आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वच्छ-क्रीडा’ अभियानाचा आदर्श : बोल्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोल्टचा एक पैलू चॅम्पियनला शोभेसा. सर्वोच्च म्हणजे ऑलिम्पिक वा जागतिक शर्यतीसाठी, आपली सर्वोत्तम कामगिरी राखून ठेवण्याचा. लंडन व रिओ ऑलिम्पिक आणि बीजिंग व मॉस्को जागतिक शर्यतीआधी थोडासा मंदावलेला बोल्ट, प्रमुख शर्यतीत बरोब्बर गतिमान झाला. 

पराभूत धावपटूचा जयघोष नायक म्हणून केला जात होता. पण विजेत्याची खलनायक अशीच हेटाळणी होत होती. दोन टोकांच्या या तीव्र प्रतिक्रियांत सँडविच होत होता, नायकाचा संभाव्य वारसदार. ज्या शर्यतींचं भक्तिभावानं निरीक्षण करता-करता लहानाचा मोठा झालेला अन् आपल्या हीरोला मागे ब्राँझ पदकावर ठेवणारा युवक! 

हे सारं नाट्य घडत होतं, अॅथलेटिक्सच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम स्प्रिंटर उसेन बोल्टच्या सांगता सोहळ्यातील १०० मीटर्स शर्यतीत. गेल्या दशकात १०० मीटर्स-२०० मीटर्स, अन् ४ X १०० रिले अशा सर्वात छोट्या पल्ल्याच्या शर्यतीतील उर्फ स्प्रिंट्समधील शहेनशहाची अफलातून कारकीर्द अस्ताला जात होती. गेल्या दशकात ऑलिम्पिकमधील सहा वैयक्तिक व दोन रिले जेतेपदे, त्यासह जागतिक अॅथलेटिक्स शर्यतीतील सात वैयक्तिक व किमान चार रिले अजिंक्यपदे. शनिवारच्या रिले शर्यतीत यश खेचून आणल्यास एकंदर २०, किंवा एरवीही १९ जागतिक सुवर्णपदकं! विशेष म्हणजे गेल्या तपात, डोपिंगच्या हजारो तपासणीत त्याच्या स्वच्छतेची ग्वाही. ‘स्वच्छ-क्रीडा’ अभियानाचा, धावता-बोलता आदर्श! 

दुनियेतील असंख्य शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या, छोट्या जमैकातील आपल्या लाडक्या धावपटूला मानवंदना देण्यास, लंडनच्या स्टेडियममधील ६० हजार रसिक उत्सुक होते. शर्यतीतील पहिल्या ३०-४० मीटर्समध्ये बोल्टनं आघाडी घेतली नव्हती. पण ते अनपेक्षित नव्हतं. कारण त्याची सुरुवात स्फोटक नसतेच, हे शौकीन जाणत होते, डोळ्यात जीव ओतून ते वाट बघत होते, शर्यतीच्या उत्तरार्धातील बोल्टच्या कमालीची. बोल्टचा हातखंडा, शेवटच्या ६० मीटर्समध्ये सुसाट धावण्याचा. पण या वेळी काही तरी विपरीत घडणार, अशी पाल चुकचुकायला लागली रसिकांच्या मनात. बोल्ट फारसा मागे फेकला जात नसला तरी आघाडीही घेत नव्हता. १०० मीटर्स शर्यत हा खेळ अवघ्या १० सेकंदांचा! डोळ्याची पाती लवतात न लवतात, तोच तिचा निकाल फलक दाखवू लागला. (१) जस्टीन गॅटीन, अमेरिका, ९.९२ सेकंद, (२) क्रिस्तिआन कोलमन, अमेरिका, ९.९४ सेकंद, मग बोल्ट कुठे? : (३) उसेन बोल्ट, जमैका, ९.९५ सेकंद, बोल्ट तिसरा? जागतिक शर्यतीत ब्राँझचा मानकरी? हा धक्का पचवण्यास प्रेक्षक तयार नव्हते. 

स्टेडियममध्ये एकच आवाज घुमत राहिला. ‘चीट-चीट’. खोटारडा-भामटा. गॅटलिनचा बोल्टवरील विजय मानण्यास प्रेक्षक तयारच नव्हते. याचं उघड कारण, उत्तेजकं घेण्याबाबत गॅटलीन दोनदा पकडला गेला होता. २००१ मध्ये त्यानं ‘अॅफेटॅमाइन’ घेतलं. एकाग्रता वाढवण्यासाठी ते घेतलं, हा १९ वर्षीय गॅटलीनचा बचाव. त्याच्यावर दोन वर्षांची बंदी. त्यातलं एक वर्ष कमी केलं गेलं. त्यानंतर चार वर्षांनी हेलसिंकीतील जागतिक शर्यतीत, १०० व २०० मीटर्समधील त्याचं सोनेरी यशही कलंकित ठरलं. ‘टेस्टोस्टेरीन’ हे अॅनाबोलिक स्टिरॉइड (उत्तेजक) घेतल्याबद्दल आजन्म बंदीचा प्रस्ताव प्रत्यक्षात आठ वर्षे बंदी. मग त्यातूनही चार वर्षे कमी केली गेली! 

दुसऱ्या आगळिकीची ८ वर्षांची बंदी चार वर्षांत उठवली जावी, हे गॅटलीनचं भाग्य. याचं खरं कारण बंदीवासातील त्याची आदर्शवत वागणूक की महासत्ता अमेरिकेचं नागरिकत्व? ऑस्लो विद्यापीठातील प्रा. क्रिस्तियान गुंडरसन यांनी ‘बीबीसी स्पोर्ट’ला दिलेली मुलाखत या बंदीची शास्त्रीय चिकित्सा करते. ते म्हणतात, ‘अॅनाबोलिक स्टिरॉइड’ घेतल्याचे फायदे, (गुन्हेगार) खेळाडूला वर्षांनुवर्षे लाभतच राहतात. त्यामुळे दोन वर्षांची बंदी अगदीच किरकोळ, चार वर्षांसाठी बंदीही अपुरीच!’ येथे हेही लक्षात घेतलं पाहिजे की, सुवर्णपदक विजेत्या गॅटलीनची गुन्हेगारी दोनदा पकडली गेलेली खरीच - पण बोल्टला उपांत्य व अंतिम फेरीतही एकेक शतांश सेकंदानं मागे ठेवणाऱ्या क्रिस्तिआन कोलमनचं यश निष्कलंक व वादातीत नव्हे का? 
यातून निष्पन्न होणारं सत्य एकच : बोल्टने अलविदा घेण्याची वेळ आलेली होती. फार तर तो रौप्यपदकाचा दावेदार ठरत होता; पण त्याच्या डोक्यावरचा राजमुकुट खाली उतरवण्याची घटिका आलेली होतीच.

हीच वेळ आहे : स्प्रिंट्सच्या सम्राटाच्या अतुलनीय यशाच्या रहस्याचा वेध घेण्याची. ऑलिम्पिक व जागतिक शर्यतीत १९ सुवर्णपदकं, त्या ओघात १०० मीटर्समध्ये ९.५८ सेकंद, २०० मीटर्स १९.१९ सेकंद, अन् ४ X १०० रिलेत ३६.८४ हे त्याचे विश्वविक्रम. २०० मीटर्सचं अंतर २० सेकंदांपेक्षा कमी वेळात ३४ वेळा पार, हे अफाट सातत्य. ही सारी असामान्यता आली तरी कुठून? तो दोन दशकांनी अहेड ऑफ टाइम असल्याची वाहवा कशामुळे होत राहिली? सर्वप्रथम त्याची शरीरसंपदा. उंची सहा फूट पाच इंच, त्याच्या टांगा लांब-लांब : २.३८ मीटर्स ते २.४८ मीटर्स म्हणजे जवळपास आठ फूट! शंभर मीटर्स अंतर ४१-४२ पावलात (खरं म्हणजे टांगात) पार. इतरांना टाकाव्या लागत ४४ ते ५० टांगा. शर्यतीतील ६० ते ७०-७५ मीटर्सच्या टप्प्यात या पवनसुत उसेनचा वेग उंचावायचा, ताशी ४४.७२ किलोमीटर्स वा ताशी २७ मैलांपर्यंत. विशेष म्हणजे ही झंझावाती गती त्यानंतर खाली येणं अटळ. पण इतर कोणापेक्षाही ती गती आस्ते-आस्ते, जास्तीत जास्त सावकाशीनं मंद होत जायची. 

स्टार्टिंग ब्लॉक्समधून उसळण्यात बोल्ट कमालीचा कच्चा. त्यासाठी त्याचे चक्क ०.१६५ सेकंद खर्ची पडायचे. या कसोटीवरून तो खालून दुसरा! कलंकित बेन जॉनसन व टीम माँटगॉमेरी, तसेच कार्ल लुईस, मॉरिस ग्रीन व असाफा पॉवेल या माजी जगज्जेत्यांची ही वेळ ०.१३२ ते ०.१५० सेकंदांची, पण खराब सुरुवात हा काही अपशकुन मानायला, बोल्ट थोडाच कच्चा गुरूचा चेला होता? त्याची सव्याज भरपाई तो हमखास व सतत करायचा, शर्यतीतील ४० ते १०० मीटर्सचा टप्पा पाच सेकंदांपेक्षाही कमी, म्हणजे ४.९४ सेकंदांत धावण्याचा त्याचा विश्वविक्रम अचंबित करणारा. 

बोल्ट शर्यती जिंकत आला, त्या ४० ते १०० अशा शेवटच्या ६० मीटर्समधील वादळी वेगात. सात माजी जगज्जेत्यांच्या या टप्प्यातील वेगाशी त्याची तुलना काय सांगते? डोनोवन बेली ५.०३ सेकंद, असाफा पॉवेल व टीम माँटगॉमेरी ५.०८ सेकंद, मॉरिस ग्रीन ५.१० सेकंद, कार्ल लुईस व बेन जॉनसन ५.१३ सेकंद अन् उसेन बोल्ट? ४.९४ सेकंद. म्हणजेच माजी सात जगज्जेत्यांपेक्षा ०.९ ते ०.१४ सेकंदाने सरस! 

दहा-दहा मीटर्सचे पाठोपाठचे चार-पाच टप्पे ०.८२ सेकंद, ०.८२ सेकंद, ०.८२ सेकंद, ०.८३ असे सेकंद असे धावत जाणाऱ्या बोल्टपुढे स्टिरॉइड्स हलकी ठरावीत, ही त्याच्या महानतेची साक्ष. बेन जॉनसन व टीम माँटगॉमेरी हे डोपींगमध्ये सापडले-पकडले. (कार्ल लुईसबाबतही प्रश्नचिन्हं होतीच!) पण त्यांनाही ०.८२ सेकंदात, १० मीटर्सचा एखादा टप्पा धावणं जमवून आणता आलं नाही म्हणून समीक्षक म्हणाले आम्ही आहोत इ. स. २००८ मध्ये, पवनपुत्र बोल्ट वावरतोय २०२५ मध्ये! 

स्प्रिंट्समधील सम्राटानं, अॅथलेटिक्स विश्वाला कठीण परिस्थितीतून सावरलंय. चक्क एक दशक सावरलंय. १९९० पासून एक तप मोठमोठे स्प्रिंटर्स डोपिंगमध्ये सापडले. त्यामुळे लोकांचा विश्वास व पुरस्कर्त्यांचा पाठिंबा डळमळीत होऊ लागला होता. पण ‘स्वच्छ-क्रीडा’चे बोल्ट नामक अभियान खेळास संजीवनी देत राहील. मुख्य म्हणजे चॅनल्सपुढे येण्यापुरतं वा चार-दोन नात्यांच्या नौटंकीसारखं ते नव्हतं. या असली स्वच्छ-क्रीडा अभिमानाबाबत, क्रीडाविश्व त्याचं सदैव ऋणी राहील! 
 
- वि. वि. करमरकर, (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)
बातम्या आणखी आहेत...