आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशद्रोह्यांना धर्म, जात, पंथ वा पक्ष असतो?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेशातील आतंकवादविरोधी दलाने राज्यातील ११ जणांना भारतीय सैन्याची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविण्याच्या आरोपाखाली अटक केली. अटक केलेल्यांमध्ये तेथील भाजपच्या मुख्यमंत्र्यापासून प्रदेश सचिवापर्यंत संबंध असलेल्यांचा समावेश आहे. धृव सक्सेना हा भाजपच्या युवक आघाडीच्या आयटी सेलच्या (ज्यात मुख्यतः ट्रोलचे म्हणजे विरोधकांना फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सअॅप ग्रुपवर शिव्या घालण्याचे काम केले जाते) प्रमुख पदावर होता. या पदावर राहून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करायचा. अटक केलेल्या या सर्वांवर पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयला भारतीय सैन्याची ठिकाणे व त्यांच्या हालचालीची  माहिती पुरवित असल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी समांतरपणे गुप्त टेलिफोन एक्सचेंज स्थापन केले होते. भोपाळ, ग्वाल्हेर व जबलपूर येथे असे एक्सचेंज सापडले आहेत. त्याद्वारे ते इंटरनेट कॉलचे रूपांतर सेल्युलर कॉलमध्ये करीत. त्यामुळे पाकिस्तानात ते कोणाशी बोलत आहेत याचा थांगपत्ता लागत नव्हता, अशी माहिती एटीएस प्रमुख संजीव शमी यांनी दिली. या कामासाठी आरोपींना वेळोवेळी हवालामार्फत प्रचंड रकमेचा मोबदला मिळत होता. 

याबाबतचे ३ कोटी रुपयांचे हवाला प्रकरण उघड झाले आहे. याशिवाय दरमहा प्रत्येकी ४० हजार रुपये वेतन मिळत होते, ते वेगळेच. या नेटवर्कशी संबंधितांवर एटीएसने मारलेल्या छाप्यात ३००० सिमकार्ड‌्स व ३५ सिम बॉक्स सापडले आहेत. छाप्यात मिळालेल्या लॅपटॉप व इतर सामग्रीमधून याबाबतची बरीच महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे. संजीव शमी यांनी असेही सांगितले की, नोव्हेंबर १६ मध्ये जम्मू येथून सतविंदर आणि दादू या दाेघांना अटक करण्यात आली होती. सतविंदर पाकिस्तानी एजंटांना भारतीय सैन्याची माहिती एकत्रित करून पाठवित होता व त्याचा मोबदला त्याच्या बँक खात्यावर सतन्याचा बलराम सिंह जमा करीत होता. जानेवारीमध्ये उत्तर प्रदेश एटीएसनेही यासारख्या ११ जणांना अटक केली होती. त्यांनी दिल्लीतील महारोली इलाख्यातून अटक केलेल्या गुलशन सेनकडूनच मध्य प्रदेशातही पाकिस्तानी आयएसआयचे असे जाळे असल्याची माहिती मिळाली होती. हरियाणा, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांतही असे जाळे असल्याची माहिती मिळत आहे. 
 
धृव सक्सेनाच्या फेसबुक प्रोफाइलवरून ताे मुख्यमंत्री शिवराज चाैहान, प्रदेश महासचिव विजयवर्गीय, महापौर आलोक शर्मा, खासदार आलोक संजर यांच्याबरोबर व्यासपीठावर मिरवत असल्याचे दिसते.  लॅपटॉपवरून आयटीचे प्रेझेंटेशनही करीत होता. परंतु, आता भाजपने धृव सक्सेनाशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले आहे. धृवची आई रंजना व वडील महेंद्र सक्सेना हे पूर्णपणे मुलाबरोबर आहेत. त्यांच्या मते काँग्रेस-भाजपच्या राजकारणात आपल्या मुलाचा बळी देण्यात आला आहे. त्या चिडून विचारतात की, ‘माझ्या मुलासोबत कायम वावरणारे भाजपचे पुढारी आता कोठे आहेत? आता तर ते त्याच्या जवळपासही फिरकायला तयार नाहीत.’ त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मुलाला माफ करण्याबद्दल विनंतीवजा पत्र पाठविले आहे. 

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या या ११ पैकी दुसरा एक आरोपी जितेंद्र ठाकूरला एटीएसने ग्वाल्हेरमधून ताब्यात घेतले आहे. त्याची भावजय तेथून भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. जितेंद्रनेच त्यांना भाजपचे तिकीट मिळवून दिले आहे. याच ११ पैकी सतना येथून अटक केलेला बलराम सिंह नावाचा आणखी एक आरोपी बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे. त्याने बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांचे बँक खाते उघडले. त्या खात्यात आयएसआयकडून रकमा जमा होत होत्या, असे तपासात उघड झाले आहे. त्याच्याशी संबंधित ४६ जणांचे मोठे रॅकेटच उघडकीस आले. 
 
शहरातील दोन डॉक्टर्सही यात सामील असल्याची त्याने कबुली दिली. त्याचा भाऊ विक्रमलाही एटीएसने ताब्यात घेतले असून, पठाणकोट हवाई अड्ड्यावरील पाकिस्तानी हल्ल्याशी या टोळीचा संबंध आहे की काय या दिशेनेही कसून चौकशी सुरू आहे. यातून निष्पन्न  झालेल्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच बाबी जाहीर केल्या जातील असे नव्हे. पण देशभक्तीच्या नावाखाली किती खोलवर देशद्रोह केला जाऊ शकतो, याचे हे एक ताजे उदाहरण आहे. या बाबीवरून सूज्ञांनी जे ध्यानात घ्यावे ते असे की, देशद्रोह्यांना कोणताही धर्म, जात, पंथ वा पक्ष नसतो. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही साधनांचा वापर करून ते देशाशी कोणत्याही पद्धतीने गद्दारी करू शकतात. मध्य प्रदेशातील अशा घटनेत एकही मुस्लिम अथवा जेएनयूचा विद्यार्थी नाही. तसे असते तर आपल्या देशातील आरएसएसशी संबंधित भाजपपासून इतर संघटनांनी किती गहजब केला असता? याचाही विचार करावा. त्याचबरोबर एनडीटीव्ही सोडून इतर प्रसारमाध्यमांची भूमिका काय राहिली असती? त्यांनी आपल्या चॅनल्समधून संपूर्ण देशभर आगडोंब उठवून अशा घटनांवर चर्चासत्रे घडवून आणली असती की नाही? 

...हीच फक्त देशभक्तीची कसोटी आहे काय?
चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना एखादी वयस्कर व्यक्ती उभी राहू न शकल्यास त्यास देशद्रोही म्हणून मारहाण करणे कितपत देशभक्तीपूर्ण आहे? ‘भारतमाता की जय’ अथवा घसा कोरडा करून ‘वंदे मातरम्’ म्हणणे हीच फक्त देशभक्तीची कसोटी आहे काय? एखाद्या नामवंत लेखक, साहित्यिक अथवा कलावंतांनी सहिष्णुतेबद्दल, खाणेपिणे अथवा पेहरावाबद्दल मतभेद व्यक्त केल्यास त्यांना सरळ ‘पाकिस्तानात जा’ म्हणून सांगणे ही उथळ देशभक्ती नव्हे काय? तेव्हा केवळ धृव सक्सेनाशी संबंध नाकारल्याने काम संपत नाही तर बजरंग दलाशी संबंधित बलरामचे काय? की त्याला काय म्हणून संबाेधायचे? हा प्रश्न शिल्लक राहताेच.
 
- भीमराव बनसोड, (ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, औरंगाबाद)
बातम्या आणखी आहेत...