आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहा,नाशिककरांच्याच सेवेत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक महानगरपालिकेची सत्ता बहुमताने एकाच पक्षाच्या हाती सोपविण्याचा नाशिककर मतदारांचा निर्णय हा ऐतिहासिकच आहे. त्यामुळे ज्या भारतीय जनता पक्षाला सत्ताधारी होण्याची संधी येथे मिळाली त्या पक्षाच्या स्थानिक कारभाऱ्यांवरील दायित्व अधिक वाढले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकीतील घवघवीत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणाची आवर्जून आठवण ठेवायला हवी. ‘कोण हरले, कोण जिंकले यापेक्षाही जनतेने भाजपला दिलेला पवित्र आदेश आहे. महाविजयानंतर अधिक नम्र होण्याची आवश्यकता आहे. सरकार सर्वांचेच असायला हवे.’ 
 
दिल्लीतील मोदींच्या भाषणाचा अंगीकार या पुढील काळात गल्लीतील म्हणजेच नाशिकच्या पक्ष कार्यकर्त्यांनाही करावा लागणार आहे. कारण, जे उत्तर प्रदेशात घडले तेच तंतोतंत नाशिकमध्येही घडल्याने सगळेच चक्रावून गेले होते. निवडणुकीच्या पूर्वार्धात दिसणारे चित्र प्रत्यक्ष मतदानाच्या उत्तरार्धात नेमके उलटे होते. थोडक्यात काय तर अगदी सुरुवातीला वरचढ दिसणारी शिवसेना निकालांमध्ये तळावरच थांबली. तिकडच्या अन् इकडच्या निवडणूक प्रचारातील अजून एक साम्य म्हणजे ‘दत्तकविधान’ सोहळा दोन्हीही ठिकाणी पार पडला. पंतप्रधान मोदींनी तिकडे उत्तर प्रदेशला तर इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला दत्तक घेतले. भौगोलिक क्षेत्राचा विचार केला तर उत्तर प्रदेश वा नाशिकची तुलना होऊ शकत नाही. पण, दोन्ही ठिकाणच्या प्रचारातील दोन्ही प्रमुख नेत्यांच्या प्रचाराच्या सूत्रात एकवाक्यता होती, किंबहुना तशी ती फडणवीसांनी ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे भले त्यांच्या जाहीर सभेतील खुर्च्या खाली दिसत असल्या तरी मतदारांनी त्यांच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकल्याने सभा फेल झाल्याची बोचणी काहीशी निश्चितच कमी झाली असणार. 
 
या एकूण पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत भाजप आता खऱ्या अर्थाने सत्तारुढ होत आहे. महापौर व उपमहापौर यांच्यासह पालिकेतील जवळपास सर्वच प्रमुख समित्यांवरही या पक्षाच्याच कारभाऱ्यांचा वरचष्मा राहू शकेल, असे एकूण चित्र आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच नाशिककरांनी भाजपकडे एकहाती सत्ता सोपविल्यामुळे घोडाबाजाराच्या विषयाला तर केव्हाच पूर्णविराम मिळाला आहे. 

१९९२ मध्ये नाशिक महापालिकेचा कारभार प्रशासकांकडून लोकप्रतिनिधींच्या हाती आल्यापासून कोणत्याच पक्षाला स्पष्ट असा जनाधार मिळू शकलेला नव्हता, तो यंदा प्रथमच मिळाला आहे. त्यामुळे यापूर्वी पार पडलेल्या महापौर असो की उपमहापौर वा स्थायी समिती अध्यक्ष या पदांच्या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता असायची. या पदांची निवडणूक म्हटली की, घोडेबाजार हा कळीचा मुद्दा ठरलेलाच. निवडणुकीचा खर्च मोजण्याबाबत तेव्हापासूनची काही गणितं अन् त्याला साजेशी मोजदादची आर्थिक भाषा म्हणजे  पेट्या व त्यापाठोपाठ खोकं याचे हिशेब सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडचे असत. पण या पदांच्या निवडणुकीचा बहर ओसरला की अख्ख्या शहरात एकच चर्चा असायची किती पेट्या व किती खोके खर्ची पडले असतील याचीच. 

महापौरपदाच्या शर्यतीतील दमदार उमेदवारावर शहरातील एखादा बुकी म्हणजेच कुणीतरी पैशावाला किंवा ज्याचे पालिकेच्या कारभारात दैनंदिन हितसंबंध अडकलेले असतात, असा भाई याने किती रक्कम ओतली असेल याबाबतही तर्कवितर्क लढविले जात असत. मग प्रत्यक्ष कारभारातील टक्केवारीचा मुद्दा डाेकं वर काढताेच. गंमत बघा, अशा चर्चा रंगविण्यात वा तर्क बांधण्यात केवळ सामान्य माणूसच असतो असे नाही, तर जी मंडळी निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कार्यरत असतात अशांकरवीही तेवढ्याच हिरिरीने सहभाग घेतला जायचा. हे झाले प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशीचे दृश्य. पण त्याही अगोदर म्हणजेच किमान पंधरवड्याआधीच साग्रसंगीत सहलींचे आयोजन हा एक ठरलेला म्हणा की सुनिश्चित उपक्रम. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आपल्या पक्षासह गळाला लागतील तेवढ्या किंवा गोटात दाखल होण्याच्या बोलीनुसार जमलेल्या अशा सर्वांनाच विशिष्ट आरामदायी बसगाड्यांमधून कुठेतरी दूर म्हणजे राज्याच्या सीमापार नेऊन त्यांची बडदास्त ठेवली जायची. तीही उमेदवाराच्या कुवतीनुसार. 

गंमत म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये तर नाशिकच्या नगरसेवकांची अशीच सहल गुजरातमार्गे राजस्थान असा सैरसपाटा मारून आली होती. सहलीवरून आलेल्यांच्या गमतीजमती अन् किस्से जसजसे चव्हाट्यावर येऊ लागतात ते तर सर्वसामान्य मतदारांच्या भावनांचा अनादर करणारेच असतात. त्यामुळे यंदा नाशिककरांनी महापालिकेवर भाजपला बहुमताने निवडून देतानाच त्यांच्यावर पूर्णार्थाने विश्वास टाकला आहे. सदर लिहून होईपर्यंत तरी मनोरंजनाची सहल वा पेट्या-खोक्याची चर्चा जनमानसात सुरू झालेली नव्हती. पंतप्रधान मोदी यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता राबविण्याचा स्पष्ट जनादेश मिळालेला असताना नाशिकच्या कारभाऱ्यांनी किमान याची जाणीव बाळगली अन् खरोखरीच नम्र होऊन कारभार हाकताना नाशिककरांच्याच सेवेत सामावून घेतले तरी पुरेसे होईल.      
   
- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...