आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये अतिरिक्त कामामुळे कर्मचाऱ्यांत तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन, कोरिया, अमेरिकेनंतर आता जपानमधील वर्क कल्चर चर्चेत आहे. या देशातील कंपन्यांमध्ये प्रचंड काम असते आणि कमी कौशल्याच्या कर्मचाऱ्यांना तणावाचा सामना करावा लागतो. डिसेंबर महिन्यात यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात पार्सल डिलिव्हरी करणारी व्यक्ती एका अपार्टमेंटपर्यंत जाते. मात्र, संबंधित फ्लॅटमध्ये कुणीच न दिसल्यामुळे ती व्यक्ती ट्रॉलीत पार्सल ठेवून त्याला लाथ मारते. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की, अखेर तेथील ‘सागावा एक्स्प्रेस’ या प्रमुख पार्सल डिलिव्हरी कंपनीला माफी मागावी लागली. 

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, १० टक्क्यांहून जास्त कंपन्यांचे कर्मचारी महिन्यातून सलग १०० तासांपेक्षाही जास्त ओव्हरटाइम करतात. फेब्रुवारी २०१६ मध्ये फुकुई प्रांतातील अणू प्रकल्पाच्या व्यवस्थापकांना क्षमतेपेक्षा दुप्पट काम करावे लागले होते. त्यानंतर दोन महिन्यांत त्यांनी आत्महत्या केली होती. कमी प्रतिभेच्या सेवा क्षेत्रात तणावाची स्थिती अधिक दिसून येत आहे. डेनत्सू या प्रमुख जाहिरात कंपनीच्या एका २४ वर्षीय कर्मचाऱ्याने डिसेंबर २०१५ मध्ये आत्महत्या केली होती. कारण त्याला १०० तासांहून अधिक काम करावे लागले होते. व्यवस्थापकांनी नकली टाइमशीट तयार करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला होता. 

गेल्या दोन दशकांत ई कॉमर्स इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर डिलिव्हरी मॅनच्या नियुक्त्या झाल्या. सागावासारख्या कंपन्यांनी त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मागील वर्षी अशाच एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या हिंसक कृत्यामुळे आत्महत्या केली होती. जपान इन्स्टिट्यूट ऑफ लेबर पॉलिसी अँड ट्रेनिंगच्या एका सर्वेक्षणानुसार काही कर्मचाऱ्यांच्या मते, कमी प्रतिभावान असल्यामुळे त्यांना जादा तास काम करावे लागते. काहींच्या मते, समाधानासाठी त्यांना जास्त काम करणे आवश्यक आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मागणीतील चढ-उतार ही दोन प्रमुख कारणे समोर आली. या दोन कारणांमुळे जपानच्या कॉर्पोरेेट वर्क कल्चरमध्ये प्रचंड बदल होत आहे.  

डिसेंबर २०१२ नंतर आतापर्यंत १५-६४ वर्षे वयोगटातील ३८ लाख कर्मचारी कमी झाले आहेत. मात्र, वास्तवात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये २२ लाखांची वाढ झाली आहे. मागील फेब्रुवारीतील आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा दर २.८ टक्के झाला असून १९९४ नंतर तो सर्वात कमी आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीतील चढ-उतारामुळे अशी स्थिती निर्माण झाली. चढ-उताराचा कर्मचाऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे. ते जास्त पगाराची मागणी करू शकतात आणि ग्राहकांकडून अधिक किंमत वसूल करण्याचा दबाव आणू शकतात. कर्मचारी संघटनेच्या मते, येथील कर्मचाऱ्यांमध्ये आक्रमकता नाही. मागील दोन  वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन स्थिर आहे. यामुळे महागाई दर कमी असला तरी त्याचे फार परिणाम नाहीत. 

कर्मचाऱ्यांची मागणी जेवढी, तेवढी पूर्तताही होते. त्यामुळे अधिक वेतनाची मागणी करता येत नाही. येथील कंपन्यांमध्ये विदेशी तसेच महिला व वृद्ध कर्मचारी संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आर्थिक गरजांमुळे असले तरी हे चांगले चित्र आहे. ७३ वर्षांचे अकिरा हे टोकियोमध्ये एका ट्रॅफिक सिग्नलवर वाहतूक नियंत्रित करतात. ते म्हणतात, जिममध्ये व्यायामावर पैसे खर्च करण्यापेक्षा काम करुन शारीरिक हालचाल करणे कधीही चांगले. वयाच्या उत्तरार्धात कमावलेला पैसा पत्नीसोबत गिरीभ्रमंती करण्यावर ते खर्च करतात. 
© 2016 The Economist Newspaper Limited. All rights reserved. 
बातम्या आणखी आहेत...