आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंची सत्त्वपरीक्षा !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. हजार, पाचशेच्या नोटा निर्धारित मुदतीत बदलण्यासाठी आणि चलनातील नोटा बँकेतून काढण्यासाठी सर्वत्र रांगाच रांगा दिसत होत्या. अचानक नोटा चलनातून रद्द केल्यामुळे अर्थव्यवस्था काही दिवस गोंधळात सापडली होती. निर्णय बरोबर की चूक म्हणून प्रसार माध्यमांमधून चर्वितचर्वणही झाले. नोटबंदीमागे मोदींचा उद्देश शुद्ध होता. काळा पैसा बाहेर यावा आणि बनावट चलनाला आळा बसावा. तथापि, मोदींचा हा उद्देश किती सफल झाला याबद्दल आज कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. पण ज्यांच्याकडे काळे धन होते, म्हणजे बेहिशेबी पैसा होता, त्यांनीही तो बेमालूमपणे बदलून घेतला, हे मात्र करकरीत सत्य आहे. 

देशभरात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांना पैसे बदलून देण्याचे अधिकार दिले होते. सहकारी संस्थांना मात्र नोटबंदीत नोटा बदलून देण्याच्या अधिकारापासून लांब ठेवले होते. कारण सहकारी संस्था म्हणजे गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचे अनेक घोटाळ्यांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नोटबंदीत शासनाने सावधानता बाळगली होती. एवढी सावधानता बाळगूनही जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोपडा शाखेतून नोटबंदीच्या काळात सुटी असतानाही ७३ लाख रुपयांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. जळगाव जिल्हा बँकेतील या नोटबदलीच्या प्रकरणाची तक्रार मुंबई क्राइम ब्रँचमध्ये करण्यात आली. या तक्रारीच्या आधारावर काही दिवस गोपनीय चौकशी करून नोटबदलीच्या तब्बल  चार महिन्यांनंतर म्हणजे २ मार्चला अचानक सीबीआयचे पथक जळगावात आले आणि त्यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यासह चोपडा शाखेतील दोघा कर्मचाऱ्यांची चौकशी केली. बँकेच्या या अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या नोटा बदलून दिल्या, याबाबत ही चौकशी झाली. कसून चौकशी केल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी जेव्हा बोलावले जाईल तेव्हा हजर व्हावे, या अटीवर गुन्हा दाखल असूनही त्यांना सोडून दिले. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांना केलेला पतपुरवठा हा नैसर्गिक परिस्थितीनुसार बँकेकडे परत येत असतो. अनेकदा आवाहन केल्यानंतरही शेतकऱ्यांकडून वेळेवर कर्जफेड होत नाही. तरीही जळगाव जिल्हा बँकेत नोटबंदीच्या काळात २२५ कोटी रुपयांची रक्कम कर्जफेड म्हणून बँकेत आली कशी? हा व्यवहार संशयास्पद असल्यामुळे याबाबतही निर्णय झालेला नाही. त्यातच ७३ लाखांच्या नोटबदलीचे दुसरे प्रकरण थेट सीबीआयच्या रडारवर आले आहे. 

जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेतून नोटा बदलल्या गेल्याचे उघड झाले असले तरी  संशयाची सुई जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांची पतसंस्था तथा ग.स. सोसायटीशी संबंधित आजी-माजी पदाधिकाऱ्यांचीही सीबीआय पथकाने दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी दिवसभर चौकशी केली. नोटबंदीच्या काळात ग.स. सोसायटीत ठेवलेल्या ठेवींचीही चौकशी यानिमित्ताने होणार असल्याचे बोलले जात आहे. 

जळगाव जिल्हा बँकेतील नोटबदलीची चौकशी थेट सीबीआय करीत असल्यामुळे खरे काय ते यथावकाश बाहेर येईलच; पण बदलून देण्यात आलेल्या नोटा कुणाच्या, याबाबत जिल्हावासीयांमध्ये अधिक उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे. उत्सुकता आणि चर्चेचे कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे. या बँकेच्या चेअरमन रोहिणी एकनाथ खडसे-खेवलकर आहेत. आधीच एकनाथ खडसे हे भोसरी जमीन खरेदी प्रकरणातून सहीसलामत सुटलेले नाहीत. सुनावणी पूर्ण झाली असली तरी न्या. झोटिंग समितीने अंतिम निर्णय दिलेला नाही. 

दुसरीकडे याच प्रकरणात उच्च न्यायालयाने खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. यातच नोटबदलीचे प्रकरण आणि तेही खडसेंच्या अधिपत्याखाली असलेल्या जिल्हा बँकेचे निघावे, हा योगायोग म्हणावा की खडसेंची सत्त्वपरीक्षा. जळगावात जिल्हा बँकेतून नोटा बदली झाल्याची तक्रार मुंबई क्राइम ब्रँचकडे झाली आणि थेट सीबीआयकडे प्रकरण सोपवल्यामुळे या ‘पारदर्शी’ चौकशीबद्दलही खडसे समर्थक वर्तुळात चर्चा आहे. जिल्हा बँकेत नोटा बदली केल्या गेल्या असतील तर त्याची चौकशी झालीच पाहिजे; पण जळगावात जिल्हा बँकेशिवाय अनेक राजकीय नेत्यांनी नोटा बदलून आणल्या नाहीत असे आहे काय? काही बड्या नेत्यांनी तर थेट मुंबईत जाऊन करोडो रुपये व्हाइट करून आणल्याचे बोलले जात आहे.
 अर्थात, ही फक्त चर्चा आहे. अजून ठोस तक्रार द्यायला कुणी पुढे आलेला नाही. पण सध्या जिल्हा बँकेतील नोटबदलीचे प्रकरण आणि त्याचे धागेदोरे कुणापर्यंत जाऊन पोहोचतात आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि काळ्या पैशांचा धनी कोण, याचीच चर्चा सुरू आहे. 

- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव
बातम्या आणखी आहेत...