‘दोन हजार’ भारीमुळे एक तर दोन हजारांवर खरेदी-विक्री-बिल करा, नाही तर सुटे नाहीत, ‘चला फुटा पुढे’ असे धारक मालकांना ऐकावे लागले. त्यात हिच्यामागे ‘आलेच हं’ म्हणत नवी ५०० ची नोट, थांबत, वाट पाहायला लावत आली. त्यामुळे काही काळ बाजारात १००, ५० च्या बरोबर २००० रुपयांच्या नोटेने आर्थिक व्यवहारांत वावरताना बऱ्याच वेळा, थांबा वाट पाहाचे अडथळे आणले. पण, अखेर दोन हजारांच्या नोटेने आपले मोठे स्थान मिळवले व रुळवले!  

प्रारंभी ही दोन हजारांची नोट घ्यावीच लागायची, असे झाले. नोटबंदीच्या काळात ही नोट प्रथम आली व ५००ची नंतर आली. काही काळ कमी प्रमाणात आली व मग आपल्याला १०० च्या काही व उर्वरित २ हजारांच्या नोटा बँकेतून घेऊन खर्च करताना अडचणी यायच्या खऱ्या, पण तरीही दोन हजारांची नोट किंवा नोटा देता-घेताना डोळे भरून पाहावीशी वाटायची व तिचे दिमाखदार मोठेपण हाताळताना ऊर भरून यायचा. त्यात ही नोट कशी वेगळी आहे, तिची प्रतिकृती करून ’बनावट’ नोटा छापणे कसे अवघड व अशक्य आहे याविषयी विशेष बोलले जायचे. आपल्याला खूप बरे व वेगळे वाटायचे. पण, या अपेक्षा सांगणे थोड्याच दिवसांत खोटे ठरले व चलनांत  २ हजारांच्या बनावट नोटा आल्या, येत आहेतच्या बातम्या आल्या व मग निर्धास्तपणा संपून याही नोटा ‘खऱ्या’ असल्याचे पाहण्याची जबाबदारी घेणाऱ्यांवर आली. पण, हळूहळू या नोटेच्या बनावट नोटा कमी कमी झाल्याचे वृत्त कानी येऊ लागल्याने आपल्याला बरे वाटायला लागले. तशी मग या दोन हजारांच्या नोटेने आपल्याला मोहात पाडायला सुरुवात केली. केवळ एका नोटेने दोन हजार संचयाची शक्ती असणाऱ्या या नोटा, आधी पाकिटात, खिशात, मग घरी कपाटात व काही पैसेवाल्यांच्या तिजोरीत किंवा बँक लॉकरमध्ये साचायला लागल्या, म्हणजे गंमत बघा, १००० व ५०० च्या नोटांमध्ये चलन साठे होतात, त्यातून मोठ्या रकमांचे नंबर दोनमध्ये देणे-घेणे होते म्हटले जायचे. पण, मागून आली, चलाखपणे चकवत पुढे गेली व जुनेच संचयकार्य करू लागली, ती ही दोन हजारांची नोट.  

बरं, एका बाजूने आपण डिजिटल आर्थिक व्यवहार वाढवत आहोत व नोटांचा वापर खाली आणण्याचे प्रयत्न करत आहोत, ती ही दोन हजारांची नोट, असू द्या मला घरी-दारी, व्यवहारांत व संचयात म्हणायला लागली. एक तर थोडे फार काय, बरेच काम तर करतेच, पण डोक्यावर बसते की काय असे वाटायला लावते किंवा अंगचोरपणा करत चलनात व बँकेत न फिरता, मालकांच्या मालकीत पडून साचत राहते, असे व्हायला लागले आहे.  

यावर उपाय म्हणून मग सरकारने व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या दोन हजारांच्या नोटेकडे नजर व नंतर मोर्चा वळवला. या दोन हजारांच्या नोटा, चलनातून कमी कमी होत असल्याचे दिसायला लागले. पाठोपाठ एटीएममधूनही दोन हजारांच्या नोटा मिळणे कमी झाले. त्यामागोमाग बँका दोन हजारांच्या नोटा लोकांना पेमेंटमध्ये देण्याचे कमी करत असल्याच्या बातम्या आल्या. हे होते, नाही तर आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारांच्या नोटा छापणे बंद केल्याच्या बातम्या आल्या व बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोन हजारांच्या नोटा देणे बंद करण्याच्या बातम्या आल्या. यानंतर मग मात्र या २००० रुपयांच्या नोटा सरकार बंद करणार असल्याच्या बातम्या आल्या. साहजिकच सामान्य माणसे घाबरलीच व त्याहीपेक्षा ज्यांनी दोन हजारांच्या नोटांचा साठा केलाय ते जास्त घाबरले. पण, माननीय खासदारांना उत्तर देताना मा. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट खुलासा केला की, दोन हजारांच्या नोटा रद्द करण्याचा कुठलाही विचार नाही! 

सध्या तरी यावर पडदा पडला, असे सामान्य माणसांना वाटले व त्यांचा जीव भांड्यात पडला. असामान्य व श्रीमंत ज्यांनी दोन हजारांच्या नोटा घरी कपाटात, तिजोरीत आणि कुठे साठवल्या आहेत/असतील त्यांचे जीव मात्र टांगणीला लागले आहेत. कारण सरकार कितीही म्हणत असले तरी एखाद्या दिवशी एकदम २००० रुपयांची नोट रद्द होण्याची शक्यता आहे, याची भीती त्यांना आहे. ही भीती तुमच्या-आमच्यासारख्यांना, सामान्यांना असण्याचे कारण नाही. कारण दोन हजारांची नोट रद्द झाली, तर आपल्या कष्टाच्या कमाईचे पैसे आपल्याला मिळतीलच, थोडा त्रास होईल, वेळ लागेल एवढेच. पण, तरीही आपण एक मुद्दा यातून समजावून घ्यावा, एक तर रोख रकमांचे व्यवहार खूप कमी करावेत. एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे व्यवहार बँकांमार्फत चेकने किंवा डिजिटल पेटीएमसारख्या ॲपने करावेत हे बरे. आपल्या हाती/ घरी/ पाकिटांत, ५ ते १० हजार फार तर व तेही छोट्या नोटांत ठेवावेत. एवढे करून दोन हजारांची नोट किंवा नोटा हाती आल्या किंवा घ्याव्या लागल्या तर त्या आपल्या बँक खात्यांत भराव्यात. असे केले की मग दोन हजाराची नोट राहिली काय आणि रद्द झाली काय, आपल्याला त्याचा त्रास व्हायचे कारण नाही! आपण वेळ आलीच तर दोन हजारांच्या नोटेला रामराम व सरकारला सलाम करायची तयारी ठेवावी हे उत्तम.
 
- अरुण कुकडे, अर्थ व बँकिंग तज्ज्ञ  
बातम्या आणखी आहेत...