आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीचे भवितव्य उत्स्फूर्त कृतिपूर्णतेत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांनो! पूर्वाध्यक्षांनी विभूषित केलेल्या या सर्वश्रेष्ठ साहित्यपीठावरून आपल्याशी संवाद साधत असताना माझ्या मनात त्या पूर्वाचार्यांचे लोकोत्तर वाङ्मयीन कर्तृत्व आठवून संकोचाची भावना निर्माण झाली आहे; तथापि ‘महाजनो येन गतः स पन्थाः’ या न्यायाने त्यांच्या मार्गावर आपली पावले टाकण्याचा प्रयत्न करीतच मी येथवर येऊन पोचलो आहे. याप्रसंगी त्या सर्व पूर्वाचार्यांना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो.
 
आपल्या मातृभूमीच्या सीमेवर सुरू असणा-या अघोषित युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणा-या शूर सैनिकांना अत्यंत विनम्रतेने, कृतज्ञताभावाने आणि साश्रुपूर्ण अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. तारुण्यातील माझ्या भावजीवनावर अधिराज्य गाजवणा-या युगंधर कथाकार पु. भा. भाव्यांच्या प्रदीर्घ वास्तव्याने पुनीत झालेल्या आपल्या डोंबिवली या नगराविषयी, मी निवडून आल्यावर दुस-याच दिवशी माझे हृदयभराने स्वागत व सत्कार करणा-या डोंबिवलीतील नागरिकांविषयी तद्वतच अतिशय विश्वासाने अध्यक्षपदाची ही जबाबदारी माझ्यावर सोपविणा-या महाराष्ट्रातील व बृहन्महाराष्ट्रातील जाणत्या रसिकांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. 
मित्रांनो! सांप्रत आपल्या सगळ्यांच्या पुढ्यातील ऐरणीवर असणारा प्रश्न मराठी संस्कृतीच्या सुदृढ अस्तित्वाचा, तिच्या सुरक्षिततेचा आणि तिच्या जाणीवपूर्वक करावयाच्या संवर्धनाचा आहे. त्यात अनेक घटकांचा विचार करणे अपेक्षित असले, तरी ज्या वाङ्मयीन संस्कृतीने तिचा हृदयप्रांत व्यापलेला आहे तिचीच चर्चा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठावरून मुख्यत्वेकरून व्हावी, असे मला वाटते. 

गेल्या हजार वर्षांतील मराठी संस्कृतीच्या इतिहासाचा जरी आपण विचार केला तरी तिच्या जडणघडणीत या प्रदीर्घ काळात बदलत गेलेल्या भाषारूपांनी आणि निर्माण झालेल्या साहित्याने किती बहुमोल भूमिका बजाविली आहे ते आपल्या ध्यानात येऊ शकेल. स्वाभाविकच मराठी भाषेच्या सर्व क्षेत्रांतील सुदृढ अस्तित्वाचा व अभिवृद्धीचा, मराठी साहित्याने प्राप्त करावयाच्या सर्वंकष महात्मतेचा व त्यांच्या प्रभावाने मराठी संस्कृतीला लाभणा-या उज्ज्वलतेचा पुनःपुन्हा विचार करणे अपरिहार्य ठरते. हे अस्तित्व, ही महात्मता आणि ही उज्ज्वलता केवळ आपोआप निर्माण होणार नाही, ती आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवरील अहर्निश जागरूकतेने आणि प्रयत्नांनी निर्माण होणार आहे, तथापि जोपर्यंत त्यांचे ऐतिहासिक आणि सद्यःकालीन स्वरूप आपल्याला कळणार नाही तोपर्यंत त्यांच्या भविष्यातील वास्तवदर्शी स्वप्नस्वरूपाची कल्पना आपल्याला करता येणार नाही. इतकेच नव्हे तर निकोप आणि व्यापक भाषादृष्टीचा, निरामय साहित्यदृष्टीचा आणि मानवकेंद्री संपन्न संस्कृतिविचारांचा अवलंब करून उद्दिष्टानुगामी कार्यप्रणाली आपण जोपर्यंत राबवणार नाही तोपर्यंत ते कल्पित प्रत्यक्ष रूपात साकार होणार नाही. अद्यतन संस्कृतीच्या विकासपूर्व अवस्थेत या तीनही गोष्टी यदृच्छेने काही काळ घडून आल्या असल्या तरी विकसनशील अवस्थेत त्यातील बराचसा भाग मानवी प्रयत्नांवर अवलंबून राहिला आहे व राहणार आहे, ह्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. 
भाषिक समृद्धता किंवा भाषिक विकास हा भाषेतील नैसर्गिक जोम आणि मानवी प्रयत्न ह्यांच्या संमिश्रणाने घडून येतो. प्रमाणभाषा किंवा ग्रांथिक भाषा ह्यांच्या संदर्भात तर मानवी प्रयत्नांचे प्राबल्य अगदी स्पष्टपणे जाणवते. विशिष्ट कालखंडातील या भाषारूपांचा आणि त्यांच्या एकूण विकासप्रक्रियेचा सूक्ष्म अभ्यास केल्यास घडत गेलेल्या परिवर्तनाचे मूळ स्रोत सहज लक्षात येऊ शकतील.
आपली भाषा, आपले साहित्य आणि आपली संस्कृती ह्यांच्यावर वैश्विक दाबाने आलेल्या आणि वाढत चाललेल्या इंग्रजी सावटाचे रूप आम्हाला समजत नाही असे नाही, पण भौतिक संपन्नतेच्या आणि तज्जन्य सुखवादी कल्पनांच्या आहारी गेलेल्या आमच्या समाजाला त्याचे फारसे काही वाटेनासे झाले आहे. ही संपन्नता व सुखवादी कल्पना प्रत्यक्ष आपल्या जीवनात आणण्यासाठी जे शिक्षण, ज्या पदव्या, ज्या नोक-या आमच्या समाजाला हव्या आहेत त्यांच्यासाठीची पायवाट पूर्वप्राथमिक वर्गातील इंग्रजी खिंडीतून निघून प्राथमिक-माध्यमिक इंग्रजी माध्यमातील शिक्षणाच्या राजरस्त्याला येऊन मिळते. खेड्यापाड्यांतल्या, उपेक्षित वस्त्यांतल्या, कलाशाखेतल्या सतत हिणवले जाणा-या, पोर्नया ठरू पाहणा-या मराठी माध्यमातील शिक्षणाकडे कानाडोळा करून इंग्रजी शिक्षणमाध्यमाच्या राजरस्त्यावरून विज्ञान, तंत्रविज्ञान, वैद्यक, व्यवस्थापन, विधी इत्यादी क्षेत्रांतील शिक्षण पूर्ण करून युरोप-अमेरिकेची दारे ठोठावता येतात, याबद्दल पुरेपूर खात्री पटल्याने आमच्या केवळ उच्चभ्रू समाजानेच नव्हे, तर सर्व जातिगटांतील मध्यमवर्गीय समाजाने देखील मराठी माध्यमातील शिक्षणाकडे एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून, त्याकडे कायमची पाठ फिरविली आहे. 

अशा अवनत अवस्थेत मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ह्यांच्याबद्दल प्रेमाची थोडीफार धुगधुगी शिल्लक राहिलेल्या मराठी माणसांच्या मनांमध्ये व कृतींमध्ये अंतर्विरोध निर्माण होऊन भाषाविषयक भूमिकेमध्ये कमालीचे ढोंग निर्माण झाले आहे. एकीकडे आम्हाला इंग्रजीचे अवास्तव प्राबल्य नको आहे व दुसरीकडे इंग्रजीतून शिकले नाही तर जगण्याचेच प्रश्न निर्माण होतील, ह्या भयंकर भीतीचा बागुलबोवा आमच्या मानगुटीवर बसला आहे. त्यामुळे आमचे वागणे पूर्णपणे दुटप्पीपणाचे झाले आहे. भाषिक पातळीवरील आणि सांस्कृतिक पातळीवरील संपन्न पिढी तयार करण्याला थोडेदेखील महत्त्व न देता केवळ भौतिक साधनप्राप्तीची क्षमता असणारी पिढी तयार करण्याला अधिक महत्त्व दिले जात आहे व त्यात मिळत गेलेल्या यशाने मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ह्यांच्या संवर्धनार्थ करावयाच्या प्रयत्नांकडे आम्ही पूर्णपणे पाठ फिरविली आहे. काही संवेदनशील मनांना याबद्दल वाटणारी खंत जांभईसारखी वर येते खरी, पण दोनचार आळोख्यापिळोख्यांत ती आपोआपच विरून जाते. 
अशी ही उदासीन दुटप्पी वृत्ती उच्चवर्गाकडून कनिष्ठ वर्गाकडे, शहरांतून खेड्यांकडे झिरपत चालली आहे. सरकारी धोरणे अशा व्यवस्थेचे भरणपोषण करणारीच आहेत. सर्वसामान्य जनतेचा कल लक्षात घेऊन तिला हवे आहे ते दिले की ती खूश राहते, ह्याची जाणीव असल्यामुळे केवळ इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळांना खैरातीसारखी मान्यता दिली गेली. चतुर व्यावसायिक शिक्षणसम्राटांनी शुल्क आणि देणग्या घेण्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने, केवळ इंग्रजी शिक्षणाच्या आपल्या साम्राज्यांचा जगज्जेत्या अले्नझांडरच्या पराक्रमाला लाजवेल असा वैभवशाली विस्तार केला. त्यांच्या पंचतारांकित शाळा आणि महाविद्यालयांसमोर आज आमच्या मराठी शाळा भिकारणीसारख्या आसवे गाळीत बसल्या आहेत. 
 
क्रमशः
बातम्या आणखी आहेत...