आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंचा पाय खोलात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांवर पुणे येथील बंडगार्डन पोलिसांत सोमवारी अखेर गुन्हा दाखल झाला. खडसेंसह त्यांच्या पत्नी आणि जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जावई गिरीश दयाराम चौधरी आणि जमिनीचे मूळ मालक अब्बास उकानी यांच्यासह काही जणांना आरोपी करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अर्थात, गतवर्षी ३० मे राेजी मूळ तक्रारदार आणि पुणे येथील बिल्डर हेमंत गावंडे यांनी खडसेंविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी सुरू असताना पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर करून आम्ही या प्रकरणात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करू शकत नाही, असे म्हटले होते. त्यानंतर हायकोर्टाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्यात उशीर होत असल्याची बाब गावंडे यांनी निदर्शनास आणूनदिल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारलादेखील सुनावले होते. 

पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या तक्रारीत तथ्य नाही, असे शपथपत्र पुणे पोलिसांनी आधीच न्यायालयात सादर केले आहे. याशिवाय या प्रकरणाची उच्च न्यायालय आणि न्या. झोटिंग कमिटीपुढे स्वतंत्रपणे चौकशीही सुरू आहे. मी विरोधी पक्षनेता असताना अनेक बिल्डरांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. गावंडे हे त्यातलेच एक आहेत. दुखावले गेल्यामुळे त्यांनी ही तक्रार केली आहे. तीन वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत. त्यामुळे सत्य काय ते बाहेर येईलच. खडसे हे जे काही म्हणताहेत ते खरेही असेल. त्यांनी घोटाळे बाहेर काढल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक विरोधकांचे बारीक लक्ष हे असणारच आणि राज्यात जे भाजप सरकार स्थापन झाले आहे, त्यांनी पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त शासन देण्याचा दावा केला होता. यात खडसे महसूल, राज्य उत्पादन शुल्क आणि अन्य महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री होते.

यापूर्वीच्या सरकारने लाख घोटाळे केले असतील, पण तुम्ही जर पतिव्रतेचा आव आणत असाल तर तुमचे सरकार आणि मंत्री काय करतात, यावर विरोधकांची नजर ही असणारच. त्यामुळेच फडणवीस सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा विरोधक अभ्यास करत आहेत. त्यातूनच तर कथित चिक्की घोटाळा बाहेर आला होता. खडसेंनी पुणे एमआयडीसीमधील जी जमीन खरेदी केली ती  खरेदी करण्यासाठी पैसा कुठून आणला, जमीन कशासाठी खरेदी केली, एवढी मोठी जमीन केवळ तीन कोटी रुपयांत कशी खरेदी केली? या सर्व मुद्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

फडणवीस सरकारने याच आरोपांवरून खडसेंचा राजीनामा आधीच घेत चौकशी सुरू केली आहे. खडसे हे भाजप सरकारमधील एकमेव प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले नेते आहेत. खडसेंची प्रशासनावरही चांगली पकड होती. त्यामुळे खडसेंचे मंत्रिमंडळात असणे सरकारसाठी लाभकारक होते. पण खडसेंवर एवढे सर्व गंभीर आरोप असताना त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणेही तेवढेच धोक्याचे आहे. विरोधकांना आणखी एक मोठा मुद्दा मिळेल. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे धाडस करत नाहीत.
 चौकशीतून खडसे सहीसलामत बाहेर पडावे अशी अपेक्षा दोघांना लागून आहे. पण खडसे सहीसलामत बाहेर पडणे दूरच, त्यांचाही ‘भुजबळ’ व्हावा, यासाठी विरोधकांनी देव पाण्यात टाकले आहेत. दरम्यान, खडसे आणि समर्थकांना मंत्रिमंडळात परतण्याची घाई लागली आहे. खडसेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप सरकारवरच जनतेची कामे होत नसल्याची टीका केली. काही मंत्र्यांच्या कामकाजावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अधिवेशनात खडसेंनी जणू विरोधकांची भूमिकाच बजावली होती. 

अर्थात, एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जे केले ते चुकीचे होते असे, कुणीही म्हणणार नाही. पण, खडसेंनी अधिवेशनात त्यांच्याच सरकारवर टीका केली आणि दोन दिवसांनंतर लगेच पुणे पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल झाला असला तरी राजकीय वर्तुळात जो-तो आपल्या सोयीचा अर्थ लावत आहे. एकंदरीत या प्रकरणातून बाहेर पडण्याचा खडसेंचा प्रयत्न सुरू आहेच. पण त्यांना वेगवेगळ्या चौकशीत अडकवण्यासाठी विरोधकही तेवढेच कामाला लागले आहेत. बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल होणे म्हणजे ‘बुडत्याचा पाय खोलात,’ असेच खडसेंबाबत म्हणावे लागेल.   
 
- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव
बातम्या आणखी आहेत...